कोणताही व्यवसाय करण्यासाठी कंपनी स्थापन करणे, भागीदारीत व्यवसाय करणे अथवा एका व्यक्तीने स्वतंत्रपणे प्रोप्रायटर म्हणून एखादा व्यवसाय सुरू करणे हे मार्ग सर्वसाधारणपणे अवलंबिले जातात. मर्यादित दायित्व भागीदारी कायदा – २००८ (Limited Liability Partnership Act-2008) नुसार मर्यादित दायित्व असलेली भागीदारी या व्यवसायाच्या नवीन मार्गाची भारतामध्ये सुरुवात झाली आहे. ही भागीदारी बरीचशी सर्वसाधारण भागीदारीसाराखीच असते; परंतु भागीदारांचे मर्यादित दायित्व आणि परस्पर प्रतिनिधित्वाची मर्यादित संकल्पना म्हणजे भागीदार हे भागीदारी व्यवसाय संस्थेचे (Firmचे) प्रतिनिधी असतात; पण संस्थेमधील इतर भागीदारांचे प्रतिनिधित्व ते करीत नाहीत, या दोन गोष्टी मर्यादित दायित्व भागीदारीचे वेगळेपण अधोरेखित करतात. कंपनीशी तुलना करता मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये अंतर्गत स्वायत्ततेचे प्रमाण खूप जास्त असते.

कोणतीही व्यक्ती किंवा निगम (Body Corporate) मर्यादित दायित्व भागीदारीमध्ये भागीदार बनू शकतात. येथे दोन प्रकारचे भागीदार असतात. नियुक्त केलेले भागीदार (जबाबदार भागीदार) व इतर भागीदार. भागीदारांची किमान संख्या दोन असावी लागते. नियुक्त भागीदारांची किमान संख्याही दोन असावी लागते व त्यांपैकी एक भारताचा रहिवासी असावा लागतो. २००८ सालच्या कायद्याप्रमाणे नियुक्त भागीदार असलेल्या व्यक्ती भागीदारी फर्मचे व्यवस्थापन व कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींची पूर्तता या गोष्टींसाठी प्रामुख्याने जबाबदार असतात.

मर्यादित दायित्व भागीदारी फर्ममधील भागीदार एकमेकांशी कशा प्रकारे संबंधित असावेत, हे मर्यादित दायित्व करारपत्राने ठरविण्यात येते. मर्यादित दायित्व करारपत्र हे मर्यादित दायित्व भागीदारी फर्मच्या बाबतीत संस्थापन समयालेख (Memorandum of Association) व संस्थापन नियमावली (Articles of Association) या दोन्ही भूमिका बजावते.

प्रत्येक मर्यादित दायित्व भागीदारी फर्मच्या नावात लिमिटेड लाएबिलिटी पार्टनरशिप किंवा एलएलपी असे लिहिणे बंधनकारक असते. तसेच संपर्कासाठी या फर्मचे एक नोंदणीकृत कार्यालय असणे गरजेचे असते.

या फर्ममधील भागीदार राजीनामा देऊन आपली भागीदारी संपवू शकतो. मर्यादित दायित्व भागीदारी फर्मचे विसर्जन, भागीदाराची दिवाळखोरी किंवा भागीदाराचे असंतुलित मनःस्थिती या कारणांमुळेही एखाद्या भागीदाराची भागीदारी संपुष्टात येऊ शकते. दायित्व जरी मर्यादित असले, तरी फसवणुकीच्या बाबतीत, ज्या भागीदाराने अशी फसवणूक केली असेल, त्याचे दायित्व पूर्णपणे अशा भागीदारावर असते व ते अमर्यादित असते.

कंपनीप्रमाणे मर्यादित दायित्व भागीदारी फर्ममध्ये ‘भांडवल’ ही संकल्पना नसते. येथे सर्व भागीदार आपापल्या हिश्शाचे अंशदान (Contribution) देतात. हे अंशदान स्थावर, जंगम, मूर्त, अमूर्त मालमत्ता किंवा इतर स्वरूपात असू शकते. मर्यादित दायित्व भागीदारी करारपत्रात ठरविल्याप्रमाणे अंशदान करण्याचे हे बंधन सर्व भागीदारांना पाळावे लागते. भागीदारी अधिकार नफा मिळविण्याच्या अधिकारासह हस्तांतरित केले जाऊ शकतात.

मर्यादित दायित्व भागीदारी फर्म हिशेब/लेखा पुस्तके ठेवणे आवश्यक असते. अशी लेखा पुस्तके रोख जमा किंवा उपार्जित तत्त्वावर ठेवली जाऊ शकतात. काही ठराविक मर्यादित दायित्व भागीदारी फर्म्ससाठी लेखापरीक्षा अनिवार्य असते.

काही आवश्यक गोष्टींची पूर्तता केल्यानंतर सध्या अस्तित्वात असलेल्या फर्म्स, खाजगी कंपन्या, असूचित सार्वजनिक (Unlisted Public) कंपन्या या मर्यादित दायित्व भागीदारी फर्ममध्ये रूपांतरीत केल्या जाऊ शकतात.

मर्यादित दायित्व भागीदारी फर्म्स आणि तिचे धनको (Crediters) किंवा भागीदार यांच्यातील तडजोड (Compromise/Arrangement) बाबतचे अधिकार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधीकारणाकडे (National Company Law Tribunal) असतात.

२००८ सालच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास दंड आणि फौजदारी खटला होऊ शकतो. कॉर्पोरेट गुन्ह्यांच्या ‘डीक्रिमिलायझेशन’चा भाग म्हणून या कायद्याचे पुनरावलोकन केले जात आहे.

मर्यादित दायित्व भागीदारी फर्मचा व्यवसाय संपविणे (Winding up) हे ऐच्छिक असू शकते किंवा न्यायाधीकरणाद्वारे होऊ शकते. त्यासाठी २००८ सालच्या कायद्यातील तरतुदी तसेच इन्सॉल्व्हन्सी अँड बॅन्क्रप्टसी कोड २०१६ या कायद्यातील तरतुदींची ही पूर्तता करावी लागेल. मर्यादित दायित्व भागीदारी फर्मच्या व्यवसायाची समाप्ती झाल्यावर अशा फर्मचे विसर्जन होते.

संदर्भ :

  • Limited Liability Partnership Act 2008
  • Limited Liability Partnership Rules 2009 as amended from time to time.

     भाषांतरकार/समीक्षक : स्वाती कुलकर्णी