नगरराज्य : इंग्लंडमधील राजकीय विचारांच्या अभ्यासात १९ व्या शतकात नगरराज्य ही संकल्पना वापरण्यात आली. ही संकल्पना प्राचीन ग्रीक शहरातील राजकीय अर्थ लावण्यासाठी वापरली. इसवी सन पूर्व सातव्या शतकात ग्रीक राजकीय संघटनेचा हा एक वेगळा प्रकार उद्भवला, असा आधुनिक युक्तिवाद आहे. इसवी सन पूर्व सातवे शतक अंधारयुगाला मागे टाकून पुढे आले. त्यानंतरच्या प्रशासकीय केंद्राचे विवेचन या संकल्पनेने केले. नगरराज्य हे ग्रीक लोकांसाठी राजकीय संघटनेचे सामान्य स्वरूप आहे. हा प्राचीन ग्रीसमधील एक राज्य प्रकार आहे. प्रत्येक शहराला स्वतंत्र राजकीय दर्जा होता. अथेन्स हे याचे सुप्रसिद्ध उदाहरण आहे. परंतु सर्व ग्रीक शहरात नगरराज्य नव्हती. नगरराज्याची लोकसंख्या थोडी असल्याने नागरिकांना सर्वांनी मिळून नगरराज्याचा कारभार करणे शक्य होत असे. नगरराज्यांमध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती. तसेच ते एक प्रशासकीय एकक होते. पाश्चात्य देशांमध्ये आधुनिक काळात राजकीय विचारांचा उदय ग्रीक नगर राज्याच्या अभ्यासापासून झालेला दिसतो. हा शासन प्रकार किंवा राजकीय संघटना स्वायत्ततेचे तत्त्व मांडतो. ग्रीक नगरराज्ये ही सामाजिक-आर्थिक एकके होती. नगरराज्य हा राजकीय संघटनेचे सर्वात छोटा गट आहे. या प्रकारात लोक संपूर्ण  निर्णयामध्ये भाग घेतात. सरकारच्या सांस्कृतिक सामंजस्यात आणि सहभागात्मक स्वरूपासाठी, नगरराज्य अजूनही समकालीन कम्युनिटेरियन आणि लोकशाही सिद्धांतांचे आकर्षण केंद्र आहे.

संदर्भ :

  • व्होरा, राजेंद्र, सुहास, पळशीकर (संपा), राज्यशास्त्रकोश, दास्ताने प्रकाशन, पुणे.
  • Daniel, Betti, City state, The encyclopaedia of political thought, the Wiley- Blackwell publishing Ltd, 2014.