कूपर, विलियम वेजर :  ( २३ जुलै, १९१४ ते २० जून, २०१२ )  

एके काळी व्यावसायिक मुष्टीयोद्धा (बॉक्सर) आणि हिशेब तपासनीस असे काम केलेल्या कूपर यांनी पुढे प्रवर्तन संशोधन (Operational Research) या विषयात भरीव कामगिरी केली. त्यांनी अमेरिकेतील शिकागो विद्यापीठातून अर्थशास्त्रात बी.ए. ही पदवी मिळवली. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पीएच्.डी.चे क्रमिक कार्यही त्यांनी पूर्ण केले, परंतु प्रबंध सादर करण्यापूर्वीच १९४२ मध्ये दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आपली सेवा अमेरिकेच्या सांख्यिकी प्रमाणीकरण विभागासाठी अर्पण केली. युद्धकाळात केलेल्या कामावरील त्यांच्या एका प्रकाशित लेखाला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटण्टसने सर्वोत्तम लेखाचे पारितोषिक दिले.

त्यांनी १९४६ ते १९७५ या काळात कार्नेगी मेलन विद्यापीठात वेगवगळ्या पदांवर अध्यापन केले. याच काळात त्यांची गाठ ए. चार्नेस या गणितीशी पडली आणि त्या दोघांचे अद्वितीय असे प्रदीर्घ सहसंशोधन व सहलेखन सुरू झाले. १९४९-५० च्या दरम्यान त्यांनी प्रसिद्ध मार्शल योजनेतही आपली सेवा दिली. त्यानंतर येत्या काळाची गरज ओळखून कूपर यांनी पुढाकार घेऊन व्यवस्थापन विज्ञानासाठी १९५३ मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस ही संस्था स्थापन केली आणि हा विषय पुढे नेण्यात मोठे योगदान दिले. ते या संस्थेचे पहिले अध्यक्ष म्हणून निवडले गेले. १९७५ ते १९८० या काळात हार्वड विद्यापीठात डिकन्स प्रोफेसर ऑफ अकौंटीन्ग म्हणून कूपरनी काम केले. पुढे १९८० ते १९९३, म्हणजे निवृतीपर्यंत युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस, ऑस्टीन येथे फॉस्टर पार्कर प्रोफेसर ऑफ मॅनेजमेंट अँड अकौंटीन्ग अशी त्यांची कारकीर्द घडली.

कूपर यांनी १९६० च्या दशकात अपूर्णांकी प्रायोजन (Fractional Programming) या नावाची अरेषीय प्रायोजनाची एक शाखा चार्नेस यांच्याबरोबर संशोधन करुन स्थापन केली. यामध्ये दोन फलांचा गुणोत्तर (ratio of two functions) या स्वरुपात उद्दिष्ट फल (objective function) मांडून त्यासाठी दिलेल्या संसाधनांच्या मर्यादेत इष्टतम उत्तर काढणे असे केले जाते. अपूर्णांकी प्रायोजनामुळे व्यवस्थापन, अर्थ आणि वित्तीय क्षेत्रातील निर्णय घेण्याचे विविध प्रश्न सोडवणे सुलभ झाले.

तसेच कूपर यांनी उद्देशीय प्रायोजन (Goal Programming) ही आणखीन एक नवी कल्पना चार्नेस यांच्यासोबत मांडून गणिती प्रायोजन या एकूण विषयालाच एक वेगळी दिशा दिली. उद्देशीय प्रायोजनाच्या त्यांच्या गणिती संरचना आणि सोडवण्याचा पद्धतीमुळे गणिती प्रायोजनाच्या चौकटीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अवश्य मिळू शकते, जी एक मोठी उपलब्धी आहे. असे उत्तर उपयोजनेसाठी फार महत्त्वाचे असते आणि व्यवस्थापनाला इष्टतम निर्णय घेण्यात अनेक प्रकारे मदत करते.

कूपर यांनी चार्नेस आणि इ. ऱ्होड्स यांच्यासोबत आधारसामग्री परिस्पर्शी विश्लेषण (Data Envelopment Analysis) हा एक नवीन गणिती विषय १९७८ साली विकसित केला आणि त्याची उपयुक्तता अनेक उपयोजनांमार्फत सिद्ध केली. या विषयातील संकल्पना आणि तंत्र व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्थांची कार्यक्षमता आणि मूल्यमापन करण्यात अतिशय उपयोगी ठरले आहे.

कूपर यांचे संशोधन अर्थशास्त्र, लेखाशास्त्र, व्यवस्थापन विज्ञान आणि प्रवर्तन संशोधन या चार क्षेत्रांत आहे. कूपर-लिखित आणि सहलिखित ५००हून अधिक शोधलेख आहेत.त्यांनी चार्नेससोबत १५० हून अधिक दर्जेदार शोधलेख प्रसिद्ध केले, जो गणिती सहलेखन सातत्याचा एक अविष्कारच मानला जातो. त्यांच्या नावावर २७ पुस्तकेही आहेत.

ऑपरेशन्स रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका आणि द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेण्ट सायन्सेस या संस्थांचे संयुक्त आणि अतिशय मानाचे असे जॉन फॉन नॉयमन थिअरी पारितोषिक आणि अमेरिकन सरकारने त्यांच्या लेखाशास्त्रातील योगदानासाठी एक विशेष पारितोषिक कूपर यांना देण्यात आली. प्रवर्तन संशोधनमधील पथदर्शी काम विचारात घेऊन द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑपरेशनल रिसर्च सोसायटीजच्या हॉल ऑफ फेम या यादीमध्ये २००६ साली कूपर यांचे नाव सामील करण्यात आले. तो या विषयातील सर्वोच्च सन्मान आहे. अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्मानीय पदव्या दिल्या.

कूपर हे Auditing: A Journal of Practice & Theory या जर्नलचे संस्थापक व प्रमुख संपादक होते.

संदर्भ : 

  • Ruefli, T. W. and Wiggins, R. R., “William W. Cooper”.(eds.: A.A. Asad andL. Gass),Profiles in Operations Research.International Series in Operations Research & Management Science. 147. Springer, 2011, p. 201. doi:10.1007/978-1-4419-6281-2.
  • William W. Cooper Professional Biography, Online Companion for “Abraham Charnes and W. W. Cooper (et a): A Brief History of a Long Collaboration in Developing Industrial Uses of Linear Programming”, Operations Research, Volume 50, Number 1, January–February 2002.

समीक्षक : विवेक पाटकर