टेलफर्ड थॉमस (९ ऑगस्ट १७५७ – २ सप्टेंबर १८३४) थॉमस टेलफर्ड या स्कॉटिश अभियंत्याचा जन्म डंफ्रिशायरमधील ग्लेंडिग्निग (Glendigning) येथे झाला. त्याच्या जन्मानंतर लवकरच वडलांचे निधन झाल्याने त्याचे प्राथमिक शिक्षण होऊ शकले नाही. म्हणून वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांना दगडी कामावर एक गवंडी म्हणून अनुभव घेण्यास प्रारंभ करणे प्राप्त झाले. प्रथम त्यांनी एडिंबरा येथे काम केले आणि रात्रीच्या शाळेमधून अभ्यास करुन शिक्षण घेतले. तीव्र बुद्धिमत्ता आणि महत्वाकांक्षा या जोरावर त्यांनी आपल्या कामावर व अभ्यासावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करुन सर्वांगीण ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला. नंतर वयाच्या २५ व्या वर्षी लंडनला गेल्यावर तेथे विल्यम पुल्तेनी (William Pulteny) या एका प्रख्यात धनिकाशी त्याचा संपर्क आला. टेलफर्डमधील विशेष गुणांची जाण झाल्याने पुल्तेनीच्या शब्दाने त्यांना श्रॉपशायरमध्ये सार्वजनिक विभागामध्ये मोजणीदार म्हणून काम मिळाले. तेथे रॉबर्ट ॲडम आणि सर विल्यम चेंबर्स या वास्तुविशारदांशी त्यांचा संपर्क आला. त्यावेळी अभियांत्रिकी अगदी प्रथमावस्थेत होती म्हणून आपण वास्तुविशारद व्हावे असा त्यांचा मानस होता. त्यानुसार त्यांनी श्रुसबरी येथील किल्ला आणि काही चर्चच्या इमारती यांच्या नूतनीकरणाची कामे वास्तुरचनाकार म्हणून यशस्वीरित्या हाताळली. तेथील एका चर्चची इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचे त्यांनी सांगितले होते आणि त्यानंतर तीनच दिवसात ती कोसळली. त्यांचे निदान बिनचूक ठरल्याने त्या परगण्यात टेलफर्ड यांचे नाव चर्चेत आले.

डी नदीवर पाँटेसीलाईट जलवाहक पूल

गवंड्यापासून मोजणीदारापर्यंत कामे करतांना टेलफर्ड त्यांनी प्रत्यक्ष बांधल्या जाणाऱ्या संरचनांच्या अभिकल्पापासून कामात वापरलेल्या मालांच्या गुणधर्मापर्यंत सर्वच बाबींचा सखोल अभ्यास करुन आपले सर्व लक्ष अभियांत्रिकीकडे वळविले आणि मग रस्ते, कालवे, बंदरे आणि चर्चच्या इमारती हे त्यांच्या आयुष्यातील प्रमुख विषय बनले. आज A-5 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लंडन ते हॉलिहेड या महामार्गाचा (Trunk Road) बराचसा भाग फार पूर्वीपासून अस्तित्वात होता आणि त्याच्या नूतनीकरणाचे काम १७९१ च्या सुमारास टेलफर्ड यांनी केले होते. याच रस्त्यावरील सेव्हर्न (Severn) नदीवरील माँटफर्ड येथील दगडी पुलाचे अभिकल्प हे त्याकाळी एक अभियांत्रिकी आश्चर्य म्हणून मानले जायचे. या पुलाने टेलंफर्ड यांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि १७९३ साली रेक्सहॅम (Wrexham) पासून एलेस्मीअर-चेस्टरमार्गे मेर्सी (Mersey) नदीला मिळणाऱ्या एलेस्मीअर कालव्याच्या (Ellesmere Canal) प्रकल्पावर टेलफर्ड यांची नेमणूक करण्यात आली. या प्रकल्पातील पाँटेसीलाईट (Pontesylite) हाडी (Dee) नदीवर बांधलेला जलवाहक पूल (Aqueduct) ही एक नाविन्यपूर्ण संरचना होती. १३ मी. अवधीच्या १९ कमानी असलेला हा खालच्या दरीवरील पूल ३८ मी. उंचीवर आहे. या अभिकल्पात टेल्फर्ड यांनी प्रथमच ओतीव लोखंडाचा (Cast lron) उपयोग केला आणि या लोखंडातील सांधे (Joints) संपूर्णपणे बंद (Seal) करण्यासाठी उकळत्या साखरेत मिसळलेल्या शिशाचा (Lead) वापर करुन एक नवीन तंत्र वापरले. या संरचनेला २००९ साली युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसास्थळाचे (World Heritage Site) स्थान दिले. याच सुमारास लॉँगडन-ऑन-टर्न (Longdon-On-Tern) हाही ओतीव लोखंड वापरुन केलेल्या जलवाहक पुलाच्या अभिकल्पाचे काम टेलफर्ड यांनी हाताळले.

