सॅनिडीन हे फेल्स्पार गटातील एक खनिज असून ऑर्थोक्लेजचा (KAlSi3O8) हा एक प्रकार आहे. याला ज्वालामुखीय ऑर्थोक्लेज असेही म्हणतात. स्वच्छ काचेप्रमाणे भासणारी सॅनिडीनची स्फटिके चपटया वडीसारखी आढळतात. सॅनिडीन हा ग्रीक शब्द असून चपटी वडी; जिची जाडी तिच्या लांबी आणि रुंदीपेक्षा कमी असते असा त्याचा अर्थ होतो. काचेसारख्या स्वछ रूपामुळे यांना आइस फेल्स्पार, रायकोलाइट ही पर्यायी नावे आहेत. ह्या खानिजाचा रंग पांढरा, करडा, फिक्कट पिवळा किंवा लाल असून हे खनिज पारदर्शक असते. स्फटिक एकनताक्ष व चौरस प्रचिनाकार असून त्यात कार्ल्सबाड यमलन (Twins) सामान्यपणे आढळते. पाटण (001) चांगले; चमक काचेसारखी व पाटणपृष्ठावर मोत्यासारखी; कस पांढरा; वि. गु. २.५६ ते २.८२; कठिणता ६; दृढता ठिसुळ; अपवर्तक दर्शक १.५१८ – १.५३६; अपवर्तनांतर ०.००५ – ०.००८; प्रकाशीय ऋण, प्रतिदीप्ती – नाही.
ऑर्थोक्लेजच्या ८००° से. या उच्च तापमानाला तयार होणारे सॅनिडीनचे स्फटिक स्थिर राहतात. या प्रकारात सोडियम प्रमुख घटक असल्यामुळे हे सोडा ऑर्थोक्लेजशी निगडीत असते. कधीकधी भूकवचात आढळणारे सॅनिडीन जलदपणे थंड झालेले असते, त्यामुळे त्यांच्या स्फटिक जालकात सिलिकॉन व ॲल्युमिनियम या अणूंची वाटणी विस्कळीतपणे झालेली असते. या खनिजात संरचना ऑर्थोक्लेज आणि मायक्रोक्लीनप्रमाणे व्यवस्थित नसून विस्कळीत असल्यामुळे सॅनिडीन खनिज हे त्यांचे बहुरूप (Polymorph) म्हणूनसुद्धा ओळखले जाते.
सॅनिडीन मालेतील ऑर्थोक्लेज ४० टक्क्यांहून कमी असणाऱ्या घटकाना ॲनॉर्थोक्लेज (An orthoclase) म्हणतात. सोडियमचे प्रमाण विपुल असणाऱ्या ज्वालामुखी खडकात यांचे स्फटिक आढळतात (उदा., सिसिलीमधील पँटेलॅरिया, अँडेसाइटी लाव्हा). भूविद्यान दृष्ट्या सॅनिडीनचे स्फटिक अलीकडच्या काळातील सिलिकाचे प्रमाण अधिक असलेल्या रायोलाइट (Rhyolite), ट्रॅकाइट (Trachyte), फोनोलाइट (Phonolite) अशा ज्वालामुखी खडकातून आढळतात.
रत्नशास्त्रात (Gemology) सॅनिडीन हे दुर्मिळ रत्न समजले जाते. गूढरित्या रत्नाच्या पृष्ठभागाखालील थरातून अंतर्गत चमक दाखविणाऱ्या सॅनिडीन प्रकारातील रत्नास मूनस्टोन (Moon stone) म्हणतात. सॅनिडीन हे बहुआयामी रत्न आहे. यांचे विविध प्रकारांचे दागिने बनविण्यासाठी उपयोग करतात. रंगहीन पिवळसर, फिक्कट तपकिरी रत्ने, जर्मनी, मेक्सिको व मादागास्कार येथे आढळतात. याचबरोबर सॅनिडीन खनिजे किलिमांजारो, माऊंट केन्या (आफ्रीका), यलोस्टोन नॅशनल पार्क (अमेरिका), फ्रान्स, इटली, कॅनडा येथेसुद्धा आढळतात. भारतात यांचा व्यापारी द्दष्टीने आढळ नाही.
रूपांतरित खंडकाच्या खनिज समजक / संलक्षणी (Mineral Facies) वर्गीकरणात उच्च तापमान आणि कमी दाब या वातावरणात तयार होणारा ‘ सॅनिडीन समजक / संलक्षणी ’(Sanidine facies) हा प्रमुख विभाग आहे.
संदर्भ : www.mindat.org
समीक्षक : श्रीनिवास वडगबाळकर