कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घरगुती विद्युत साधनाला विद्युत इस्त्री असे म्हणतात. विद्युत इस्त्रीचे पहिले एकस्व १८८३ मध्ये अमेरिकेच्या डायर आणि स्यूल यांनी मिळविले, ज्यामध्ये त्यांनी तळपट्टीला (Sole plate) गरम करण्यासाठी पातळ कार्बन कांडीचा समावेश असलेल्या घटकांचा उपयोग केला होता. नेहमी वापरात असणाऱ्या विद्युत इस्त्रींचे तीन प्रकारांत वर्गीकरण केले जाऊ शकते : (१) सामान्य विद्युत इस्त्री, (२) स्वयंचलित विद्युत इस्त्री आणि (३) बाष्पोत्सर्जक इस्त्री.

() सामान्य विद्युत इस्त्री : ज्या विद्युत इस्त्रीमध्ये उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट किंवा इतर कोणतीही व्यवस्था नसते, अशा इस्त्रीला सामान्य विद्युत इस्त्री म्हणतात.

कार्यतत्त्व : सामान्य विद्युत इस्त्री उष्णतेच्या वहनाच्या तत्त्वावर कार्य करते. उष्णता घटकातून (Heating element) विद्युत धारा वाहू लागताच काही क्षणातच त्यामध्ये उष्णता निर्माण होते. या उष्णतेचा वापर कपड्यांना इस्त्री करण्यासाठी केला जातो.

(२) स्वयंचलित विद्युत इस्त्री : ज्या विद्युत इस्त्रीमध्ये उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट वापरला जातो, अशा इस्त्रीला स्वयंचलित विद्युत इस्त्री म्हणतात.

कार्यतत्त्व : स्वयंचलित विद्युत इस्त्री उष्णता वहनाच्या तत्त्वावर कार्य करते. इस्त्रीच्या उष्णता घटकातून विद्युत धारा वाहू लागताच काही क्षणातच त्यामध्ये उष्णता निर्माण होते आणि ही उष्णता कपड्यांना इस्त्री करण्यासाठी वापरली जाते. इस्त्रीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित विद्युत इस्त्रीमध्ये उष्णता घटकाच्या एकसरी जोडणीमध्ये थर्मोस्टॅट जोडलेला असतो.

आ. १. बाष्पोत्सर्जक इस्त्री

(३) बाष्पोत्सर्जक इस्त्री (Steam iron): ज्या इस्त्रीमध्ये उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्मोस्टॅट आणि कपड्यांवर पाणी शिंपडण्यासाठी वाफेचा वापर केला जातो, अशा इस्त्रीला बाष्पोत्सर्जक इस्त्री म्हणतात.

कार्यतत्त्व : बाष्पोत्सर्जक इस्त्रीमध्ये उष्णता घटकातून विद्युत धारा वाहू लागताच काही क्षणातच उष्णता निर्माण होऊन ती तळपट्टीला मिळते. याचवेळी तिच्या पाण्याच्या टाकीमधील पाणी गरम होऊन त्याची वाफ होते आणि ही वाफ कपड्यांवर फवारली जाते आणि तळपट्टीने कपडे इस्त्री केली जातात.

स्वयंचलित विद्युत इस्त्रीची रचना : स्वयंचलित विद्युत इस्त्रीची रचना आ.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे असते. या प्रकारच्या इस्त्रीमध्ये तळपट्टीच्या खाचेत उष्णता घटक कुंडल (Heating coil) तळपट्टीवर बसविलेली असते. काही इस्त्रींमध्ये तळपट्टी आणि लोखंडी दाबपट्टी यांच्या मध्यभागी नायक्रोमचे उष्णता घटक कुंडल अभ्रकाच्या साहाय्याने विलग करून बसविलेले असते. उष्णता घटक आणि दाबपट्टी झाकण्यासाठी तुळतुळीत (Polished) आवरण (झाकण) असते. या आवरणावर बेकेलाइटचा दांडा (Handle) स्क्रूच्या साहाय्याने बसविलेला असतो. वरील दांड्यामध्येच विद्युत पुरवठा तार जोडण्यासाठी टर्मिनल ब्लॉकची व्यवस्था असते. तळपट्टीच्या मागील बाजूच्या शिखर/उंच पट्टीचा (Heel plate) आधार घेऊन इस्त्री उभी करता येते. तळपट्टी ही धातूमिश्रित स्टीलपासून बनविलेली असून ती चपटी असते. या पट्टीचा खालचा तळवा क्रोमियम विलेपन (Plating) करून गुळगुळीत केला असल्यामुळे कपड्यांना इस्त्री करणे सुलभ होते.

