सिचनोव्हर, आरॉन : ( १ ऑक्टोबर १९४७ )

आरॉन सिचनोव्हर यांचा जन्म हायफा येथे झाला. हा भाग ब्रिटिश संरक्षित पॅलेस्टाईनचा भाग होता. त्यांच्या जन्मानंतर दुसर्‍याच वर्षी आजचे इझ्रायल राष्ट्र उदयास आले.

सिचनोव्हर अकरा वर्षांचे असताना, त्यांना पहिलावहिला सूक्ष्मदर्शक मिळाला. त्याचे वडील बंधू जोसेफ यांनी तो त्यांना भेट दिलेला होता. जीवशास्त्र या विषयात प्राविण्य मिळवून त्यांनी हिब्रू विद्यापीठ जर, जेरुसलेम येथील हदास्सा मेडीकल स्कूलमधून एम.डी. पदवी मिळवली. तीन वर्षे इस्रायल सैन्यात युद्धसैनिकांसाठी चिकित्सक म्हणून त्यांनी सेवा दिली. नंतर ते टेक्निऑनमधील (इस्रायल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी) फॅकल्टी ऑफ मेडिसीनमधल्या एव्राम हर्श्को यांच्या प्रयोगशाळेत दाखल झाले आणि त्यांनी डी.एससी. ही पदवी मिळवली.

सिचनोव्हर, हर्श्को आणि रोज यांना १९८० च्या दरम्यान यांनी केलेल्या एकत्र संशोधनातून त्यांना आढळले की अतिरिक्त प्रथिने नष्ट करण्याचे काम पेशी टप्प्याटप्प्याने करतात. प्रथिने तयार कशी होतात हे त्यापूर्वी ठाऊक होते, परंतु अतिरिक्त प्रथिनाचे नियंत्रण कसे होते हे ज्ञात नव्हते. या तिघांनी मिळून हे कोडे सोडवले. युबिक्विटीन नावाचा रेणू प्रथिनांना जोडला जातो. युबिक्विटीनच्या मदतीने पुढे प्रथिनांचे अमिनो आम्लात विघटन होते. अमिनो आम्ले हे प्रथिनांचे मूलभूत घटक आहेत. युबिक्विटीन ज्यांच्या सोबत असेल अशाच प्रथिनांना पेशीमध्ये प्रवेश मिळू शकतो. त्यानंतर युबिक्विटीन रेणू प्रथिनांपासून वेगळे होतात त्यांचा पुनर्वापर होतो .

युबिक्युटिअस (ubiquitous) म्हणजे सर्वव्यापी म्हणून युबिक्विटीन हे या रेणूचे नाव ठेवले आहे. पेशीची नियंत्रण प्रक्रिया उदा., पेशी विभाजन, ‘डीएनए’ ची दुरूस्ती, प्रतिक्षमता प्रणाली आणि पेशी प्रथिनांची गुणवत्ता सांभाळणे अशा बाबींचे विश्लेषण यामुळे शक्य झाले. प्रथिनांचे योग्य विघटन झाले नाही तर दुर्धर रोग, चेतासंस्थेचा ऱ्हास किंवा शोथ हे विकार होऊ शकतात. सिचनोव्हर, हर्श्को आणि रोज यांच्या संशोधनामुळे पेशींची कार्यपद्धती समजली. त्यामुळे कर्करोगाशी लढा देऊ शकतील अशा औषधांची निर्मिती होऊ शकली. त्यांच्या युबिक्युटीनच्या शोधाबद्दल २००४ साली रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले.

जीवरसायनशास्त्रामध्ये महत्त्वाचे संशोधन करणाऱ्या सिचनोव्हर यांना दोन फेलोशिप मिळाल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी इस्रायलच्या टेक्निऑनमध्ये आपले संशोधन कार्य चालूच ठेवले. अनेक विद्यार्थी, फेलो आणि चिकित्सक यांची त्यांना साथ होतीच. सध्या ते याच संस्थेत एक मानांकित संशोधन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सदर संस्थेतील रॅपापोर्ट फॅकल्टी ऑफ मेडिसिन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमधील सेंटर ऑफ कॅन्सर अँड व्हास्कुलर बायोलॉजीमध्ये ते कार्य करत आहेत. त्यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत संशोधनासाठी अल्बर्ट लास्कर पारितोषिक आणि जीवशास्त्रीय संशोधनासाठी इस्रायली पुरस्कार मिळाले आहेत. ते इस्रायली अकादमी ऑफ सायन्सेस आणि ह्युमॅनिटीज, व्हॅटिकन येथील पॉन्टिफिकल अकादमी ऑफ सायन्सेस, अमेरिकेतील नॅशनल अकादमी ऑफ सायन्स इत्यादी संस्थांचे सदस्य आहेत.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा