परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत आणि सार्वत्रिक गरजांमध्ये सापडतो. आरोग्याबाबतची सर्वात महत्त्वाची आणि अत्यावश्यक गरज म्हणजे सेवा शुश्रूषा. योग्य शुश्रूषेमुळेच आजारपणात व्यक्तीस आधार मिळतो. जगात सर्व ठिकाणी शुश्रूषा हा परिचर्येतील प्राथमिक घटक असून रुग्णाची सेवा शुश्रूषा हा हजारो वर्षापासून चालत असलेला, आपणास ज्ञात नसलेल्या काळापासून रूढ असलेला आणि माणुसकीची कास धरून माणसाला जगवणारा, इतिहासाच्या पानांमधून स्रवणारा सुमधूर द्रव आहे. जगातला पहिला माणूस हाच पहिला डॉक्टर व पहिली माता हीच पहिली परिचारिका होय, असे म्हटल्यास अयोग्य ठरणार नाही. आपण यातून परिचर्येचे ममत्वाशी असलेले नाते लक्षात घेऊन मातृत्वाच्या भावनेतच परिचर्येतील सेवाभावाचा स्रोत दडलेला आढळतो.
परिचर्येची संकल्पना : वैद्यकशास्त्राप्रमाणेच परिचर्या हे शास्त्रही आहे आणि ती एक कला देखील आहे. परिचर्याशास्त्र हे एक सुघटित आणि व्यवस्थापित ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाचा वापर लोकांच्या आजारपणात तसेच निरोगी अवस्थेत चांगल्या प्रकारे करणे ही एक कला आहे. परिचर्याशास्त्राची उभारणी जीवशास्त्र आणि नैसर्गिक शास्त्रांच्या भक्कम पायावर झालेली आहे. परिचर्येच्या नवीन संकल्पनेनुसार संलग्न शास्त्रांचा आधार घेऊन (उदा., सामाजिक वर्तनविषयक आणि व्यवस्थापकीय शास्त्रातील प्रगती) परिचारणाच्या प्रक्रियेत समाजाच्या गरजेनुसार व काळातील बदलानुसार बदल घडवून आणलेला आहे.
नव्या संकल्पनेनुसार परिचारणाच्या प्रक्रियेत पुढील गोष्टींचा अंतर्भाव होतो. (Nursing process) : १) गरजांचे महत्त्व ठरविणे, २) सेवा शुश्रूषा कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करणे अथवा जुन्या कार्यक्रमात आवश्यकतेनुसार बदल आणि ३) सेवा शुश्रूषा कार्यक्रमाच्या परिमाणकारकतेचे मूल्यमापन.
भारतीय परिचर्या परिषद (Indian Nursing Council) : ही परिषद परिचर्येसंबंधातील अभ्यासक्रम व आकृतिबंध यावर नियंत्रण ठेवून परिचर्या शिक्षण व सेवा यातील गुणात्मकता राखण्याचा प्रयत्न करते. भारतीय परिचर्या परिषद ही प्रत्येक राज्यातील परिचर्या परिषदेवर अधिपत्य ठेवते. प्रत्येक प्रशिक्षित परिचारीकेला सेवा करणे यासाठी प्रमाणपत्र देण्याचे कार्य करीत असते.
सामाजिक आरोग्य परिचर्येकडे वाटचाल : गेल्या काही वर्षांत आरोग्याची बदलती संकल्पना ही प्राथमिक आरोग्य सेवा हे साधन व इ. स. २००७ पर्यंत सर्वांना आरोग्य या साध्यामुळे उजळून निघाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या ध्येयाला १९८१ मध्ये मान्यता दिल्याने प्रस्थापित आरोग्य सेवांमध्ये आमूलाग्र बदल घडून आला असून प्राथमिक आरोग्य सेवा हे सूत्र स्वीकारले गेले आहे.
लोक जेथे राहतात वा काम करतात तेथे त्यांना आरोग्य सेवा पुरविणे व आरोग्यवर्धन करणे ह्यावर आजकाल जास्त भर दिला जातो. म्हणूनच रोगावर आधारित शुश्रूषा या कल्पनेकडून सामाजिक आरोग्यावर आधारित शुश्रूषा अशी परिचर्याशास्त्राची वाटचाल होत आहे.
फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रथम परिचारिकेच्या भूमिकेशी निगडित अशा परिचर्या ह्या व्यवसायाने अनेक समस्यांना तोंड देत फार लांबवरचा प्रवास केलेला आहे. आता परिचारिकेच्या पारंपरिक भूमिकेचा विस्तार आणि विकास अनेक दिशांनी होत आहे हे शास्त्र आता केवळ रुग्ण शुश्रूषा या एकाच गोष्टीचा विचार करीत नाही आणि इस्पितळाच्या चार भिंतींमध्ये अडकून न पडता सामाजिक आरोग्यासारख्या सर्वसमावेशक बाबींचा गांभीर्याने विचार करीत आहे.
सामाजिक अथवा सार्वजनिक आरोग्य परिचर्या (Public Health and Public Health Nursing) :
जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ समितीनुसार जन आरोग्य परिचर्या म्हणजे, “आरोग्यवर्धन, सामाजिक व भौतिक पर्यावरणात सुधारणा घडवून आणणे तसेच रोग व अपंगत्व यांचा प्रतिबंध करणे व पुनर्वसन करणे यासाठी संपूर्ण जनआरोग्य कार्यक्रमाचा एक भाग म्हणून परिचर्याशास्त्रातील कौशल्ये, जनआरोग्य व सामाजिक साहाय्याचे काही भाग यांचा समुच्चय जन आरोग्य परिचर्येत केलेला आहे. जन आरोग्य परिचर्येचे महत्त्वाचे कार्य म्हणजे सुदृढ कुटुंबांना सेवा पुरविणे, रुग्णालयात भरती न झालेल्या रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची शुश्रूषा करणे तसेच समाजाच्या आरोग्यावर परिणाम करणार्या व्यक्तिगत व गटांच्या आरोग्य प्रश्नांचा बिमोड करणे.
