थॉमसन, सी. जे. : (२९ डिसेंबर १७८८–२१ मे १८६५). डॅनिश पुरातत्त्वज्ञ आणि युरोपियन प्रागितिहासाचे जनक. पूर्ण नाव ख्रिश्चन युर्गेनसन थॉमसन (Christian Jűrgensen Thomsen). त्यांनी ‘त्रियुग सिद्धांत’ (3-Age-System)  ही पुरातत्त्वशास्त्रीय तंत्रपद्धती विकसित केली. मानवी संस्कृतीच्या विकासात विविध धातूंच्या वापराचे टप्पे आढळतात. या संकल्पनेचा उल्लेख रोमन कवी टायटस ल्युक्रेशस (इ.स.पू. १००/९०-५५) याच्या ‘डी रेरम नटुरा’ या काव्यात असला, तरी या संकल्पनेची शास्त्रशुद्ध मांडणी प्रथम थॉमसन यांनी केली (१८१८).

त्यांचा जन्म कोपनहेगन (डेन्मार्क) येथील एका श्रीमंत व्यापारी कुटुंबात झाला. त्यांना बालपणीच विविध कलात्मक पुरातन वस्तू जमवण्याचा छंद होता. तांब्याच्या कोरीव काम असलेल्या अनेक वस्तू आणि नाणी  त्यांनी संग्रहित केली होती. त्यांना विशेषतः मध्ययुगीन नाणी व त्यांच्या वर्गीकरणामध्ये अधिक रस होता. तिचा उपयोग त्यांना पुढे ‘त्रियुग सिद्धांत’ विकसित करण्यासाठी झाला. त्यांचे इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांवर प्रभुत्व होते.

महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांची डेन्मार्कमधील कोपेनहेगन येथील राष्ट्रीय संग्रहालयाचा अभिरक्षक म्हणून नियुक्ती झाली (१८१६) आणि त्यांच्याकडे डेन्मार्कमध्ये सापडलेल्या उत्खनित हस्तनिर्मित वस्तू सुव्यवस्थितपणे एकत्र लावण्याचे काम देण्यात आले. त्यांची मांडणी कालक्रमानुसार करताना त्यांनी या वस्तूंची विभागणी त्रियुग पद्धतीत केली. थॉमसन यांनी प्रथमच पुराव्यांच्या आधारे प्रागैतिहासिक काळ विविध युगांत विभागला. त्यामुळे पुरातनवस्तूंच्या ‘त्रियुग सिद्धांता’ चे जनक म्हणून ते ओळखले जाऊ लागले.

उत्खननातून व दफनव्यवस्थेतून मिळालेल्या प्राचीन काळातील मानवनिर्मित वस्तूंचे वर्गीकरण करणे, ही तत्कालीन अभ्यासकांसाठी एक मोठी समस्या होती. त्या वर्गीकरणाला प्रमाण नव्हते. स्कँडिनेव्हियन देशांतील अभ्यासकांनी उत्खननात उपलब्ध झालेल्या मानवनिर्मित वस्तूंची प्रथमच विस्मयकारक रूपरेखा मांडली. आणि त्या वस्तूंची एक सुसूत्र चौकट विकसित झाली. अनेक विद्वानांनी प्रागैतिहासिक काळ हा दगडी हत्यारांचा, त्यानंतर ब्राँझ, पितळ व लोखंडाचा काळ असावा, असे यापूर्वीच सुचविले होते; परंतु हा प्रस्ताव उत्क्रांतीचा एक भाग म्हणून मांडण्यात आला होता. त्यात पुराणवस्तूंचा काळ निश्चित झालेला नव्हता.

थॉमसन यांनी राष्ट्रीय संग्रहालयातील प्रागैतिहासिक उत्खनित मानवनिर्मित वस्तूंचे कालक्रमानुसार ⇨ अश्मयुग, ⇨ ब्राँझयुग व ⇨ लोहयुग या तीन भागांत वर्गीकरण केले. ही विभागणी  ‘त्रियुग सिद्धांत वा पद्धती ’ म्हणून प्रसिद्ध आहे. ती संग्रहालयाच्या Ledetraad til nordisk Oldkyndished (१८३६) या सूचीत प्रसिद्ध झाली.

१. अश्मयुग : थॉमसन यांनी संग्रहात असलेल्या असंख्य दगडी हत्यारांचा तसेच लाकूड व हाडांच्या साधनांचा उपयोग व वापर कसा झाला असेल, याचा अंदाज बांधला. तो याप्रमाणे : अश्मयुगातील मानव भटकत  असून त्यांनी प्रामुख्याने शिकारीसाठी व जीवनावश्यक साधने गोळा करण्यासाठी दगडी हत्यारांचा वापर केला असावा. हे  मानव प्राण्यांची शिकार तसेच फळे व कंदमुळे गोळा करून दैनंदिन गरजा भागवत असावेत,  ज्यासाठी  त्यांना कोणत्यातरी साधनाची गरज भासली असणार. त्या गरजेतूनच दगडी हत्यारांची निर्मिती झाली असावी. सुरुवातीच्या काळात या दगडी हत्यारांचा वापर कमी असावा. नंतरच्या काळातील हत्यारे सफाईदारपणे तयार केलेली, तसेच अनेक गोष्टींसाठी वापरलेलीही असावीत.

