सत्कार्यवाद हा सांख्य-योग दर्शनांचा महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार कोणतीही गोष्ट उत्पन्न होत नाही किंवा नष्ट होत नाही; ज्या वस्तू अस्तित्वात आहेत, त्यांच्या स्वरूपामध्ये फक्त परिवर्तन होते. सर्वसाधारणपणे ‘कार्य’ शब्दाचा अर्थ मराठीमध्ये ‘काम’ किंवा ‘क्रिया’ असा होतो; परंतु दार्शनिक परिभाषेनुसार, जे उत्पन्न होते, त्याला ‘कार्य’ म्हणतात व ज्यापासून त्याची उत्पत्ती होते, त्याला ‘कारण’ असे म्हणतात. सर्वसाधारणपणे ‘वस्तू उत्पन्न झाली किंवा नष्ट झाली’ असे आपण म्हणतो, परंतु सांख्य-योग दर्शनांमध्ये ‘उत्पत्ती आणि विनाश’ यांऐवजी अनुक्रमे ‘आविर्भाव आणि तिरोभाव’ किंवा ‘प्रसव आणि प्रतिप्रसव’ या शब्दांचा उपयोग केला जातो. आविर्भाव म्हणजे कारणातून कार्य प्रकट होणे आणि तिरोभाव म्हणजे कार्य पुन्हा कारणामध्ये/अन्य रूपामध्ये विलीन होणे. एखाद्या सुताराने लाकडापासून खुर्ची बनविली, तर तो खुर्चीला नव्याने उत्पन्न करीत नाही; तर जे लाकूड आधीपासून अस्तित्वात आहे, त्याच्या रूपात तो फक्त बदल घडवितो. त्याचप्रमाणे, जर एखाद्याला ती खुर्ची नष्ट करायची असेल, तर तो तिचे छोटे तुकडे करेल किंवा तिला जाळून टाकेल. परंतु, तुकडे केल्याने किंवा जाळल्याने त्या वस्तूचा संपूर्ण विनाश होऊ शकत नाही, तर जी वस्तू खुर्चीच्या रूपात अस्तित्वात होती, फक्त तिच्या रूपात परिवर्तन होऊन तिचे तुकडे किंवा राख होते. म्हणजेच आधी जी वस्तू अस्तित्वात असते, तिच्या रूपात परिवर्तन केल्याने तिला नवीन स्वरूप प्राप्त होते, यालाच आपण उत्पत्ती किंवा विनाश म्हणतो. परंतु, जे अस्तित्वात आहे त्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही आणि जे अस्तित्वात नाही, त्याची कधीही उत्पत्ती होऊ शकत नाही. भगवद्गीतेमध्येही हा विचार आढळतो (‘नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सत:’ | २.१६). हाच सिद्धांत सत्कार्यवाद या नावाने प्रसिद्ध आहे.

