फॉक्स, चार्ल्स जेम्स : (२४ जानेवारी १७४९ – १३ सप्टेंबर १८०६). ब्रिटिश मुसद्दी व संसदपटू. लंडन येथे जन्म. ईटन व हार्टफर्ड (ऑक्सफर्ड) येथे शिक्षण. १७६८ मध्ये तो ब्रिटिश संसदेत निवडून आला व लॉर्ड ऑफ ॲडमिरल्टी (१७७० – १७७२) आणि लॉर्ड ऑफ ट्रेझरी (१७७२ – १७७४) म्हणून त्याने पंतप्रधान लॉर्ड फ्रेडरिक नॉर्थच्या हाताखाली काम केले. तिसऱ्या जॉर्जने त्यास कमी केल्यावर तो लॉर्ड नॉर्थच्या विरोधात गेला. आपल्या अस्खलित वक्तृत्वाने लॉर्ड नॉर्थच्या अमेरिकन वसाहतीबाबतच्या धोरणावर त्याने सडेतोड टीका केली. तिसऱ्या जॉर्जचा विरोध असतानाही चार्ल्स रॉकिंगॲमच्या व्हिग मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री झाला (१७८२) आणि त्याने सर एडवर्ड पॉइनिंग्झने घातलेले आयर्लंडवरील विधिमंडळविषयक बंधनकारक कायदे रद्द करण्यास मदत केली.

फ्रान्स, स्पेन यांच्या अमेरिकेतील वसाहतींत शांतता प्रस्थास्पित व्हावी म्हणून त्याने शेलबर्नबरोबर वाद केला आणि रॉकिंगॲमनंतर शेलबर्न पंतप्रधान होताच त्याने राजीनामा दिला. यानंतर त्याने आपला पूर्वीचा विरोधक लॉर्ड नॉर्थ याबरोबर शेलबर्नचा पराभव करण्यासाठी समझोता केला व तो लॉर्ड नॉर्थच्या संयुक्त मंत्रिमंडळात पुन्हा परराष्ट्र मंत्री झाला (१७८३). तिसऱ्या जॉर्जने आपली प्रतिष्ठा पणाला लावून हाउस ऑफ लॉर्ड्‌समध्ये तत्कालीन भारत सरकारला संसदनियुक्त आयोगावर घेण्यासंबंधीचे फॉक्सचे विधेयक नामंजूर केले. त्यामुळे त्याच वर्षी हे मंत्रिमंडळ गडगडले. नॉर्थच्या जागी धाकटा विल्यम पिटची राजाने पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. फॉक्सने पिटला अखेरपर्यंत कडवा विरोध केला. १७८८ मध्ये तिसऱ्या जॉर्जला काही दिवस भ्रम झाला, त्या वेळी प्रिन्स ऑफ वेल्सला (चौथा जॉर्ज) रिजन्सीचे अनियंत्रित अधिकार मिळावेत अशी फॉक्सने सूचना केली; कारण तो त्याचा मित्र होता. तिसरा जॉर्ज आजारातून बरा झाला आणि पुन्हा फॉक्स सत्तेवरून दूर गेला. फॉक्सने फ्रेंच राज्यक्रांतीस पाठिंबा दिला आणि फ्रान्समधील इंग्‍लंडच्या मध्यस्थीस विरोध केला. त्याने युद्धकाळातील नागरीहक्कांवरील नियंत्रणे तसेच दडपशाही यांवर कडाडून हल्ला चढविला. उदारमतवादी तत्त्वे, संसदीय सुधारणा आणि रोमन कॅथलिकांना राजकीय हक्क ही त्याच्या एकूण धोरणाची प्रमुख सूत्रे होत. पिटच्या मृत्यूनंतर काही दिवस तो पुन्हा परराष्ट्र मंत्री झाला. गुलामांचा व्यापार नष्ट करण्याचे विधेयक त्याने सुचविले आणि ते पुढे त्याच्या मृत्यूनंतर संमतही झाले (१८०७).

फॉक्सचे खासगी जीवन बरेचसे स्वैर होते. त्यास दारू व जुगार ही व्यसने प्रथमपासून जडली होती; त्यामुळे तो नेहमी कर्जबाजारी असे. दहाहून आधिक वर्षांच्या सहवासानंतर १७९५ मध्ये त्याने एलिझाबेथ आरमिस्टेड ह्या स्त्रीशी गुप्तपणे विवाह केला. व्यक्तिगत स्वातंत्र्याचा तो पुरस्कर्ता होता आणि राजाच्या व शासनाच्या अमर्याद अधिकारांस त्याने प्रसंगोपात्त कडाडून विरोध केला; तथापि धरसोडीच्या धोरणामुळे त्याच्या उदारमतवादासंबंधीही मतभेद आढळतात. एक जहाल अदम्य विरोधक म्हणून त्याची ख्याती होती. त्याचा हजरजबाबीपणा, मुद्देसूद बोलण्याची धाटणी यांमुळे संसदेत त्याचा विशेष प्रभाव पडत असे. फ्रेंच राज्यक्रांतीचा तो मोठा समर्थक होता. ‘मॅन ऑफ द पीपल’ म्हणून तो ओळखला जाई.

संदर्भ :

  • Cannon, John, The Fox-North Coalition; The Crisis of the Constitution, 1782 – 84, Cambridge, 1970.
  • Mitchell, L. G. Charles James Fox and the Disintegration of the Whig Party, 1782 – 1794, Oxford, 1971.