एक आसनप्रकार. या आसनामध्ये शरीराचा आकार गरुड पक्षाप्रमाणे दिसतो, म्हणून या आसनाला गरुडासन असे म्हणतात.

गरुडासन

कृती : आसनपूर्व स्थितीमध्ये दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून दोन्ही हात दोन्ही मांड्यांजवळ ठेवून आरामात उभे रहावे. शिथिल स्थितीमधून गरुडासन स्थितीमध्ये जाण्याकरिता दोन्ही पाय एकत्र ठेवावेत, हात शरीराच्या बाजूला सरळ असावेत, म्हणजेच ताडासन किंवा समस्थितीत उभे रहावे. दृष्टी समोर एखाद्या अचल बिंदूवर स्थिर असावी. आता गरुडासन करण्यासाठी प्रथम डावा पाय स्थिर ठेवून थोडासा गुडघ्यात वाकवून उजवा पाय वर उचलावा व उजव्या पायाचा विळखा डाव्या पायाला घालावा. आता हा विळखा घालत असताना उजव्या पायाची मांडी डाव्या पायाच्या मांडीवर असेल आणि उजव्या पायाचा उर्वरीत भाग विळखा घालून डाव्या पायाच्या पोटरीच्या वरून जाऊन घट्ट राहील. पायाचा विळखा पूर्ण होताच दोन्ही हात कोपरात ९० अंश ठेवून छातीसमोर घ्यावेत. म्हणजेच पायाप्रमाणे हाताचाही विळखा घालता येईल. आता उजव्या हाताचे कोपर डाव्या हाताच्या कोपराकडे घेऊन उजव्या हाताने विळखा अशाप्रकारे घालावा की दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर येतील. हे पंजे गरुडाच्या चोचीप्रमाणे भासतात. हा संपूर्ण आकृतीबंध गरुड या पक्षाप्रमाणे दिसतो, यालाच गरुडासन असे म्हणतात. दृष्टी स्थिर ठेवून श्वास नैसर्गिक ठेवावा आणि प्राणधारणेचा अभ्यास करत संपूर्ण शरीर एका पायावर तोलावे. तोलासन प्रकारतील आसन असल्यामुळे डोळे सुरुवातीस बंद ठेवू नयेत. प्राणधारणा म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करावे. आपल्या क्षमतेनुसार आसनाचा अभ्यास करावा आणि अशाच प्रकारे उजव्या पायाला विळखा घालून तसेच उजव्या हाताला डाव्या हाताचा विळखा घालून गरुडासन उजव्या पायावर पूर्ण करावे. गरुडासनामधून बाहेर येण्यासाठी सावकाश पायाचा विळखा सोडून दोन्ही पाय जमिनीवर स्थिर ठेवावे. हातांचा विळखा सोडावा आणि दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून हात शरीराच्या बाजूला ठेवून शिथिल स्थितीत उभे रहावे.

लाभ : गरुडासन करताना संपूर्ण शरीराचा भार एका पायावर पडल्यामुळे पाय सशक्त व मजबूत होतात. पायांच्या व हातांच्या नसांमध्ये सुखावह ताण आल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि हातापायांना चांगला व्यायाम मिळतो. संधीवाताचा त्रास (प्रामुख्याने हातापायांमधील) भविष्यात होऊ नये म्हणून गरुडासनाचा अभ्यास करावा. नितंब आणि पोटऱ्यांची दुखणी कमी होतात. तोलासन प्रकारतील आसन असल्यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते.

पूर्वाभ्यास : ताडासन, वृक्षासन, वीरभद्रासन, हस्तपादासन या आसनांचा नियमित सराव करावा.

विविध प्रकार : घेरण्डसंहितेमध्ये गरुडासन जमिनीवर बसून सांगितले आहे. परंतु, ते गरुडासन म्हणून सध्या कोणत्याही योगशाळेत अभ्यासले जात नाही; तर गरुडासन उभे राहून करण्याची पद्धतच सध्या प्रचलित आहे. बऱ्याचदा गरुडासन गुडघ्यामध्ये पाय जास्त वाकवून हातांचा विळखा पाठ वाकवून पोटाजवळही आणला जातो.

विधिनिषेध : संधीवात, खांदे तसेच कोपराचे स्नायू अशक्त असल्यास, गुडघेदुखी, घोट्याचा त्रास, मणक्यांचे तीव्र आजार असल्यास, मानसिक अस्थिरता असल्यास गरुडासनाचा अभ्यास टाळावा. शक्यतो आसनाचा अभ्यास योगशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच करावा.

संदर्भ :

  • Gheranda Samhita , (English translation), translated by Rai Bahadur Sris Chandra Vasu, Sri Satguru Publication, Delhi, p.18.
  • Iyengar BKS, Light on Yoga,  Schocken books, New York, 1966.
  • Swami Satyananda Saraswati, Asana, Pranayama, Mudra, Bandha, Yoga Publication Trust, Munger, 2008.

समीक्षक : नितीन तावडे