छोटीया, सायरस होमी : ( १९ फेब्रुवारी १९४२ – २६ नोव्हेंबर २०१९ )
सायरस होमी छोटीया यांचा जन्म इंग्लंड येथे झाला. इंग्लंडमधील अॅलेन स्कूलमध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ डरहॅम येथून त्यानी १९६५ साली जीवरसायन (बायोकेमिस्ट्री) मधील पदवी मिळवली. स्फटिकविज्ञान (क्रिस्टलोग्राफी) मधील पदव्युत्तर अभ्यास त्यांनी बर्कवेक कॉलेज ऑफ लंडनमध्ये केला. युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन मध्ये पीटर पॉलिंग (लायनस पॉलिंग यांचे पुत्र) यांच्या मार्गदर्शनाखाली १९७० साली पीएच्.डी. चा प्रबंध पूर्ण केला. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘ॲसिटील कोलीन रसायनाची रचना व कार्य’ असा होता. ॲसिटील कोलीन हे एक चेतापारेषक (न्यूरोट्रान्समीटर) असून चेता उद्दीपित करण्यामागे या रसायनाचा महत्त्वाचा वाटा आहे.
पीएच्.डी. नंतर ते युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमधील लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायॉलॉजी (एल. एम. बी.) मध्ये काम करू लागले. १९७३ मध्ये सायरस एका मोठ्या शैक्षणिक प्रवासास निघाले. त्यांनी येल विद्यापीठाचे सर रिचर्डस, वाइजमन इन्स्टिट्यूटचे मायकेल लेव्हीट आणि पॅरिसच्या पाश्चर इन्स्टिट्यूटचे जोएल जेनीन यांच्याबरोबर काही काळ संशोधन केले. त्यातील मायकेल लेव्हिट यांच्याबरोबर अल्फा , बीटा, अल्फा –बीटा अशा प्रथिनांच्या वर्गीकरणावर संशोधन केले. अल्फा प्रथिन म्हणजे बहुपेप्टायाडे यांचे अल्फा पद्धतीचे वळण, बीटा प्रथिन म्हणजे बीटा पद्धतीचे वळण आणि अल्फा – बीटा म्हणजे दोन्ही अल्फा व बीटा बहुपेप्टायडे समांतर पद्धतीने एकत्र येऊन बनलेले प्रथिन. कोणत्याही प्रथिनाच्या त्रिमिती संरचनेचा त्याच्या कार्याशी संबंध असतो. शरीरातील प्रथिनांच्या रेण्वीय संरचनेवरून विविध आजारांचे निदान करता येते.
सायरस १९७६ मध्ये इंग्लंडमध्ये परतले. त्यानंतर १४ वर्षे ते युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन व एल. एम. बी. मध्ये कार्यरत राहिले. १९९० साली तिथे ते लीडर बनले. १९९२ साली ॲलेक्सी मुरझिन, स्टीव्हन ब्रेनर आणि टिम हब्बर्ड यांच्याबरोबर त्यांनी केलेल्या संशोधनातून प्रथिनांची संरचना मेंडेलिव्हने सुचवलेल्या मूलद्रव्याच्या आवर्त सारणीसारखी असते यासंबंधी संशोधन केले. एखादे किचकट प्रथिन दुसर्या व तिसर्या घडीच्या वेळी त्याची संरचना कशी असू शकेल हे या प्रथिन आवर्त सारणीवरून ठरवता येते.
जीनोमचा अभ्यास करताना केंद्रकी सजीव प्रथिनाच्या एकूण बाराशेपैकी उत्कृष्ट आणि महत्त्वाच्या दोनशे कुलाची संरचना उपलब्ध करण्यात आली होती. प्रथिनामधील अमिनो आम्लांच्या क्रमवारीवरून त्या प्रथिनाची संरचना, कार्यपद्धती आणि उत्क्रांती दर्शवली जाते. त्यावरून सजीव प्रथिनातील गुंतागुंतीची कल्पना येते. सजीवामध्ये एवढी विविधता कशी उत्पन्न झाली याचा अंदाज प्रथिनांच्या संरचनेवरून करता आला. यातूनच ‘प्रोटिऑमिक्स’ नावाची स्वतंत्र शाखा निर्माण झाली. आज प्रचलित असलेल्या प्रथिन वर्गीकरणाची पद्धत छोटिया यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आणि आजही ती अस्तित्वात आहे. अगदी किरकोळ बदल असलेली प्रतिक्षमता प्रथिने, असंख्य प्रतिजनांची ओळख कशी पटवतात हे नेमके कळले.
त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. त्यांना इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कॉम्प्युटेशनल बायॉलॉजी (ISCB) यांच्या तर्फे दिले जाणारे प्रतिष्ठित डॅन डेव्हिड पारितोषिक विभागून देण्यात आले. आयुष्यभर केलेल्या बायोइनफॉर्मॅटिक्स व कॉम्प्युटेशनल बायॉलॉजी मधील संशोधनाबद्दल त्यांना हा बहुमान मिळाला. त्यांच्याकडे एकोणीस पीएच.डी. व दोन पोस्ट डॉक्टरेट केलेले सर्व विद्यार्थी आज बायोइनफॉर्मॅटिक्स क्षेत्रात यशस्वी झाले आहेत.
वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- Cyrus Chothia – MRC Laboratory of Molecular Biology
- wwwmrc-lmb.cam.ac.uk › lmb-alumni › alumni › cyr.
समीक्षक : किशोर कुलकर्णी