वायबुल, वेलोद्दी : ( १८ जून १८८७ ते १२ ऑक्टोबर १९७९ )
स्वीडिश अभियंता, शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ. वायबुल वितरण आणि भंग यामिकीवरील (Fracture mechanics) संशोधनासाठी ओळखले जातात. वेलोद्दी वायबुल यांचा जन्म विट्ट्स्कोवले, स्वीडन (Vittskovle, Sweden) येथे झाला. १९०४ मध्ये ते स्वीडिश कोस्ट गार्डमध्ये काम करू लागले. तेथे १९०७ मध्ये ते सबलेफ्टनंट, १९१६ मध्ये कॅप्टन आणि नंतर मेजर या पदापर्यंत पोचले. हे काम करीत असतांनाच ते रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे शिकत होते. १९२४ मध्ये ते प्राध्यापक झाले. युनिव्हर्सिटी ऑफ उप्प्सला येथून त्यांनी डॉक्टरेट मिळवली.
भूमध्य सागर आणि प्रशांत महासागरात अल्बाट्रॉस या जहाजावर मोहिमेवर असताना त्यांनी सागराच्या तळाशी असलेल्या अवसादांचे (sediments) प्रकार आणि त्यांची जाडी मोजण्यासाठी प्रमाणबद्ध स्फोटके वापरण्याचे तंत्र विकसित केले. त्याबाबत त्यांनी आपला पहिला शोधलेख लिहिला ज्याचा विषय होता, स्फोटक तरंगांचा प्रसार (Propagation of Explosive Waves). आजही हे तंत्र समुद्रातील तेल शोधण्यासाठी वापरले जाते.
रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतील तांत्रिक भौतिकशास्त्र या विभागात त्यांना बोफोर्स या शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कंपनीतर्फे वैयक्तिक संशोधन प्राध्यापक पद देण्यात आले.
येथे कार्यरत असताना त्यांनी एक संभाव्यता वितरण विकसित केले (probability distribution), जे त्यांच्याच नावाने, म्हणजे ‘वायबुल वितरण’ असे ओळखले जाते. वायबुल वितरण या विषयावरील त्यांचा जगप्रसिद्ध शोधलेख ‘A Statistical Distribution Function of Wide Applicability’ हा ASME – Journal of Applied Mechanics मध्ये १९५१ साली प्रकाशित झाला. संभाव्यता सिद्धांत आणि संख्याशास्त्रात हे अविरत संभाव्यता वितरण (continuous probability distribution) अतिशय उपयोगी ठरले आहे. वायबुल वितरण यावर आधारित वायबुल विश्लेषणही अनेक क्षेत्रांत वापरले जाते. एखाद्या उत्पादनाचे किंवा उद्योगाचे आयुष्य किती असेल, हे यामुळे अंदाजित करता येते. या विश्लेषणाच्या चार पायऱ्या अशा आहेत.
- उत्पादन किंवा त्याचा घटक यांच्या जीवनाची आधारसामग्री जमवून तिचा प्रकार जाणणे.
- त्या आधारसामग्रीला योग्य ते आजीवन वितरण ठरवून त्या उत्पादनाचे किंवा त्यातील घटकाच्या जीवनाचे प्रतिमान ठरवणे.
- आधारसामग्रीच्या वितरणाला योग्य आणि उचित मापदंड ठरवणे.
- उत्पादनाच्या किंवा त्याच्या घटकाच्या जीवनाच्या गुणधर्माचा अंदाज बांधण्यासाठी कोष्टक किंवा आराखडा तयार करणे.
या विश्लेषणाच्या व्यापकतेमुळे अनेक प्रकारच्या उत्पादन संशोधनात त्यामुळे सुधारणा करता आल्या. उदा., स्वचालित उद्योग (Automotive Industry). आज व्यापार-उदीम यांचे नियोजन आणि व्यवस्थापन करतांना या विश्लेषणाला अग्रक्रम दिला जातो.
सतत वापरलेल्या भारामुळे धातुचे कमकुवत होणे (Fatigue) साहजिक असते. त्याचे विश्लेषण तसेच घनपदार्थात फटी पडणे आणि पदार्थाची बळकटी (Strength of Material) यांच्या अभ्यासात वायबुल वितरण कसे उपयोजित करता येईल या विषयांवर त्यांनी अनेक शोधलेख लिहिले. यातील २७ लेख म्हणजे ‘Reports to the U.S. Air Force at Wilbur Wright Field on Weibull Analysis’ असे वायबुल विश्लेषणाचे अहवाल होते. १९६१ मध्ये त्यांनी Fatigue Analysis हे पुस्तक प्रकाशित केले.
त्यांच्या योगदानासाठी अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्सने त्यांना सुवर्णपदक आणि रॉयल स्वीडिश अकॅडेमी ऑफ इंजिनियरींग सायन्सचे सुवर्णपदक किंग कार्ल १६ गुस्ताफ ऑफ स्वीडन (King Carl XVI Gustaf of Sweden) यांनी स्वहस्ते त्यांना प्रदान केले.
संदर्भ :
- http://www.scirp.org/(S(351jmbntvnsjt1aadkposzje))/reference/ReferencesPapers.aspx?ReferenceID=1292719
- https://quality-one.com/weibull/
समीक्षक : विवेक पाटकर