मनुष्यवस्तीमध्ये झाडाझुडपांवर दिसणारा व टोपी घातल्यासारखा वाटणारा लांब शेपटीचा एक पक्षी. बुलबुल पक्ष्याचा समावेश पक्षिवर्गाच्या पॅसेरिफॉर्मिस गणातील पिक्नोनोटिडी कुलात होतो. पिक्नोनोटस प्रजातीतील सर्व पक्ष्यांना सामान्यपणे बुलबुल म्हणतात. भारतात पिक्नोनोटस कॅफर असे शास्त्रीय नाव असलेली बुलबुल पक्ष्याची जाती सर्वत्र आढळते. दक्षिण आशियातील भारत, पूर्व श्रीलंका, म्यानमार आणि ईशान्य चीन या ठिकाणी उष्ण प्रदेशात तो निवासी आहे. पॅसिफिक महासागरातील अनेक बेटांवर, काही आखाती देशांत आणि न्यूझीलंडमध्ये अलीकडे तो आढळत असून तेथे स्थिरावला आहे. त्याच्या शेपटीच्या बुडाखाली लाल रंगाचा डाग असतो, म्हणून त्याला लालबुड्या बुलबुल (रेड व्हेंटेड बुलबुल) असेही म्हणतात.
बुलबुल हा चिमणीपेक्षा मोठा व साळुंकीपेक्षा लहान असून त्याची लांबी सु. २० सेंमी. असते. डोके आणि गळा हे भाग तकतकीत काळ्या रंगाचे असून शरीर आणि पंख फिकट तपकिरी असतात. पंख, पाठ आणि छातीवरील पिसांच्या कडा पांढऱ्या असल्यामुळे शरीरावर खवले असल्याचा भास होतो. पोटाकडचा आणि पाठीचा मागचा भाग पांढरा असतो. शेपूट काळसर तपकिरी असून चोच व पाय काळे असतात. नर व मादी दिसायला सारखेच दिसतात.
खुले वन व झुडपे असणाऱ्या माळरानात, शेतात आणि मनुष्यवस्तीच्या जवळपास झाडाझुडपांवर बुलबुल आढळतो. बहुधा तो जोडीने वावरतो. फळे, फुलांच्या पाकळ्या, मकरंद आणि कीटक हे त्याचे भक्ष्य आहे. वडाची व पिंपळाची पिकलेली लाल फळे खाण्यासाठी आणि शेवरीच्या फुलातील मकरंद पिण्यासाठी त्या झाडांवर बुलबुलांचे थवे जमतात.
बुलबुलाच्या प्रजननाचा काळ जून–सप्टेंबर असतो; निरनिराळ्या प्रदेशांत तो पुढेमागे होतो. घरटे वाडग्यासारखे असून ते वाळलेले गवत-मुळ्यांनी बनविलेले असते. ते दाट झुडपांत साधारणत: १–३ मी. उंचीवर असते. काही वेळा झाडांच्या ढोलीत त्यांचे घरटे आढळून आले आहे. मादी एका वेळी फिकट गुलाबी रंगाची २-३ अंडी घालते. काही वेळा वर्षात एकापेक्षा जास्त वेळा मादी अंडी घालू शकते. अंडी १४ दिवसांत उबविली जातात. घरटे बांधणे, अंडी उबविणे, पिलांना भरविणे आणि त्यांना उडायला शिकविणे ही कामे नर व मादी दोघे मिळून करतात. अंडी आणि पिले घरट्यात असताना नर व मादी दोघे जण शत्रूंना घरट्याजवळ फिरकू देत नाहीत.
बुलबुलाची पिक्नोनोटस जोकोसस ही आणखी एक जाती भारतात सर्वत्र आढळते. त्याला लालमिशा बुलबुल (रेड व्हिस्कर्ड बुलबुल) म्हणतात. त्याचा रंग थोडा फिकट असून पोटाकडे पांढरा असतो. मात्र त्याच्या डोक्यावरचा तुरा टोपीसारखा नसून उंच आणि टोकदार असतो. त्याच्या गालावर मिशांसारखे भासणारे गडद लाल डाग असतात.