उत्कटासन हे शरीर संवर्धनात्मक आसन आहे. कारण यामध्ये मांड्या व पोटऱ्यांवर ताण येऊन तेथील स्नायू सुदृढ बनतात. या आसनाची कृती घेरण्डसंहितेत (२.२७) दिली आहे. हठप्रदीपिकेमध्ये (२. २६) बस्तीसाठी उत्कटासन करावे असा निर्देश आढळतो. पूर्वी योगी वाहत्या पाण्यात या आसनात उड्डियान बंध करून पाणी गुदद्वाराने वर खेचून बस्ती करीत असत. आता मात्र उत्कटासन हे फक्त एक आसन म्हणून प्रचलित आहे. काही परंपरेत उकिडवे बसण्याच्या पद्धतीला उत्कटासन म्हणतात.

उत्कटासन

कृती : ताठ उभे राहावे. दोन्ही पायांमध्ये ६ ते ९ इंच अंतर ठेवावे. दोन्ही हात समोर खांद्याएवढया उंचीवर ठेवावेत. दोन्ही टाचा वर उचलून खाली अर्धवट बसावे. टाचा उचललेल्याच राहू द्याव्यात. काही साधक टाचांवर नितंब टेकवून बसतात. कदाचित बस्तीसाठी योगी या रीतीने पाण्यात बसत असावेत. आसन करताना मांड्या पोटऱ्यांना स्पर्श करणार नाहीत अशा रीतीने अर्धवट बसावे जेणेकरून स्नायूंवर ताण येईल. या कृतीला तोलासन असेही म्हणतात. १५ ते २० सेकंद आसनात स्थिर राहून पंज्यांवरच उठावे. टाचा टेकवाव्यात. नंतर हात खाली आणावेत. या आसनाची २-३ वेळा पुनरावृत्ती केल्यास अधिक फायदा होतो.

लाभ : पावलांवर तोल सांभाळत व अर्धवट असे खाली बसल्याने मांड्यांना चांगलाच व्यायाम होतो. मांड्या सुदृढ व प्रमाणबद्ध होतात. कंबर व पाठीचे स्नायू बळकट होतात. पोट सुटत नाही. शरीरास हलकेपणा येतो.  उत्साह वाढतो. एकूणच शारीरिक क्षमता वाढते.

विधिनिषेध : या आसनात मांड्या व गुडघे यांच्यावर प्रचंड भार येतो. शक्ती खर्च होते म्हणून मांड्यांचे स्नायू लवकर थकण्याची शक्यता असते. रोज सराव थोडा थोडा वाढविल्यास काही दिवसांत आसन चांगल्या प्रकारे करता येते.

हे आसन करताना पाठीचा कणा सरळ ठेवावा, पुढे वाकू नये. सर्वसाधारण अशक्तपणा, हृदयविकार, उच्च रक्तदाब असल्यास अर्धहलासन, अर्धशलभासन यांचा अभ्यास करावा व नंतर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे आसन शिकावे.

                                                                                                समीक्षक : दुर्गादास सावंत