सामाजिक आरोग्यावर दूरगामी परिणाम करणार्या परिचर्येच्या इतिहासात खरोखरच क्रांतिकारी कल्पना आहेत. या कल्पना समजून घेऊन नंतर त्यानुसार समाजात काम करता यावे म्हणून परिचर्या अभ्यासक्रमात समाजाला केंद्रस्थानी मानून त्या अनुषंगाने ज्ञान व कौशल्य शिकविण्यासाठी अभ्यासक्रमात अपेक्षित बदल केले जातात.
आरोग्य परिचर्येची तत्त्वे – परिचर्या ही एक प्रक्रिया असून त्यात खालील गोष्टींचा समावेश होतो.
१) समजून घेणे (Recognition or Identification) – गरजा ओळखण्यासाठी परिचर्येमध्ये निरीक्षण, जाणून घेणे व अंदाज बांधणे हे आवश्यक असते.
२) निदान करणे (Assessment – Nursing Diagnosis) गरजा ओळखल्यानंतर त्या भागविण्यासाठी विविध पर्यायांचे परिणामकारकतेसाठी निदान करणे, काय व कोणती कृती करण्यास ती व्यक्ती समर्थ आहे किंवा नाही याचा निर्णय घेणे.
३) उपाययोजना (Intervention) – समाजाच्या गरजा ओळखून त्यावर सर्वात जास्त अशी शुश्रूषाकृती परिचारिका करते. परिचारिकेच्या सर्वच कर्तव्यांचा त्यात समावेश होतो. म्हणून परिचर्या प्रशिक्षणाला समाजात महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे.
४) संघटन (organization)–परिचारिकेच्या परिचर्या कार्यक्रम आयोजित करण्याचे कसब व त्या कार्यक्रमाचे त्याच पद्धतीचे काम करणार्या संपूर्ण यंत्रणेमधील स्थान ठरविणे व त्यांचा समन्वय साधणे याचा समावेश होतो.
५) गुणवत्ता ठरविणे – मूल्यांकन (Evaluation) – यात परिचारिकेला उपाययोजनेच्या यशापयशाची माहिती करून गरजांची पूर्तता किती प्रमाणात झाली आहे याचा अभ्यास केला जातो. मूल्यांकनामुळे कार्यक्रम अधिक परिणामकारक करण्यासाठी करावयाच्या बदलांची सूचना तसेच दिशा मिळते.
परिचर्येची व्याप्ती : परिचर्येचा उगम आरोग्याच्या मूलभूत व सार्वत्रिक गरजांमध्ये सापडतो. वैद्यक शास्त्राप्रमाणे परिचर्या हे शास्त्रदेखील आहे आणि कला देखील आहे. परिचर्याशास्त्र वैद्यकीय क्षेत्राचा एक अविभाज्य घटक असल्यामुळे वैद्यकाच्या प्रगतीशील वावटळीत सापडून परिचर्याशास्त्राचा विकास झाला. सामाजिक आरोग्याच्या संकल्पनेतून सामाजिक आरोग्य परिचर्येचा जन्म झाला. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेमुळे (१९४८) जगभर परिचर्या सेवा कार्यक्षम आणि मजबूत करण्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळाली. याच काळात सुयोग्य आरोग्याचे युग (Era of positive health) या नवीन संकल्पनेचा उदय झाला. रोगी माणसांप्रमाणेच धडधाकट माणसांकडे लक्ष देण्यास सुरुवात झाली. व्यक्तीप्रमाणेच समष्टीच्या सेवा शुश्रूषेवरही भर देण्यात येऊ लागला. त्याकारणे आरोग्य हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध आणि मूलभूत अधिकार असे देशाच्या घटनेत नमूद केले गेले. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वैद्यकीय आणि परिचर्या मदतीचा हक्क मिळाला.
रुग्णालयातील परिचर्या ही उपचारात्म सेवांवर मुख्यतः आधारित असते. परिचर्या सेवा ह्या विविध प्रकारच्या व विस्ताराने वेगवेगळ्या असून त्या त्या संस्थेवर अवलंबून असतात. उदा., खेड्यातील रुग्णालये, जिल्हा रुग्णालये, अथवा शहरातील विशिष्ट सेवा देणारे वैद्यकीय महाविद्यालये इ. परिस्थिती व रुग्ण यांच्या गरजानुरूप परिचर्या सेवांचे नियोजन केले जाते. यात पुढील सेवांचा अंतर्भाव करता येतो. वैद्यकीय परिचर्या, शल्यशास्त्र परिचर्या, बालरोग परिचर्या, मानसरोग परिचर्या, स्त्रीरोग व प्रसुती परिचर्या तसेच सामाजिक आरोग्य परिचर्या इ. नजीकच्या काही वर्षांपासून प्रशिक्षित परिचारिका अतिविशिष्ट विभागांमध्ये परिणामकारक सेवा देत आहेत. उदा., हृदयरोग अतिदक्षता, वैद्यकीय अतिदक्षता, मेंदू व चेतासंस्था अतिदक्षता, मूत्रपिंड अतिदक्षता, तसेच रक्तपेढी इ.
पहा : रुग्णपरिचर्या
- Rebecca Nissanka, Comprehensive Textbook of Foundation of Nursing, 2015.
- I. Clement, Textbook Of Nursing Foundations, 2016.
- Dean Monika, Community Health Nursing, 2017.