‘एका बीजाला अंकुर फुटला, मग त्याचे रोप झाले आणि कालांतराने त्याचा वृक्ष झाला’ या सर्व प्रक्रियेमध्ये एकाच वस्तूमध्ये परिवर्तन (परिणाम) होऊन तिचे स्वरूप बदलते. नवीन वस्तू उत्पन्नही होत नाही व नष्टही होत नाही. ज्या वस्तूमध्ये परिणाम होऊन तिचे स्वरूप बदलते, तिला ‘उपादान’ असे म्हणतात व ज्या कारणांमुळे परिवर्तन घडते त्यांना ‘निमित्त’ असे म्हणतात. उदाहरणार्थ, बीजापासून जेव्हा अंकुर बनतो, तेव्हा त्या बीजाला ‘उपादान’ असे म्हणता येईल व अंकुर बनण्यासाठी आवश्यक असणारे माती, पाणी, सूर्यप्रकाश इत्यादी घटक ‘निमित्त’ आहेत असे म्हणता येईल. एखाद्या वस्तूमध्ये परिवर्तन होऊन तिचे भावी स्वरूप काय असेल, यासाठी निमित्त कारण हे नियामक असते, उपादान कारण नियामक नसते. म्हणजे बीजापासून अंकुर बनणार की अन्य काही, हे निमित्तावर अवलंबून असते; बीजावर नाही. जर बीजाचा माती, पाणी इत्यादी निमित्तांशी संयोग झाला, तर त्याचा भावी परिणाम अंकुर रूपात होईल; परंतु त्याच बीजाचा अग्नीशी संयोग झाला, तर त्याचा भावी परिणाम राखेच्या रूपात होईल. म्हणजे भावी परिणाम काय होणार हे उपादानावर अवलंबून नसते, तर निमित्तावर अवलंबून असते. निमित्त हे उपादानामध्ये असणाऱ्या शक्तीला केवळ व्यक्त करण्याचे काम करते, त्यामध्ये शक्ती उत्पन्न करत नाही (निमित्तम् अप्रयोजकं प्रकृतीनां वरणभेदस्तु तत: क्षेत्रिकवत् | योगसूत्र ४.३). जसे, माती, पाणी, सूर्यप्रकाश आदी घटक बीजामध्ये सूक्ष्मरूपाने असणाऱ्या अंकुराला केवळ व्यक्त करण्याचे काम करतात; ते बीजामध्ये अंकुर उत्पन्न करण्याची शक्ती निर्माण करीत नाहीत. अंकुर उत्पन्न करण्याची शक्ती बीजामध्ये आधीपासूनच असते, त्यामुळे कार्य हे कारणात उत्पत्तीच्या पूर्वीही असते, असे सांख्य आणि योग दर्शने मानतात. बीजापासून अंकुर उत्पन्न होण्याआधीही त्यात अंकुर असतो, पण तो सूक्ष्म रूपाने अवस्थित असतो. बीजाला योग्य निमित्त मिळाल्यावर त्यातील अव्यक्त अंकुर व्यक्त होतो आणि नंतर अंकुरात बीज अव्यक्त रूपाने राहते.

सत्कार्यवादाच्या पुष्ट्यर्थ पुढील कारिकेमध्ये पांचतर्क देण्यात आलेले आहेत –                                                                                                                                                                      (असदकरणात् उपादानग्रहणात् सर्वसम्भवाभावात् | शक्तस्य शक्यकरणात् कारणभावाच्च सत्कार्यम् || सांख्यकारिका  ९)

(१) असद्-अकरणात् : ‘असत्’ म्हणजे जी वस्तू अस्तित्वात नाही, ती अन्य वस्तूच्या उत्पत्तीसाठी कारण बनू शकत नाही. हा पहिला तर्क बौद्ध दार्शनिकांच्या मताचे खंडन करतो. बौद्ध दर्शनानुसार ‘असत्’ (अस्तित्वात नसलेले) कारण ‘सत्’ कार्याला उत्पन्न करते. सर्वसाधारणपणे बीज हे वृक्षासाठी कारण आहे असे मानले जाते, परंतु बौद्ध दार्शनिक ‘बीजाचा नाश’ वृक्षासाठी कारण मानतात. कारण, जोपर्यंत बीज ‘बीज’ आहे, तोपर्यंत ते ‘वृक्ष’ बनू शकणार नाही. वृक्ष बनण्यासाठी बीजाला आपले ‘बीजत्व’ सोडावे लागेल. म्हणजेच बीजाचा नाश वृक्षाच्या उत्पत्तीसाठी कारण आहे. याप्रकारे असत् पदार्थापासून सत् पदार्थाची उत्पत्ती होते, असे बौद्ध मानतात. परंतु, सांख्यदर्शन हे मत मान्य करीत नाही. जर कारण स्वत:च अभावरूप असेल तर ते भावरूप पदार्थाला उत्पन्न करू शकणार नाही. वृक्षाला व्यक्त करण्याचे सामर्थ्य बीजात आहे, त्यामुळे बीजाचे अस्तित्व आवश्यक आहे. कारणाला असत् मानता येणार नाही.

(२) उपादान-ग्रहणात् : आपणास जर एखादे कार्य हवे असेल तर आपण त्याच्या उपादानाचे ग्रहण करतो. उदाहरणार्थ, जर खुर्ची बनवायची असेल तर आपण लाकडाचे ग्रहण करतो, कागदाचे नाही; कारण आपल्याला माहीत आहे की, खुर्ची सूक्ष्म रूपाने लाकडामध्ये अस्तित्वात आहे; कागदात नाही. एखादी वस्तू प्राप्त करण्यासाठी विशिष्ट कारणाचेच ग्रहण केले जाते, यावरून सिद्ध होते की ती वस्तू आधीपासूनच तिच्या उपादानात अस्तित्वात आहे, ती नव्याने उत्पन्न होत नाही.

(३) सर्व-सम्भव-अभावात् : सर्व कारणांपासून सर्व कार्यांची उत्पत्ति होत नाही. जर वस्तू नव्याने उत्पन्न होतात असे मानले, तर कशापासूनही कशाचीही उत्पत्ति व्हायला हवी, परंतु तसे होत नाही. ठराविक कारणापासून ठराविक कार्याची उत्पत्ति होते. यावरून सिद्ध होते की, कार्य उत्पत्तीच्या पूर्वीपासूनच कारणात सूक्ष्म रूपाने अस्तित्वात असते.

(४) शक्तस्य-शक्यकरणात् : प्रत्येक कारणामध्ये ठराविक कार्य उत्पन्न करण्याचीच शक्ती असते. ज्या कारणात जे कार्य उत्पन्न करण्याची शक्ती आहे, तेच कार्य ते उत्पन्न करू शकते. कार्य उत्पन्न करण्याची शक्ती म्हणजेच उत्पत्तीच्या पूर्वी कार्याचे सूक्ष्म रूपाने कारणात अवस्थित असणे होय.

(५) कारण-भावात् : भाव म्हणजे अस्तित्त्व होय. उत्पत्तीच्या आधीही कार्य विद्यमान असते, परंतु त्याचे अस्तित्व स्वतंत्र नसून ते कारणाच्या रूपातच असते.

या पाच तर्कांद्वारे सत्कार्यवादाची मांडणी सांख्य दार्शनिक करतात. हा सिद्धांत सांख्य आणि योग या दोन्ही दर्शनांमध्ये समानरूपाने स्वीकारला गेला आहे. परिणामवाद हे सत्कार्यवादाचेच अन्य नाव आहे. न्याय आणि वैशेषिक दर्शने ‘वस्तूंची नव्याने उत्पत्ती आणि विनाश होतो’ असे मानणाऱ्या आरंभवादाचे प्रतिपादन करतात. अद्वैत वेदान्ती – ‘उत्पन्न आणि विनष्ट होणारे सर्व पदार्थ अविद्येमुळे भासित होतात व जगतातील सर्व पदार्थ हे चैतन्यस्वरूप आत्म्यावर अध्यस्त आहेत’ या विवर्तवादाच्या सिद्धांताचे प्रतिपादन करतात. बौद्ध दार्शनिक ‘सर्व पदार्थ एका क्षणात उत्पन्न होतात आणि दुसऱ्या क्षणात नष्ट होतात’, असे मानणाऱ्या क्षणिकवादाचे प्रतिपादन करतात. सत्कार्यवादाचा सिद्धांत सांख्य आणि योग या दर्शनांनी मानला आहे.

संदर्भ :

  • ब्रह्मलीन मुनि, पातञ्जल योगदर्शन, चौखम्भा संस्कृतसंस्थान, वाराणसी, २००३.
  • कर्णाटक, विमला, अनु. साङ्ख्यकारिका, वाराणसी, १९८४.

समीक्षक : कला आचार्य