टेलफर्ड यांच्या सतत वाढत जाणाऱ्या ख्यातीमुळे त्यांना अभियांत्रिकीच्या निरनिराळया क्षेत्रात नवनवीन कामे मिळत गेली. १८०१ मध्ये स्कॉटलंडच्या हायलंड भागात दळणवळण सुधारण्यासाठी एक संपूर्ण आराखडा तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. यातील कॅलॅडोनियन (Caladonian) कालवा व क्रिनेन (Crinen) कालव्यांच्या काही भागात नवीन अभिकल्पही कालव्याच्या संदर्भातील कामे, जवळजवळ १५०० किमी. लांबीचे रस्ते, महामार्ग, आणि त्यावरील हजारांवर नवीन पूल यांचा समावेश होता. स्कॉटलंडच्या लोलॅंड्समधील रस्ते आणि पूल- ही कामे त्यांच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट होती. याव्यतिरिक्त अन्य ठिकाणच्या प्रकल्पांसाठी अभियांत्रिकी सल्लागार म्हणूनही टेलफर्ड यांना निमंत्रणे येऊ लागली. उदाहरणार्थ लिव्हरपूल शहराचा जलपुरवठा, लंडन पुलाची (London Bridge) पुनर्बांधणी, लंडन बंदरानजिकच्या भागाचा भूमीसुधार अशी इंग्लंडमधील कामे, तर स्वीडनमधील गटेनबर्ग (Gothenburg) ते स्टॉकहोम यामधील गोता (Gota) कालवा हा प्रकल्प इ.

मेनाई स्ट्रेट टांगता पूल

रस्त्यांची प्रचंड कामे करतांना तोपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या पारंपारिक पद्धतीत विशेष बदल टेलफर्ड यांनी घडवून आणले. रस्त्याचा मार्ग (Alignment), त्यांचे चढ-उतार (Slopes) आणि त्यावरील वाहतूक (Traffic) या सर्वांचा विचार करुन त्यावेळी रस्त्यासाठी वापरत असलेल्या खडीचा आकार आणि मॅकॅडमची (Macadam) जाडी यांच्यात सुधारणा करण्याचे फार मोठे मूलभूत काम टेलफर्ड यांनी केले. त्याचप्रमाणे पुलांमध्ये लोखंडाचा वापर आणि टांगत्या पुलांचे (Suspension Bridge) अभिकल्प या अत्यंत अभिनव कल्पनांचे श्रेय टेलफर्ड यांना जाते. १८१९-२६ या काळात अँग्लेसे बेटावर (Anglesey Island) मेनाई स्ट्रेट (Menai Strait) वर बांधलेला १८० मी. अवधीचा २.९ मी. लांबीच्या लोखंडी साखळ्यांचा वापर करुन बांधलेला पूल हा त्या काळात सर्वांत जास्त अवधीचा टांगता पूल होता. त्याचप्रमाणे उत्तर वेल्समध्ये कॉन्वे (Conway) येथे अशाच तऱ्हेचा टांगता पूल टेलफर्ड यांनी बांधला. आईल ऑफ आरान (Isle of Arran) येथे अत्यंत कठीण अशा भू-भागात एका नाविन्यपूर्ण रस्त्याची (String Road) योजनाही टेलफर्ड यांनी केली.

