प्राणायामात जेव्हा चंद्रनाडीने म्हणजे डाव्या नाकपुडीने पूरक व रेचक केला जातो, त्यास चंद्राभ्यास किंवा चंद्रभेदन प्राणायाम असे नाव आहे. चंद्रनाडीने म्हणजेच ईडा किंवा सव्य नाडीने श्वास ग्रहण केला असताना शरीरात शीतलता निर्माण होते व शरीरातील उष्णतेचे संतुलन होते. डावी नाकपुडी ‘परानुकंपित स्वयंचलित चेतासंस्थे’शी (Parasympathetic Autonomous Nervous System) संबंधित असल्याने या प्राणायामामुळे शरीरातील सर्व चयापचय क्रिया (Metabolism) संथ होतात त्यायोगे उष्णता कमी होऊन शरीरांतर्गत शीतलता अनुभवास येते.

चंद्रतत्त्व व सूर्यतत्त्व यांच्यात समत्व ठेवण्याकरिता कुबडीच्या आधारे डाव्या किंवा उजव्या काखेत दाब आणून योगी ठराविक वेळी ठराविक नाकपुडीतून श्वासोच्छ्वास करण्याचे तंत्र अवलंबितो आणि अशा प्रकारे नेणिवेच्या कक्षेत असलेल्या श्वसनकार्यावर जाणिवेचे नियंत्रण आणतो व आपल्या इच्छेप्रमाणे पाहिजे त्या नाकपुडीने श्वसनकार्य घडवून आणतो.

चंद्राभ्यास प्राणायाम

कृती : या प्राणायामासाठी पद्मासनात अथवा स्वस्तिकासनात बसावे. मूलबंध लावावा. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करावी. डाव्या नाकपुडीने पूरक करावा. दोन्ही नाकपुड्या बंद करून जालंधरबंध लावावा. यथाशक्ती कुंभक करावा. कुंभक संपेपर्यत मूलबंध, जालंधरबंध व उड्डियानबंध ठेवावा. कुंभक संपल्यावर मस्तक वर करावे. उजव्या हाताची चार बोटे उघडून डावी नाकपुडी रेचकास खुली करावी. सावकाश रेचक पूर्ण करावा. क्षणभर थांबून पुन्हा पूरक, रेचक व कुंभक अशी एकामागून एक आवर्तने करावी.

विधिनिषेध आणि लाभ : नाक चोंदले असता हा प्राणायाम वर्ज्य करावा. हा प्राणायाम हिवाळ्यात कमी व उन्हाळ्यात अधिक करावा. सूर्यभेदन व चंद्राभ्यास यांची आवर्तने शक्यतो सारखीच असावीत. यांचा जोडीने अभ्यास करावा. तरुण वयात चंद्राभ्यास, तर प्रौढत्वात सूर्यभेदन प्राणायाम अधिक उचित ठरतो.

चंद्राभ्यासाची दिवसातून एक वेळ २० ते ३० आवर्तने करावीत. त्यावेळी दृष्टी अर्धोन्मिलित असावी तसेच मन प्राणधारणेवर किंवा चंद्रबिंबाच्या कल्पनेवर स्थिर करावे.

सूर्यभेदनास पूरक म्हणून हा प्राणायाम करतात. अनुलोमविलोम प्राणायामाच्या अभ्यासाने उष्णता व शीतलतेचे संतुलन स्वाभाविकपणे होते, म्हणून साधकाने विशिष्ट काळात सूर्यभेदन किंवा चंद्राभ्यास यापैकी एकच प्राणायाम करणे संयुक्तिक होईल. त्यामुळे वय, ऋतु, विशिष्ट आजार या घटकांवर ही निवड केल्यास रोग दूर होतात. उच्च रक्तदाब, अति-कंठस्थ ग्रंथिस्राव विकार (Hyperthyroidism), अति-आम्लविकार यामध्ये चंद्राभ्यास प्राधान्याने करावा; तर दमा, सायनसाईटीस (Sinusitis) अशा कफविकारांमध्ये तसेच निम्न रक्तदाब, निम्न-कंठस्थ ग्रंथिस्राव विकार (Hypothyroidism) असताना चंद्राभ्यास टाळावा.

हठप्रदीपिकेत व घेरण्डसंहितेत सूर्यभेदन प्राणायामाचा अष्टकुंभकात निर्देश आहे. चंद्राभ्यास प्राणायामाचा उल्लेख मात्र या ग्रंथात नाही. परंतु, असे अनुभवास येते की  ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी |’ अर्थात शास्त्रापेक्षा परंपरा प्रभावी असते. योग हे प्रायोगिक शास्त्र असल्यामुळे त्यात गुरूचे व परंपरेचे माहात्म्य अधिक मानले जाते. त्या आधारावर चंद्राभ्यास प्राणायाम केला जातो.

पहा : सूर्यभेदन प्राणायाम.

समीक्षक : दुर्गादास सावंत