एक मूळभाजी. बीट या वनस्पतीचा समावेश ॲमरँटेसी कुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव बीटा व्हल्गॅरिस आहे. बीट, चाकवत व पालक या वनस्पतींचा समावेश पूर्वी चिनोपोडिएसी कुलात होत असे. आता चिनोपोडिएसीचा समावेश ॲमरँटेसी कुलात केला जातो. बीट वनस्पती भूमध्य समुद्राच्या आजूबाजूच्या प्रदेशात वन्य अवस्थेत वाढणाऱ्या बीटा मॅरिटिमा या जातीपासून निर्माण झाली आहे. तिचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी भाजीचा बीट म्हणजे टेबल बीट आणि साखरेचा बीट म्हणजे शुगर बीट हे प्रकार व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे आहेत. मुख्यत: सोटमुळांसाठी या वनस्पतीची लागवड करतात.

बीट ही द्विवर्षायू वनस्पती असून तिचे मूळ मांसल असते. मुळाचा रंग गडद लाल, पांढरा किंवा सोनेरी पिवळसर असून आकार शंकूसारखा, भोवऱ्यासारखा किंवा लांबट निमुळता असतो. जमिनीवर खंडित पानांचा झुबका असतो. फुले पानांच्या टोकाला मंजिरीत येतात. ती द्विलिंगी व बिनपाकळ्यांची असतात. फुलोऱ्यातील एकापेक्षा जास्त फुले एकत्र वाढून संयुक्त फळ तयार होते. फळ बोंड स्वरूपाचे असून पिकल्यावर आडवे फुटते. फळात २–५ गोलाकार बिया असतात. परागण वाऱ्याद्वारे होते.

बीटची मुळे प्रतिऑक्सिडीकारक आणि पोषके यांचा उत्तम स्रोत आहेत. त्यात बीटाइन नावाचे संयुग असते. हृदयाचे विकार होणाऱ्या पदार्थांपैंकी ‘होमोसिस्टीन’ नावाच्या पदार्थाचे शरीरातील प्रमाण कमी करण्याचे काम हे बीटाइन करते.

भाजीचा बीट (पानांसह)

भाजीच्या (टेबल) बीटच्या मुळांमध्ये कर्बोदके व प्रथिने आणि ऊष्मांक कमी असून आयर्न (लोह), जीवनसत्त्व आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात असते. पानांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि जीवनसत्त्व असते. भाजीचा बीट कच्चा किंवा उकडून खातात. मुळाचे तुकडे शिरक्यात मुरवून त्यापासून लोणचे तयार करतात. त्याच्या मुळांपासून बीटानीन हा रंग मिळतो. तो सॉस, जॅम, जेली इ. खाद्यपदार्थांना रंग येण्यासाठी  वापरतात.

साखरेचा बीट (पानांसह)

 

 

साखरेच्या (शुगर) बीटचे मूळ मांसल, पांढरे आणि शंकूच्या आकाराचे असते. या वनस्पतीला मूळ आणि पाने यांचा गुच्छ असतो. प्रकाशसंश्‍लेषणातून शर्करेची निर्मिती होते आणि ती मुळांमध्ये साठविली जाते. यात शर्करेचे प्रमाण मुळांच्या वजनाच्या १५–२०% असते. साखरेच्या बीटची लागवड भारतासह रशिया, अमेरिकेची संयुक्त संस्थाने आणि यूरोपातील सर्व देशांत केली जाते. जगातील साखरेच्या एकूण उत्पादनापैंकी सु. २०% साखर ही साखरेच्या बीटपासून तयार केली जाते.

फॉडर या प्रकारच्या बीटची मुळे केशरी-पिवळ्या रंगाची असतात. प्रामुख्याने जनावरांचे खाद्य म्हणून त्याची लागवड करतात. त्याची पाने आणि मुळे जनावरांसाठी पोषक असतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा