एक आसन प्रकार. या आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकार उंटाप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला उष्ट्रासन असे म्हणतात.

उष्ट्रासन

कृती : गुडघे जमिनीवर टेकवून उभे रहावे. पायाची बोटे मागील बाजूला जमिनीवर टेकलेली असावीत. कंबरेचा भाग समोरच्या दिशेने ढकलावा आणि कण्याला पाठीमागे बाक द्यावा. मागे झुकून, हात मागे नेऊन उजवा तळहात उजव्या टाचेवर व डावा तळहात डाव्या टाचेवर ठेवावा. श्वसन नेहमीप्रमाणे असावे. या स्थितीत १५ ते ३० सेकंद सुखपूर्वक स्थिर राहिल्यावर आसन सोडावे. एक एक हात टाचांवरून उचलून पुन्हा गुडघ्यांवर उभे रहावे. सराव झाल्यावर आसनात स्थिर राहण्याचा काळ एक मिनिट किंवा त्याहीपेक्षा अधिक अथवा आवश्यकतेनुसार वाढविता येतो. आसन संपल्यावर वज्रासनात बसावे किंवा पाठीवर पडून विश्रांती घ्यावी. नवीन साधकांनी टाचेऐवजी कमरेवर हात ठेवून हे आसन करावे. या पद्धतीने केल्या जाणाऱ्या आसनाला सुलभ उष्ट्रासन म्हणतात. सुलभ उष्ट्रासन गरोदर महिलांसाठी उपयुक्त आहे. आरंभीच्या काळात दोन्ही पायांमध्ये सहा ते नऊ इंच अंतर ठेवल्यास आसन करणे सोपे जाते.

घेरण्डसंहितेत (२.४०) या आसनाची कृती पुढीलप्रमाणे दिली आहे “जमिनीवर पालथे पडून दोन्ही पाय पसरून पाठीवर घ्यावेत. या पायांना दोन्ही हातांनी धरावे व त्यानंतर मस्तक व चेहरा उचलून धरावा. याला उष्ट्रासन म्हणतात.”

लाभ : उष्ट्रासनात पाठीचा कणा जास्तीत जास्त मागे वाकतो त्यामुळे सर्व मणके ताणले जातात. त्यांना नैसर्गिक ताण (ट्रॅक्शन) मिळतो. मेरुदंडाची लवचिकता वाढते. मानेचा त्रास होत नाही. पोट व कंबरेच्या जवळील चरबी कमी होते. बद्धकोष्ठता दूर होते. पचनसंस्था अधिक कार्यक्षम होते. स्त्रियांच्या ओटीपोटाच्या तक्रारी दूर होतात. या आसनात मांड्या समोरच्या भागात खूप ताणल्या जातात. ह्या ताणाचा परिणाम गुडघ्यांवरही होतो. त्यामुळे गुडघ्यांचे आरोग्य सुधारते. मांड्या सुडौल व प्रमाणशीर होतात. कंबरेचे स्नायू बलवान होतात. फुप्फुसांची क्षमता वाढते. खांदे व दंडही सशक्त होतात. साधकाची सहनशीलता वाढते. दिवसभर उत्साह टिकतो. थकवा येत नाही.

विधिनिषेध : हे आसन सावकाश व सांभाळून करावे नाहीतर तोल मागे जाण्याचा संभव असतो. या आसनाच्या आधी धनुरासनाचा सराव केल्यास हे आसन करणे सोपे जाते. मात्र गुडघे फार दुखत असल्यास हे आसन करणे टाळावे. हे आसन करताना मागे झुकण्याच्या वेळी मांड्या खुब्यापासून गुडघ्यापर्यंत  सरळ उभ्या  असाव्यात. कटिप्रदेश सहजतेने पुढे ढकलावा. काही दिवस गुडघ्यांवर उभे राहून मागे झुकण्याचा, एकेक तळहात टाचेवर ठेवण्याचा सराव करावा. हा सराव न करता आसन एकदम जबरदस्तीने केल्यास मांड्यांना व कंबरेला दुखापत होण्याचा संभव असतो. आसनाच्या अंतिम स्थितीत तोंड मिटलेले असणे आवश्यक आहे.

हलासनात मेरुदंड पूर्णपणे पुढे तर उष्ट्रासनात व धनुरासनात तो पूर्णपणे मागे वाकविला जातो. म्हणून ही आसने याच क्रमाने केली तर मेरुदंडाला योग्य ताण दोन्ही बाजूंनी बसेल व तो अधिक लवचिक तसेच  सशक्त होईल. शरीर संवर्धनासाठी हे आसन विशेष लाभदायक आहे.

समीक्षक : दुर्गादास सावंत