हठयोगप्रदीपिकेत प्राणायामाचे पूरक, रेचक व कुंभक असे तीन प्रकार आणि कुंभकाचे सहित व केवल हे दोन उपप्रकार सांगितले आहेत (प्राणायामस्त्रिधा प्रोक्तो रेचपूरककुम्भकै:| सहित: केवलश्चेति कुम्भको द्विविधो मत:|| हठयोगप्रदीपिका २.७१ ).
पूरक म्हणजे जाणीवपूर्वक घेतलेला प्रमाणबद्ध व अनुशासित असा श्वास, रेचक म्हणजे जाणीवपूर्वक सोडलेला प्रमाणबद्ध व अनुशासित असा उच्छ्वास आणि कुंभक म्हणजे जाणीवपूर्वक केलेला प्रमाणबद्ध व अनुशासित असा ‘श्वसननिरोध’ होय. “प्राण अर्थात देहातील वायू जास्त काळ धरून ठेवणे म्हणजे कुंभक” अशी कुंभकाची व्याख्या योगकुण्डली उपनिषदात (२०) केली आहे.
सहितकुंभक म्हणजे पूरक व रेचक यांच्यासह केलेला कुंभक. वसिष्ठसंहितेत असे म्हटले आहे की, “जाणीवपूर्वक श्वास आणि उच्छ्वास या क्रियांसहित जो कुंभक केला जातो त्याला सहितकुंभक म्हणतात” (विरेच्यापूर्य यं कुर्यात् स वै सहितकुम्भक:| वसिष्ठसंहिता ३.२८ अ).
पूरकानंतर केलेला ‘अभ्यंतर’ किंवा ‘पूर्ण कुंभक’ आणि रेचकानंतर केलेला ‘शून्य’ किंवा ‘बाह्य कुंभक’ हेदेखील ‘सहितकुंभक’ होत. परंतु, श्वासोच्छवास आपोआप बंद होऊन श्वास आत किंवा बाहेर स्वभावत:च ज्यावेळी रोखला जातो, म्हणजेच जेव्हा कुंभक आपोआप घडतो, तेव्हा त्याला ‘केवलकुंभक’ अशी संज्ञा आहे. योगकुण्डली उपनिषदानुसार सूर्य, उज्जायी, शीतली किंवा भस्त्री या प्राणायामासह असलेल्या कुंभकाला सहितकुंभक म्हणतात (१.२१).
घेरण्डसंहितेत कुंभकाचे सहित, सूर्यभेद, उज्जायी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्च्छा आणि केवली हे आठ प्रकार सांगितले आहेत (सहित:सूर्यभेदश्च उज्जायी शीतली तथा| भस्त्रिका भ्रामरी मूर्च्छा केवली चाष्टकुम्भका:|| घेरण्डसंहिता ५.४६). तर, हठयोगप्रदीपिकेत सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्च्छा व प्लाविनी हे आठ कुंभक सांगितले आहेत (सूर्यभेदनमुज्जायी सीत्कारी शीतली तथा| भस्त्रिका भ्रामरी मूर्च्छा प्लाविनीत्यष्ट कुम्भका:|| हठयोगप्रदीपिका २.४४).
सहितकुंभकात ॐचा उच्चार करून पूरक, रेचक व कुंभक केले की, त्यास ‘सगर्भ सहित प्राणायाम’ म्हणतात व मंत्रोच्चाराशिवाय हा तिन्ही अंगांनी युक्त असा प्राणायाम केला की, त्याला ‘निगर्भ सहित प्राणायाम’ अशी संज्ञा आहे (घेरण्डसंहिता ५.४७-५१). सगर्भ प्राणायामाची साधना ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रयींवर श्रद्धा असलेले साधक करतात आणि मन:चक्षुसमोर त्यांची प्रतिमा आणतात. ध्यानबिन्दु उपनिषदात असे म्हटले आहे की, पूरक प्राणायाम करताना ब्रह्माचे, कुंभक करताना विष्णूचे व रेचक करताना रुद्राचे ध्यान करावे (२१).
सगर्भ सहित प्राणायाम आणि निगर्भ सहित प्राणायाम यामध्ये दोन प्रकारचा भेद ठळकपणे सांगता येईल तो असा की, सगर्भ प्राणायामात कुंभकाचा काळ एखाद्या मंत्राचे उच्चारण करून व त्याची पुनरावृत्ती करून ठरवितात. तर, निगर्भ सहित प्राणायामात डाव्या हाताचा तळवा डाव्या गुडघ्यावर विशिष्ट काळ फिरवून त्या कालावधीप्रमाणे प्राणायामाचे परिमाण मोजतात. साधारण वेगाने गुडघ्याभोवती तळवा फिरवून एक चुटकी वाजविणे याला एक मात्रेचा काळ म्हणतात (योगतत्त्वउपनिषद् ४०).
वसिष्ठसंहितेत असे म्हटले आहे की, “सहित आणि केवल हे कुंभक नित्यनियमाने करावेत. सहितकुंभकाचा अभ्यास केवलकुंभकाची सिद्धी होईपर्यंत करावा” (सहितं केवलं चाथ कुम्भकं नित्यमभ्यसेत्|| यावत्केवलसिद्धि: स्यात् तावत् सहितमभ्यसेत्|| (वसिष्ठसंहिता ३.२८ ब-२९, योगकुण्डली उपनिषद् २०)
पहा : नाडीशुद्धी, प्राणायाम, केवली प्राणायाम.
संदर्भ :
- दलाई, बी. के. योगोपनिषद्, संस्कृत प्रगत अध्ययन केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे, २०१५.
- देवकुळे व. ग., घेरण्डसंहिता, मे. शारदा साहित्य, पुणे, १९८५.
- देवकुळे व. ग., हठप्रदीपिका, मे. शारदा साहित्य, पुणे.
समीक्षक : दुर्गादास सावंत