शहाजिंदे फकीरपाशा महेबूब : (३ जुलै १९४६). मराठीतील कवी. मराठी साहित्यातून मुस्लिम समाजमन मांडणारा लेखक. जन्म सास्तूर, ता. लोहारा, जि. उस्मानाबाद येथे झाला. शिक्षण पहिली ते दहावी शांतेश्वर विद्यालय, सास्तूर येथे. बी. ए. (इंग्रजी माध्यम) मौलाना आझाद महाविद्यालय, औरंगाबाद येथून तर एम. ए.बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून. लेखनाची वाटचाल अनुभवाला आलेल्या वास्तवाच्या चटक्यातून झाली. नोकरीची वाटचाल (१९७०) पासून. मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय, औराद शहाजनी येथे मराठी विषयाचे अधिव्याख्याता म्हणून काम केले. २००६ ला ते सेवानिवृत्त झाले.

शहाजिंदे फकीर महेबूब यांचे साहित्य – काव्यसंग्रह : निधर्मी (१९७९), शेतकरी (मुक्तदीर्घ काव्य,१९८६), आदम (१९९६), ग्वाही (१९९६), झोंबणी (२०१३); कादंबरी : मीतू (१९८४) ; ललित लेखसंग्रह : अनुभव (१९९७), वाकळ (२०१३), प्रत्यय (२०१३); समीक्षा : सारांश (१९८७), इत्यर्थ (१९९६), शब्दबिंब (२०१६) आणि इतर संपादकीय कार्य.

सुरुवातीला सत्यकथा, प्रतिष्ठान  या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रकाशित झाल्या. त्यांच्या कवितेतून धर्म आणि समुदाय यांच्या अनुभवातून येणारी परात्मता प्रकट झाली आहे. धर्माची कल्पना ही मानवी मनाला ज्या सखोल पद्धतीने व्यापून आहे, ते पाहता धर्मनिरपेक्षतेचे कोणतेच आयाम त्यावर उपाय ठरू शकत नाहीत ही हतबलता ते त्यांच्या कवितेतून मांडतात. भगीरथ प्रयत्नाने गंगा पृथ्वीवर येणे आणि कुंभकर्ण झोपलेला असणे हे पुराणांचे संदर्भ आणि तुणतुणे वाजवित फिरणार्‍या दिंड्या आणि कोणतेच तुणतुणे नसणारा कवी यांच्यातील विरोध लयही त्यांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त केली आहे. या समाजात जगायचं तर जात लागते, धर्म लागतो, पैसा लागतो, कुणाचं तरी छत्र लागतं, तसा माणूस परतंत्र आहे, पण त्याची धडपड मात्र स्वतंत्र होण्याची आहे. मनुष्यत्वाची प्रतिष्ठा हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे असं मानणारे फुले-आंबेडकर यांच्यासारखे विचारवंत या देशात आले आणि गेले पण माणसाचे मोठेपण मानणार्‍या विचार सरितेचे पात्र कधीच विशाल झाले नाही. याच आशयानुसार त्यांची कविता जीवघेण्या वास्तवाच्या केवळ नोंदी घेण्यातच हरवून न जाता त्या वास्तवाला काव्यात्म, परिणामकारक धारदार रुप देते. त्यांच्या कवितेला आत्मचरित्रात्मक किनार असून ती दोन संस्कृतीच्या भिन्नतेतून निर्माण झाली असल्याचे लक्षात येते. त्यांची काव्यविषयक भूमिका सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय दुःखाच्या अभिव्यक्तीची आहे. हिंदु, मुस्लिम संस्कृतीच्या संघर्षात मनाची जी जीवघेणी कुचंबणा झाली तिचेच विदीर्ण पडसाद त्यांच्या कवितांमधून उमटतात. मीतू  ही त्यांची गद्य व पद्याचा एकत्र वावर असलेली ही पत्रात्मक कादंबरी आहे. जीवनाचा एक भावगर्भ आविष्कार, माणसांच्या मनामनातले संवादी विसंवादी स्वर यात उमटले आहेत.

मुस्लिम मराठी साहित्य: परंपरा, स्वरुप आणि लेखक सूची (२००४) हा त्यांचा संपादित ग्रंथ. या ग्रंथाचे विभाजन तीन भागात केले असून पहिल्या भागात मुस्लिम परंपराचा परिचय करून दिलेला आहे. दुसर्‍या भागात स्वातंत्र्योत्तर मुस्लिम मराठी साहित्य प्रवाह यांचा परिचय करून दिला आहे. तिसर्‍या विभागात लेखकसूची केली आहे. मुस्लिम मराठी साहित्याचा प्रवाह हा मराठी साहित्याबरोबरच समांतरपणे संस्कृती समन्वयातून वाढत राहिला हे त्यांनी या ग्रंथातून मांडलेले आहे. मुस्लिम मराठी साहित्य : प्रेरणा आणि स्वरुप (२०१४)  त्यांनी सहभागाने संपादित केलेला ग्रंथ आहे.

त्यांच्या साहित्यसेवेसाठी त्यांना कवी केशवसूत राज्य पुरस्कार (१९८१-८२), यशवंतराव चव्हाण स्मृती साहित्य पुरस्कार, अंबेजोगाई (१९९४), हमीद दलवाई पुरस्कार, मुंबई (२००२), तुका म्हणे साहित्य पुरस्कार, बुलढाणा (२००७), सुशीलकुमार शिंदे साहित्य गौरव पुरस्कार, सोलापूर इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. शहाजिंदे यांच्या अनेक कवितांचा हिंदी, इंग्रजी भाषेतून अनुवाद झाला असून, त्यांच्या कविता अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.

संदर्भ :

  • शहाजिंदे, फ.म., मुस्लिम मराठी साहित्य : परंपरा , स्वरूप आणि लेखक सूची, लातूर, २००४.