नेफेलीन हे फेल्स्पॅथॉइड गटातील महत्त्वाचे परंतु विरळच आढळणारे खनिज. पाटण : (1010) स्पष्ट; कठिणता ५.५ – ६.०; वि. गु. २.५५ – २.६६; चमक काचेसारखी; स्पर्श ग्रिजाप्रमाणे; रंगहीन, पांढरा, पिवळा, करडा, हिरवा इ; दृढता ठिसुळ; स्फटिक षटकोणी; पारदर्शक ते पारभासी; भंजन : अध:शंखाभ (Sub Concoidal); अपवर्तक दर्शक (RI) : १.५२६ – १.५४६; अपवर्तनांतर : ०.००५ – ०.००८; अपस्करण : कमी (खालचा); रासायनिक संज्ञा (Na,K) (AlSiO4) असून पोटॅशियमचे प्रमाण अल्प असते. विशेषत: सोडियम विपुल आणि अल्प सिलिका असणाऱ्या शिलारसापासून बनणाऱ्या नेफेलीन सायनाइट, फोनोलाइट या पातालिक अग्निज खडकात आणि अलीकडच्या काळात बाहेर पडलेल्या लाव्हारसामध्ये आढळते. उदा., व्हीस्यूव्हिअस लाव्हा, नेफेलीन बेसाल्ट. अभ्रक गारनेट सॅनिडिन ही खनिजेही नेफेलीनच्या जोडीने आढळतात. हे संपुंजित, संहत व जडावलेल्या रूपात तयार होते. तीव्र अम्लात नेफेलीन ढगाळ होते म्हणून ढग या अर्थाच्या ग्रीक शब्दावरून आर. जे. हॉय यांनी नेफेलीन हे नाव दिले. ग्रिजाप्रमाणे चमक असलेल्या संपुंजित प्रकाराला इलिओलाइट म्हणतात. ग्रिजाप्रमाणे चमक असल्याने तेल अर्थाच्या लॅटिन शब्दावरून हे नाव पडले आहे.

काच आणि मृत्तिका उद्दोगात फेल्स्पार ऐवजी नेफेलीन वापरतात. तसेच रंगद्रव्य आणि तंतुमय पदार्थ तयार करण्यासाठी सिरॅमिक, सिमेंट, चामडे, कापड, रबर, आणि तेल उद्दोगात नेफेलीन वापरले जाते. नेफेलीन व इलिओलाइट प्रकारातील पारदर्शी वा अर्धपारदर्शी खनिजे ही दुर्मिळ रत्न म्हणून ओळखले जातात. यातील अंतर्देशामुळे (inclusion) रत्नांमधील चमक वाढते आणि संलग्नकांच्या अस्तित्वामुळे संभवतः ऑगाइट किंवा हॉर्नब्लेंड या बंदिवासात कधीकधी कॅट्स आय (मार्जार नेत्र) परिणाम दिसतो. ह्या खनिजांवर पैलू पाडण्याचे काम अतिशय अवघड असते, त्यामुळे ह्यांची रत्ने १-२ कॅरेट्स अथवा याहूनही लहान आकाराची असतात.

नेफेलीन हे रशिया (कोला द्वीपकल्प ), नॉर्वे, द. आफ्रिका, कॅनडा, इटली (व्हीस्यूव्हिअस) इ. देशात आढळते. भारतात हे शिवानमलई, कोईमतूर, विशाखापटनम्, किशनगढ (राजस्थान) आणि जुनागढ (गुजरात) येथील नेफेलीन सायनाइट या खडकात आढळते.

संदर्भ : संकेतस्थळ : Geological Survey Of india – www.gsi.gov.in

समीक्षक : पी.एस. कुलकर्णी