२. ताम्रयुग/ ब्राँझयुग : ह्या काळापासून मानवाने धातूचा वापर कसा करायचा, याचा शोध लावला. ह्या काळात कापण्याची हत्यारे व इतर पुराणवस्तूंसाठी कांस्य व तांब्याच्या धातूचा वापर केलेला दिसतो. हळूहळू मानवाने वसाहती निर्माण करीत शेतीचे ज्ञानही  संपादन केले.

३. लोहयुग – प्रागैतिहासिक काळातील हे तिसरे आणि शेवटचे युग. ह्या काळात लोखंड प्रामुख्याने वस्तूंसाठी वापरलेले दिसते. कांस्य धातूप्रमाणेच लोखंडाच्या वस्तूंचे उत्पादन करणे, ह्या युगातील मानवाने आत्मसात केले.

‘त्रियुग सिद्धांत’ हा पुरातत्त्वीय अवशेषांच्या आधारे प्रागैतिहासिक काळाची विभागणी करणारी पहिली पद्धती आणि कालक्रमणा मांडणारा पहिला प्रयोग होता. यापाठोपाठच डॅनिश पुरातत्त्वज्ञ जे. जे. ए. वोरसे यांनी डॅनिश दफनविधीचे टेकाड व पीट बॉग्स येथील उत्खननात ‘त्रियुग सिद्धांता’चा वापर करून त्यातून स्तरांची सप्रमाणता मांडली. १८६० पर्यंत संपूर्ण यूरोपमध्ये प्रागैतिहासिक काळातील तंत्रविज्ञानविषयक विभाजनासाठी हा ‘त्रियुग सिद्धांत’ स्वीकारला गेला. त्यामुळे पुरातत्त्वज्ञांना त्यांच्या शोधांचा संदर्भ लागत गेला. साधारणपणे १९२० पर्यंत ह्या सिद्धांताचा वापर फक्त युरोपातच नव्हे, तर आफ्रिका तसेच संपूर्ण प्राचीन जगात (अमेरिका सोडून) केला गेला.

थॉमसन यांची ही क्रमवादी संकल्पना किंवा मांडणी पुढील बहुतेक पुरातत्त्वज्ञांनी मानवाच्या प्रागैतिहासासाठी स्वीकारली. कालांतराने अत्याधुनिक सूत्रबद्ध सैद्धान्तिक चौकटी अस्तित्वात आल्या आणि  कालक्रमणापद्धती प्रगत झाली. ब्रिटिश पुरातत्त्वज्ञ जॉन लब्बॉक यांनी अश्मयुगाचे विभाजन पुराश्मयुग व नवाश्मयुग असे दोन भागांत केले. तसेच, कितीतरी देशांतील संस्कृती अश्मयुगानंतर कांस्ययुगाकडे गेल्याच नाहीत, तर काही संस्कृतींनी सरळ लोहाचा वापर केल्याचे आढळले. अश्म, ताम्र /कांस्य व लोहयुग हे तंत्रविज्ञानविषयातील स्पष्ट दिसणारे स्तर असले, तरीही अनियंत्रित असून त्यांच्या खुणा सामाजिक उत्क्रांतीशी साम्य दाखवत नाहीत, हे लक्षात येऊ लागले. परिणामी ‘त्रियुग सिद्धांत’ सांस्कृतिक घडामोडींसाठी अनावश्यक ठरला. आधुनिक पुरातत्त्वज्ञांनी भूतकाळातील जीवशास्त्रीय व सांस्कृतिक विभिन्नता उजेडात आणली. त्यामुळे ‘त्रियुग सिद्धांता’चे महत्त्व कमी झाले आणि  त्याचा वापर तंत्रविज्ञानविषयक वर्गवारीसाठी होऊ लागला.

 

संदर्भ :

  • Fagan, Brian M. Ed. The Oxford Companion to Archaeology, London, 1996.
  • Heizer, Robert F. The Background of Thomsen’s Three-Age System – Technology and Culture, Vol. 3, Baltimore, 1962.
  • Paddayya  K., ‘C. J. Thomsen and the Three Age System’, in Man and Environment, XVIII (2), 1993.
  • Paddayya K., ‘Essays in History of Archaeology:Themes, Institutions and Personalities’  Archaeological Survey of India, New Delhi, 2013.
  • Rowley-Conwy, Peter, ‘The Concept of Prehistory and the Invention of the Terms `Prehistoric’ and `Prehistorian’: The Scandinavian Origin, 1833–1850’, in European Journal of Archaeology, 2006.

समीक्षक – शरद राजगुरू