अनादिकालापासून प्रत्येक स्त्रीला तिच्या कुटुंबातील कुणातरी आजारी व्यक्तीची परिचर्या करण्याचा प्रसंग आलेलाच असतो. रोग्याची शुश्रूषा करणाऱ्या स्त्रीला “नर्स” हा इंग्रजी शब्द रूढ झालेला असून तिला परिचारिका असे संबोधिले जाते.

परिचारिकेची व्याख्या : परिचारिकेच्या अनेक व्याख्या आहेत. व्हर्जिनिया हेन्डरसन (१९५८) यांच्या व्याख्येनुसार “आवश्यक शक्ती, इच्छा व ज्ञान असल्यास आरोग्य टिकविण्यासाठी अथवा बरे होण्यासाठी (क्लेशरहित मरण येण्यासाठी) आजारी किंवा निरोगी व्यक्ती साहाय्य न घेता ज्या कृती करेल त्या करण्यासाठी त्याला साहाय्य करणे हे परिचारिकेचे एकमेवाद्वितीय असे कार्य आहे. हे करताना शक्य तितक्या लवकर त्या व्यक्तीला आत्मविश्वास मिळवून देण्याकडेही जाणीवपूर्वक लक्ष पुरविले पाहिजे”.

शेटलॅन्ड (१९६५) यांनी केलेल्या व्याख्येनुसार, “आरोग्यवर्धन, रोगप्रतिबंधन, आरोग्यरक्षण तसेच रुग्णाची सेवा व त्याचे पुनर्वसन ही कार्ये जबाबदारीने व परिणामकारक करण्यासाठी मूलभूत परिचर्येचा अभ्यासक्रम पूर्ण केलेली व समाजात या कार्यासाठी लायक व मान्यताप्राप्त व्यक्ती म्हणजे परिचारिका होय.”

सामाजिक अथवा सार्वजनिक आरोग्य परिचारिका (Public Health and Public Health Nurse) : समाजातील व्यक्ती व कुटुंबांना आरोग्य सेवा व आरोग्य शिक्षण देण्यासाठी प्रत्यक्षपणे निगडित असलेली परिचारिका म्हणजे सार्वजनिक आरोग्य परिचारिका किंवा जन आरोग्य परिचारिका होय. (१९५९)

परिचर्येची आधुनिक संकल्पना – आधुनिक विचारांप्रमाणे परिचर्या सेवा फक्त रुग्णालयापुरत्या मर्यादित न राहता सर्व समाजापर्यंत पोहचण्यासाठी खालील गोष्टी अभिप्रेत आहेत.

 • वैद्यकीय व्यावसायिकांपेक्षा परिचारिका या लोकांसाठी महत्त्वाचे साधन बनतील.
 • नवनवीन कल्पनांना उदयास आणून कार्यक्रमाचे नियोजन व ते राबविणे यात परिचारिका सहभागी होतील.
 • लोकांना आरोग्यविषयक बाबींचे शिक्षण देण्यासाठी त्या पुढाकार घेतील.

परिचारिकेसाठी आवश्यक असलेले गुण व कौशल्य : मानवतावादी पैलूमुळे परिचर्या व इतर व्यवसाय यात प्रचंड अंतर पडते. मानवी वर्तणूक समजून घेण्यात प्रत्येक परिचारिकेला रस असणे आवश्यक आहे. प्रामाणिक व अथक परिश्रम आणि दुसर्‍याचे दुःख स्वतःचेच समजण्याची भावना हा परिचर्येसाठी अत्यंत आवश्यक आतलेला गुण आहे. इतर गुणांमध्ये प्रामाणिकपणा, सौजन्य, सेवाभाव, सहकार्याची भावना, ममत्व, सदैव तत्परता आणि जबाबदारी स्वीकारणे यांचा समावेश होतो. परिचारिकांसाठी अत्यंत आवश्यक असलेली कौशल्ये म्हणजे निरीक्षण, सुसंवाद, संभाषण आणि तांत्रिक बाबी इ. समावेश होतो. तसेच स्वयंशिस्त असणे जरुरीचे आहे.

परिचारिकेच्या जबाबदार्‍या : परिचर्येच्या मूलभूत तत्त्वावर परिचारिका समाजाच्या विशाल संदर्भ चौकटीत राहून पुढील जबाबदार्‍या पार पाडते.