 

गॅल्टन पूल

वयाच्या सत्तरीच्या आसपास टेलफर्डं यांची विविध स्तरावरील कामे चालूच होती. लंडनमधील सेट कॅथेरिन गोदी, ट्रेंटवरील हेअर कॅसल (Hare Castle) बोगदा, त्यावेळी जगातील सर्वांत जास्त अवधीचा गॅल्टन पूल (Galton Bridge), ग्रँड ट्रंक रस्त्यावरील उर्वरित कामे वगैरे. या व्यतिरिक्त त्यांनी ३२ नवीन चर्चच्या इमारतींचे अभिकल्प केले, तर ११ जुन्या चर्चच्या इमारतींच्या दुरुस्तीचे काम केले.

 

टेलफर्ड हे एक अभियंता म्हणून नंतर प्रसिद्धीस आले आणि एडिंबरा एन्सायक्लोपिडिया (Edinburgh Encyclopaedia) मध्ये वास्तुशास्त्र, पूल, कालवे यावर त्यांनी अनेक लेख लिहिले तरी त्यांनी पंचविशीत असतानाच कवी याना त्याने स्वतःच्या अनेक कविता प्रसिद्ध केल्या होत्या. प्रख्यात कवी रॉबर्ट सावदे (Robert Southey) हे टेलफर्ड यांचे मित्र होते. ज्यावेळी नंतर रस्त्यांच्या प्रकल्पासंबंधात टेलफर्ड यांचे नाव मोठे झाले त्यावेळी सावदेंनी टेलफर्डंना ‘दि कलॉसस ऑफ रोडस्’ (The Colossus of Roads) असे म्हटले.

आजची इन्स्टिटय़ूट ऑफ सिव्हिल एंजिनिअर्स ही ब्रिटनमधील ख्यातनाम संस्था टेलफर्ड यांनी १८१८ मध्ये स्थापन केली आणि ते त्या संस्थेचे पहिली बारा वर्षे अध्यक्ष होते.

औद्योगिक क्रांतीच्या पूर्वकाळात पारंपारिक पद्धतीत असलेल्या संरचनांच्या अभिकल्पात आणि बांधकामात आमूलाग्र विलक्षण बदल केल्याचे श्रेय टेलफर्डं यांना जाते आणि म्हणूनच त्यांना मिळालेले सन्मान हे निरनिराळया स्वरुपात होते आणि ते जवळ जवळ दोन शतके चालतच राहिले आहेत. अनेक रस्त्यांना, पुलांना, स्थानकांना त्यांची नावेतर पूर्वीच दिली गेली होती. परंतु श्रॉपशायरमधील रेकिन (Wrekin) भागात १९६८ मध्ये नवीन शहर बसविले गेले, त्याचे नाव टेलफर्ड न्यूटाऊन असे ठेवले गेले. आणि नंतर १९९० मध्ये तेथेच बांधल्या गेलेल्या पहिल्या तांत्रिक महाविद्यालयाचे नावही थॉमस टेलफर्ड स्कूल असे ठेवले गेले. अलीकडे २००८ साली डार्टमथमधील शुबेनाकेडी (Shubenacadie) कालव्यावर बांधलेल्या नवीन पादचारी पुलाला टेलफर्डं यांचे नाव दिले तर २०१२ मध्ये एडिंबरा कॉलेजचे नावही एडिंबरा टेलफर्ड कॉलेज असे बदलण्यात आले.

संदर्भ :

  • History TV ASCE (American Society of Civil Engineers)

 समीक्षक : प्र. शं. अंबिके