एक आसनप्रकार. हठप्रदीपिका (१.३२) व घेरण्डसंहिता (२.१९) या दोन्ही ग्रंथांमध्ये शवासनाचे वर्णन आले असून या आसनाचे उद्दिष्ट चित्त विश्रांती असे सांगितले आहे.घेरण्डसंहितेत या आसनाला ‘मृतासन’ असेही म्हटलेले आहे. ‘शव’ म्हणजे मृतदेह. या आसनात शरीर मृतदेहासारखे निपचित पडलेल्या स्थितीत असते, म्हणून या आसनाला शवासन असे नाव दिले आहे.

शवासन

कृती : कुवलयानंद स्वामी यांनी या आसनाची कृती पुढीलप्रमाणे दिली आहे – जमिनीवर मऊ वस्त्र अंथरून त्यावर उताणे म्हणजे पाठीवर झोपावे. दोन्ही पाय पसरून त्यात दीड ते दोन फूट अंतर ठेवावे. डोळे मिटावेत जेणेकरून साधक शरीराच्या कोणत्याही भागावर लक्ष केंद्रित करू शकतो. कोणतीही हालचाल करू नये. संपूर्ण शरीर शिथिल ठेवावे. शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचे आकुंचन किंवा मनावर ताण असू नये याची खबरदारी घ्यावी. यामुळे पंचज्ञानेंद्रियांकडून येणाऱ्या संवेदनांपासून मन परावृत्त होते. परिणामी विचार हळूहळू कमी होत जातात. श्वसन नैसर्गिकरीत्या पोटानेच होते,  त्यामुळे छाती हलत नाही. पोटाची खाली-वर अशी संथ हालचाल होत असते. त्या हालचालीचा त्रयस्थपणे अनुभव घ्यावा. हेतुपूर्वक काही करू नये. मध्येच पुन्हा विचार सुरू झाल्यास जाणीवपूर्वक पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्यावे. यानंतर श्वास घेणे व सोडणे या क्रियांचा कालावधी दीर्घ करावा व दोन्हींसाठी समान वेळ द्यावा. श्वास घेताना हवेचा किंचित थंड, तर श्वास सोडताना  किंचित उष्ण स्पर्श अनुभवता येतो. ही क्रिया ३-४ मिनिटे करीत राहिल्यास मन शिथिल व शांत होते. विचार जवळजवळ थांबतात. शरीराची जाणीव कमी होत जाते. झोप येऊ लागते, परंतु ती टाळावी. अशाप्रकारे १०—१५ मिनिटे शवासन झाल्यावर शरीराला प्राप्त झालेल्या  शिथिल स्थितीचे डोळे बंद करून अवलोकन करीत असल्याची कल्पना करावी. हातपाय किंचित हलवावेत. ‘आता आपण शवासन सोडत आहोत’, अशी भावना करून प्रसन्नतेने डोळे उघडावेत. सावकाश उठून बसावे.

लाभ : विविध आसने करताना किंवा अन्य कारणाने शरीरास काही श्रम होतातच. उदाहरणार्थ, पाठीचा कणा ताणला जातो. स्नायू खेचले जातात. अशावेळी शरीरास विश्रांती मिळावी, शरीर व मनावरचे ताण दूर व्हावेत, म्हणून शवासन केले जाते. हृदयगती, श्वसनगती व रक्तदाब सामान्य स्तरावर स्थिर राहतात. शरीराच्या सर्व अवयवांना तसेच पेशींना उत्तम रक्तपुरवठा होतो. थकवा दूर होतो. दिवसभर ताजेतवाने व शांत वाटते. मनाची स्थिरता वाढते. मृत्युविषयक भय कमी होते. अष्टांगयोगातील प्रत्याहार म्हणजे विषयांपासून चित्त परावृत्त करणे याचा एक प्रकारे सराव शवासनातच होतो. कारण प्राणावरील नियंत्रण आणि साक्षीभाव (विषयांकडे त्रयस्थ वृत्तीने पाहणे) यांचा या आसनात चांगला सराव होतो. या आसनामुळे उच्चरक्तदाब, निद्रानाश, आमवात तसेच चिडचिड, रागीटपणा, मानसिक तणाव, चिंता यांमुळे उद्भवणाऱ्या विकारांवर मात करता येते आणि मानसिक संतुलन योग्य प्रकारे साधता येते.

विधिनिषेध : ज्या ठिकाणी शवासन करावयाचे आहे ती जागा स्वच्छ व हवेशीर असावी. डास, माश्या, चिलटे यांचा उपद्रव नसावा. उग्र वासाच्या अगरबत्तीचा धूर, दुर्गंध, स्वयंपाकघरातील फोडणी किंवा तत्सम वास नसावेत. प्रकाश सौम्य असावा. खूप थंडी किंवा उष्णता, अनावश्यक आवाज, गोंगाट आणि अन्य व्यवधान नसावे. शांतता असावी. शवासनानंतर तत्काळ आणि तीव्र गतीने कामे सुरू करू नयेत. प्रारंभी योगशिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार शवासन करावे. आसनांच्या शेवटी सर्व साधना पूर्ण झाल्यावर शवासन केले, तर अधिक लाभ होतो. योगोपचारात शवासनाला विशेष स्थान आहे.

समीक्षक : साबीर शेख