आ. २. स्वयंचलित विद्युत इस्त्री : रचना

वजनाने हलक्या असलेल्या इस्त्रीमध्ये तळपट्टी ॲल्युमिनियमपासून बनविलेली असते. तिच्या पृष्ठभागावर टेफ्लॉनचे आवरण असल्यामुळे इस्त्री गरम असताना कृत्रिम (Synthetic) कपडे तिला चिकटून खराब होत नाहीत. इस्त्रीला विद्युत पुरवठा करण्यासाठी २-२.५ मीटर लांबीची विद्युत पुरवठा तार वापरली जाते. तारेवर ताण पडून ती ओढली जाऊ नये म्हणून ताणनिवारक चिमटा (Stress relieve clamp) आणि छेदयुक्त रबरी वेष्टन (Rubbery grommet) बसविले जाते. उष्णता घटकापासून निर्माण होणारी उष्णता दाबपट्टीकडे पाठविण्यास प्रतिबंध करण्यासाठी उष्णता घटकावर ॲस्बेस्टसची चकती (Pad) ठेवलेले असते. यामुळे उष्णता फक्त तळपट्टीकडे जाते. उष्णता घटकावर सर्व ठिकाणी समान दाब ठेवण्यासाठी ओतीव लोखंडापासून (Cast iron) बनविलेली दाबपट्टी घट्ट बसविलेली असते.

इस्त्री करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपड्याच्या प्रकारानुसार इस्त्रीचे तापमान कमी करणे गरजेचे असते. तळपट्टीचे तापमान कमी असल्यास कपड्यांना व्यवस्थित इस्त्री होत नाही, याउलट वाजवीपेक्षा जास्त तापमान असल्यास कपड्यांना डाग पडण्याची किंवा कपडे जळण्याची दाट शक्यता असते. हे टाळण्यासाठी या इस्त्रीमध्ये थर्मोस्टॅटचा वापर केला जातो.

कार्यपद्धती : स्वयंचलित विद्युत इस्त्रीमध्ये निरनिराळ्या तापमानाला प्रसारण पावणारी अथवा आकुंचन पावणारी द्विधातवीय पट्टी वापरलेली असते. या पट्टीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही पट्टी ज्या प्रमाणात गरम होते त्या प्रमाणात ती वाकते आणि उष्णता कमी होऊ लागताच ती पूर्ववत सरळ होऊ लागते. द्विधातवीय पट्टीमध्ये वेगवेगळ्या धातूच्या दोन पट्ट्या असतात उदा., पितळ आणि लोखंड. त्यांपैकी एक पट्टी कमी तापमानाला प्रसरण पावते, तर दुसरी पट्टी तुलनेने अधिक तापमानाला प्रसरण पावते. जेव्हा या दोन्ही पट्ट्यांना उष्णता मिळते, तेव्हा त्यांपैकी एक पट्टी लवकर प्रसरण पावते. परंतु दुसरी पट्टी प्रसरण पावत नसल्याने ती पट्टी खालच्या बाजूस वाकते. द्विधातवीय पट्टीच्या एका तोंडाशी आवरित (Insulated) गोलाकार मूठ (Knob) असते. या पट्टीच्या जवळच दुसरी संपर्क पट्टी आणि तिच्या मध्यभागी चांदीचे संपर्कभाग (Contacts) असतात. या दोन्ही पट्ट्या मायका (Mica) अथवा पोर्सेलिनच्या साहाय्याने अलग केलेल्या असतात. या पट्टीच्या पुढील टोकास द्विधातवीय पट्टीची गोलाकार मूठ टेकत असते. या दोन्ही पट्ट्या उष्णता घटकाच्या एकसरळ जोडणीमध्ये जोडलेल्या असतात.

