बहुमताची जुलूमशाही : प्रसिद्ध राज्यशास्त्रज्ञ तॉकविल व मिल यांनी बहुमताची जुलूमशाही या संकल्पनेची मांडणी केली आहे. जॉन स्टुअर्ट मिलच्या On Liberty या निबंधात बहुमताची जुलूमशाही ही संकल्पना वापरली होती. बहुमत हे असहिष्णू बनून अल्पसंख्यांकांच्या वेगळया मतांना, मूल्यांना खच्ची करण्याचा प्रयत्न करेल. समाजात वेगळेपणा चालणार नाही, ही शक्यता गृहीत धरून बहुमताची जुलूमशाही हा व्यक्तिस्वातंत्र्याला आणि आविष्कार स्वातंत्र्याला एक धोका आहे असा विचार या संकल्पनेमागे आहे. उदारमतवादी विचारवंतांच्या विचारांमध्ये बहुमताविषयीची ही साशंकता आढळते. अर्थातच पर्यायाने लोकशाही विषयीची साशंकता आढळते.

कल्पनाचित्र

अशिक्षित, कनिष्ठ वर्गीयांचे बहुमत हे सामाजिक व्यवहारांमध्ये सारखेपणाचा आग्रह धरेल आणि त्यातून ही जुलूमशाही निर्माण होईल अशी भीती एकोणिसाव्या शतकातील उदारमतवाद्यांना वाटत होती. बहुमताची जुलूमशाही टाळण्यासाठी मिलने प्रमाणशीर प्रतिनिधीत्वाद्वारे अल्पसंख्यांकांना प्रतिनिधीत्व देण्याची सूचना केली होती. अमेरिकेचे घटनाकारही या विचारांपासून फार दूर नव्हते. म्हणूनच निवडणूकीचे तत्त्व स्वीकारूनही अध्यक्ष आणि सिनेट यांच्या अप्रत्यक्ष निवडणूकीची तरतूद करून संबंधित पदे सामान्यांच्या प्रत्यक्ष प्रभावापासून दूर राहतील अशी त्यांनी काळजी घेतली. बहुमत हे नेहमीच लोकशाहीचे प्रतीक नसते हा विचार या संकल्पनेमागे आढळतो.

संदर्भ :

  • Rosen,Frederick,Classical Utilitarianism from Hume to Mill, Rutledge,New  York, 2003.
  • Nyirkos, Tamas, The Tyranny of the Majority: History, Concepts, and Challenges, Rutledge, New York,2018.

Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.