साहेलान्थ्रोपस टाकाडेन्सिस हे मानवी उत्क्रांतीशी संबधित एका प्रायमेट प्रजातीचे नाव आहे. मानवी पूर्वजांच्या संदर्भात या प्रजातीचे जीवाश्म सध्या सर्वांत प्राचीन आहेत. अगदी अलीकडच्या काळापर्यंत मानवी पूर्वजांचे सर्वांत जुने जीवाश्म ४० लक्षपूर्व एवढ्याच काळापर्यंतचे होते. मानवी उत्क्रांतीच्या दिशेने वाटचाल सुरू होण्याआधीच्या कपींचे मायोसीन (Miocene) काळातील ८० लक्ष वर्षांपूर्वीचे जीवाश्म माहिती होते. परंतु दरम्यानच्या सुमारे ४० लक्षपूर्व वर्षांमध्ये काय घडले, ते सांगणारे पुरावे उपलब्ध नव्हते. सन २००१ मध्ये सर्वप्रथम अशा जीवाश्मांचा शोध लागला. फ्रेंच पुराजीववैज्ञानिक मिशेल ब्रुनेट व त्यांच्या सहकाऱ्यांना मध्य आफ्रिकेतील चॅड या देशातील वाळवंटी भागात हे जीवाश्म सापडले. त्यांनी या प्रजातीचे साहेलान्थ्रोपस टाकाडेन्सिस असे नामकरण केले. दक्षिण सहारा वाळवंटातील ‘साहेलʼ या प्रदेशाच्या नावावरून साहेलान्थ्रोपस असे नाव पडले. साहेलान्थ्रोपस जीवाश्मांचा शोध आणखी एका कारणाने महत्त्वाचा आहे. ते कारण म्हणजे यापूर्वी मानवी उत्क्रांतीशी संबंधित अवशेष फक्त पूर्व व दक्षिण आफ्रिकेत आढळत होते. त्याप्रमाणे मध्य आफ्रिकेतही मानवाचे पूर्वज जास्त मोठ्या भागात पसरले होते, हे दिसून आले.

लहान आकाराची एक कवटी, काही दात आणि खालचा जबडा असे साहेलान्थ्रोपसचे अवशेष मिळाले आहेत. त्यांचा काळ ७० ते ६० लक्षपूर्व असा आहे. कवटीच्या आकारावरून असे दिसते की, तिचे आकारमान चिंपँझीपेक्षाही कमी म्हणजे ३५० घन सेंमी. एवढे होते. साहेलान्थ्रोपसमध्ये दोन मानवी वैशिष्ट्ये होती. हे प्रायमेट प्राणी बहुधा दोन पायांवर चालत होते आणि सुळ्यांचा आकार छोटा होता. आजच्या गोरिलांमध्ये असतो त्यापेक्षाहीसाहेलान्थ्रोपसच्या भुवईखालच्या हाडाचा भाग (Brow ridge) जाड होता. या अवशेषांमधून हे स्पष्ट झाले आहे की, साहेलान्थ्रोपसमध्ये कपी आणि मानव या दोन्हींसारखी वैशिष्ट्ये होती. अद्याप साहेलान्थ्रोपसच्या इतर भागांचे जीवाश्म सापडले नसल्याने ते काय खात होते, नर व मादी यांच्या आकारात काही फरक होता किंवा नाही हे समजू शकलेले नाही. साहेलान्थ्रोपसबरोबर मिळालेल्या इतर प्राण्यांच्या जीवाश्मांवरून ते जलाशयाच्या जवळ असलेल्या रानांत वास्तव्य करत असावेत, असे दिसते.

साहेलान्थ्रोपस हा चिंपँझी, गोरिला व मानवाचा समान पूर्वज असावा असे अनुमान काढण्यात आले आहे. परंतु ते सर्वमान्य झालेले नाही. त्यामुळे साहेलान्थ्रोपसचे मानवी उत्क्रांतिवृक्षावरील स्थान नक्की झालेले नाही. असे असले तरी पॉन्गिडी व होमिनिडी या कुलांमध्ये फारकत झाली. त्या काळातील साहेलान्थ्रोपस हा सर्वांत जुना दुवा आहे.

 

संदर्भ :

  • Larsen, C. S. Our Origins, New York, 2011.
  • Simpson, S. W. Ed., Larsen, C. S. ‘The Earliest Homininsʼ, A Companion to Biological Anthropology, pp. 314-340, Wiley-Blackwell, UK, 2010.

समीक्षक – शौनक कुलकर्णी