 • रुग्णालयातील रुग्णांना केंद्रस्थानी मानून उपचारात्मक व प्रतिबंधात्मक रुग्णसेवा पुरविणे.
 • समाजात जनआरोग्य सेवा पुरविणे.
 • आरोग्याचे प्रश्न व गरजा ओळखणे – यात पायाभूत सर्वेक्षण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यातील नोंदींच्या अहवालाचा अभ्यास करणे तसेच सामान्यतः आढळणार्‍या रोगांविषयी माहिती मिळविणे. जन्म-मृत्यू व अपंगत्व यांच्या नोंदी ठेवणे.
 • आरोग्य समस्यांमध्ये प्राथमिकता ठरविणे – प्राथमिकता ठरविताना खालील निकष लावणे.
 • समस्येमुळे किती लोकांवर परिणाम झाला आहे. (Prevalence of Problem)
 • व्यक्ती व समाजासाठी असलेल्या समस्येचे गांभीर्य.
 • समस्येचे निराकरण किती तत्परतेने करणे आवश्यक आहे.
 • उपलब्ध साधन सामग्रीत समस्या सोडविणे कितपत शक्य व आवाक्यातील आहे.
 • नियोजन व प्रश्नांची सोडवणूक – यात सामाजिक आरोग्य परिचारिका नियोजनातील उद्दिष्ट ठरवून आरोग्य कर्मचार्‍यांसोबत आरोग्य समस्येचे निराकरण करते.
 • उपाययोजना व कार्यक्रम राबविणे – समाजाच्या आरोग्य गरजा व समस्या यांचे निराकरण करण्यासाठी सर्वात परिणामकारक उपाययोजना आरोग्य अधिकारी व इतर चमू यांचे सोबत अंमलात आणते. त्या परिचारिकेच्या सर्व पद्धती, कौशल्ये व कर्तव्ये यांचा समावेश होतो.
 • मूल्यांकन – यात उपाययोजना व राबविलेल्या कार्यक्रमांचे मूल्यांकन करून पुनर्नियोजन केले जाते.

परिचारिकेची कार्ये : 

 • व्यवस्थापन – आरोग्य कर्मचार्‍यांचा गटनेता तसेच त्यांच्याकडून दैनंदिन कामे करून घेणे, कामावर देखरेख ठेवणे, मार्गदर्शन करणे, योजनेचे नियोजन करणे, अंमलबजावणी करणे व अहवाल पाठविणे इ.
 • सुसंवाद – रुग्णालयातील विविध विभाग इतर रुग्णालये, संस्था व आरोग्य केंद्रे यांच्याशी संबंध प्रस्थापित करणे तसेच रुग्ण व कुटुंब, डॉक्टर व रुग्ण तसेच इतर कर्मचारी व समाज यांच्यात सुसंवाद निर्माण करणे, बैठकी घेणे व सहभागी होणे.
 • परिचर्या – सर्व वयोगटातील व्यक्ती व कुटुंबांना रुग्णालयात तसेच समाजात सर्वसमावेशक परिचर्या सेवा पुरविते.
 • शिक्षण देणे – यात विविध परिचर्या प्रशिक्षणात सहभाग तसेच आरोग्याविषया वैयक्तिक व गटशिक्षणासाठी आवश्यक ते ज्ञान व कौशल्य यांच्यामार्फत शैक्षणिक कार्यक्रम पार पाडणे.
 • संशोधन – परिचारिका ही तिच्या सेवेशी निगडित असलेल्या स्तरावरती संशोधन प्रक्रियेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या भाग घेत असते. संशोधनासाठी परिचर्येमध्ये अनेकविध विषय उपलब्ध असू शकतात. उदा., परिचर्या शिक्षण, सेवा शुश्रूषा, परिचर्या व्यवस्थापन इ.

या व्यवसायाकडे योग्य प्रशिक्षित स्त्रिया आकृष्ट होण्यासाठी अनेक उपाय योजण्यात येत आहेत. वेतन व सुविधांमध्ये वारंवार सुधारणा केल्या जात आहेत. पुरुष परिचारिकांची संख्या वाढविण्याकरिता अधिक प्रलोभनांची आवश्यकता आहे. उत्तम परिचारिका वैद्याची जागा घेऊ शकते. भारतासारख्या देशात जेथे वैद्यसंख्याच अपुरी आहे, तिथे अधिकाधिक  परिचारिकांची नितांत आवश्यकता आहे.

पहा : रुग्णपरिचर्या

संदर्भ :
 • Rebecca Nissanka, Comprehensive Textbook of Foundation of Nursing, 2015.
 • I. Clement, Textbook Of Nursing Foundations, 2016.
 • Dean Monika, Community Health Nursing, 2017.