उष्णता घटकांमधून (Heating element) विद्युत धारा वाहू लागताच काही क्षणात तळपट्टी गरम होऊन द्विधातवीय पट्टी वरच्या दिशेने वाकू लागते. त्यामुळे संपर्क तुटला जाऊन विद्युत पुरवठ्यापासून उष्णता घटक वेगळे होतात. आता कपड्यांना  इस्त्री करताना तळपट्टीचे तापमान कमी होऊ लागून द्विधातवीय पट्टी पूर्ववत होते आणि त्यामुळे संपर्क होऊन उष्णता घटक विद्युत पुरवठ्याला जोडले जातात. हीच क्रिया वारंवार होत राहते. इस्त्रीचे तापमान नियंत्रित करण्यासाठी तापमान नियंत्रण बटण असते. या बटणाच्या साहाय्याने दोन्ही तापमान संपर्क पट्ट्यांमधील अंतर कमी-जास्त करता येते. अशा प्रकारे तापमान नियंत्रण बटण फिरवून इस्त्रीचे तापमान नियंत्रित करता येते. थर्मोस्टॅट हा उष्णता घटकाला एकसरी जोडणीमध्ये जोडलेला असतो आणि त्याचा उपयोग तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी,इस्त्रीमध्ये अतिरिक्त तापमान रोखण्यासाठी आणि अशा प्रकारे उष्णता घटकाचे संरक्षण करण्यासाठी होतो. तापमानाप्रमाणे इस्त्री चालू किंवा बंद होण्याची प्रक्रिया स्वयंचलित असल्यामुळे या इस्त्रीला स्वयंचलित इस्त्री म्हणतात.

दांड्यामध्ये २.८ व्होल्टचा एक निर्देशक दिवा देखील (Pilot lamp) बसविलेला असतो. हा दिवा अशा एका लहान रोधकाला समांतर जोडलेला असतो की, जो उष्णता घटकाला एकसरी जोडणीमध्ये जोडलेला असतो. जेव्हा दिवा चालू होतो तेव्हा तो हे निर्देशित करतो की, विद्युत धारा उष्णता घटकातून वाहत आहे. जेव्हा दिवा बंद होतो तेव्हा तो हे निर्देशित करतो की, इस्त्रीमध्ये गरजेपुरती उष्णता निर्माण होऊन उष्णता घटकातून विद्युत धारा वाहायची बंद झाली आहे. स्वयंचलित विद्युत इस्त्री बहुधा ७५० वॅट क्षमतेची असते.

विद्युत इस्त्रीची तांत्रिक वैशिष्ट्ये : (१) ऊर्जा : ७५० वॅट (२) विद्युत दाब : २२०-२४० व्होल्ट (३) विद्युत धारा : ३ अँपिअर (४) वारंवारता : ५० हर्ट्झ. (५) फ्यूज : किमान वेळ विलंब (६) कला (Phase) : एक (Single).

विद्युत इस्त्री वापरताना घ्यावयाची दक्षता : (१) कपड्यांना इस्त्री करण्याचे काम होताच इस्त्रीचा विद्युत पुरवठा खंडित करून ती लहान मुलांच्या हाती येणार नाही अशा ठिकाणी ठेवावी. (२) उष्णता घटक बदलताना नवीन उष्णता घटक नेहमी पूर्वीच्या क्षमतेचाच वापरावा. (३) तीन अंतरक (Core) विद्युत तारांपैकी हिरवी तार नेहमी इस्त्रीच्या धातूच्या भागांना (Earth terminal) जोडावी. (४) इस्त्रीच्या तळपट्टीला कोणत्याही स्थितीत चरे पडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. (५) उष्णता कुंडल (Heating coil) तळपट्टीवर बसवून तिच्यावर ॲस्बेस्टसची चकती ठेवावी. कोणत्याही स्थितीत उष्णता घटकाच्या खाली ॲस्बेस्टसची चकती ठेवू नये. (६) कपड्यांच्या प्रकारानुसार इस्त्रीचे तापमान ठरवावे.

पहा : गृहोपयोगी उपकरणे.

संदर्भ:

• Dhogal, P. S. Basic Electrical Engineering : Volume 1.

• Metcalfe, Peter; Metcalfe, Roger Excel Engineering Studies : Year 11 .

• Shaha, Prakash Electrician Trade Theory Saraswati Book Company, Pune.

समीक्षक : ए. पी. देशपांडे