भुईशिरड ही वनस्पती ॲमारिलिडेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव क्रायनम एशियाटिकम आहे. तिला नागदवणा असेही म्हणतात. भुईशिरड मूळची यूरोपीय देश, भारत, पाकिस्तान व श्रीलंका येथील असून तेथे रानटी अवस्थेत आढळते. महाराष्ट्राच्या कोकण भागात ती रानावनांत दिसून येते. हल्ली अनेक देशांमध्ये शोभेकरिता बागांमध्येही लावली जाते.
भुईशिरड वर्षायू आणि कंदधारी असते. तिचे कंद जमिनीवर असतात. ते ३०–४० सेंमी. लांब व स्तंभासारखे असून त्यांच्यापासून पाने फुटतात. पाने साधी व सरळ असून पाते भाल्यासारखे असते. पानांची संख्या २०–३० असून ती सु. १ मी. लांब असतात. पानांचा तळ तेजस्वी हिरवा असून टोक अणकुचीदार असते. फुले जाड व रसाळ असून खोडाच्या टोकावर गुच्छाने येतात. ती पांढरी व नळीसारखी असून एकदम पसरून उमललेली असतात. फुलांतील पुंकेसर जांभळे असतात. रात्री या फुलांचा सुगंध दरवळतो. फळे अर्धगोलाकार, चंचूयुक्त व पेटिका स्वरूपाची असून ती अनियमितपणे तडकून फुटतात. फळांत १-२ बिया असतात.
भुईशिरड या वनस्पतीत लायकोराइन व क्रीनामाइन ही विषारी अल्कलॉइडे असतात. त्याच्या खोडाचा रस शरीरात घेतल्यास अस्वस्थ वाटू लागते. तसेच रस त्वचेला लागल्यास ती चुरचुरते. पाने व बिया त्वचेला बाहेरून लावण्यासाठी उपयुक्त असतात. पाने कुटून एरंड तेलात मिसळून हातापायावरील सूज कमी करण्यासाठी लावतात. कोकणात वाळलेल्या पानांचा धूर डासांना पळवून लावण्यासाठी वापरतात. कुटलेली पाने गुरांच्या गोठ्यात विषारी कीटकांना व परजीवींना प्रतिबंध करण्यासाठी वापरतात.