सीत्कार किंवा सीत्कृति म्हणजे श्वास आत घेताना झालेला किंवा केलेला शीतलतेचे/थंडीने कुडकुडण्याचे प्रतीक असलेला आवाज. या सीत्कार क्रियेचा योगशास्त्रात प्राणायामातील एक तंत्र म्हणून उपयोग केला आहे. सीत्कारी व शीतली या दोन्ही प्राणायाम-प्रकारात श्वास घेण्याची क्रिया नाकाऐवजी तोंडाने करावयाची असते. अशा श्वासाने तोंड, जिह्वामूल व कंठ यांना शीतलतेचा सुखद अनुभव येतो.
कृती : पद्मासनात बसावे. मूलबंध लावावा. पूरक करताना (श्वास घेताना) जिभेचे टोक वरच्या दातांच्या मुळास लावावे. खालचे व वरचे पुढील दात एकमेकांवर ठेवावेत. जिवणीचा विस्तार करून तोंडाने पूरक करावा. तोंडातील दोन्ही बाजूंना घर्षण करीत हवा आत येईल. त्यावेळी “सीत्” असा आवाज होईल. यानंतर जालंधरबंध तसेच उड्डियानबंध लावून यथाविधी कुंभक करावा (श्वास रोखून धरावा). यानंतर एकाच वेळी दोन्ही नाकपुड्यांनी योग्य प्रमाणात रेचक करावा (श्वास सोडावा). पुन्हा पूरक, कुंभक व रेचक यांची शक्य असल्यास ५ ते १५ अखंडित आवर्तने करावीत.
लाभ : हवेच्या स्पर्शाने शरीरात शीतलतेचा अनुभव येतो. मुखशुद्धी होते. प्राणायामाचे इतर लाभ मिळतात. या प्राणायामाच्या अभ्यासामुळे साधकाच्या सौंदर्यात वृद्धी होते. योग्याला संकल्पानुसार उत्पत्ती व विनाशाची सिद्धी प्राप्त होते. त्याला क्षुधा, तृष्णा, निद्रा व आळस यांची बाधा होत नाही. तो संकल्पानुसार कोणताही देह प्राप्त करू शकतो. तो योगीन्द्र अर्थात् योग्यांमध्ये श्रेष्ठ होतो. भूमीवर त्याला कोणताही उपद्रव होत नाही. (हठयोगप्रदीपिका २.५५-५६).
विधिनिषेध : अन्य प्राणायामांमध्ये श्वास नाकाने घेतला जातो, त्यामुळे शरीराला शुद्ध हवा प्राप्त होते. या प्राणायामामध्ये मात्र तोंडाने हवा घेतली जाते. त्यामुळे उपरोक्त लाभ होत नाही. शिवाय तोंडाने आत घेतलेली, थंड झालेली हवा फुप्फुसात शिरली तर त्यात दोष निर्माण होण्याचा संभव असतो. सीत्कारीच्या अभ्यासाने उन्हाळ्यात तत्कालिक शीतलता प्राप्त झाली तरी सुद्धा अधिक प्रमाणात तिचा अभ्यास केल्यास त्यापासून हानी होण्याचा संभव अधिक आहे.
समीक्षक : साबिर शेख