कंपॉझिटी कुलातील सहज उगवणारे हंगामी फुलझाड. याच्या २५ जाती असून मूलस्थान मेक्सिको येथे आहे. यास अत्यंत कमी कालावधीत फुले येतात. मध्य भारताच्या केंद्रीय राज्यात प्रामुख्याने पावसाळ्यात घाट माथ्यावर ही फुले सर्वत्र दिसतात. हे फुलझाड फारशी काळजी न घेता वाढते. बागेत किनारी, ताटवे व कुंडीत लावणेसाठी योग्य आहे. प्रामुख्याने कॉसमॉस बायपिनॅटस  ही जात मोठ्या प्रमाणावर लावली जाते. यात फुलांचे वेगवेगळे रंग आहेत. उदा., पांढरा, पिवळा, गुलाबी इत्यादी. याची झाडे ३ फूट उंच वाढतात.

कॉसमॉस  सर्व प्रकारच्या जमिनीत वाढते. हलक्या व मध्यम जमिनीत फुले चांगली येतात. भारी जमिनीत जैविक वाढ जास्त होते. हलक्या जमिनीत झाडांची उंची कमी राहते. लागवडीसाठी जमीन भुसभुशीत असावी, त्यात काही प्रमाणात चाळलेले शेणखत मिसळावे. लागवडीपूर्वी रोपे तयार करणे आवश्यक असते. पेरणीपूर्वी बियाणास बुरशी नाशकाची प्रक्रिया करावी. माती व शेणखत समप्रमाणात घेऊन ट्रे, कुंडी, अथवा रुंद लाकडी खोक्यात रोपे तयार करावी. बियाणे खोल जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच बियाणे झाकण्यासाठी मातीचा पातळ थर द्यावा. रोपे वर्षभर लागवडीपूर्वी तयार केली जातात. एक महिन्यात रोपे तयार होतात. हरितगृहात रोपे लवकर तयार होतात. लागवड १ – १.५ फूट अंतरावर करावी. हळवे वाण ७५ दिवसात फुलतात.

झाडाच्या वाढीसाठी उष्ण हवामान व भरपूर सूर्यप्रकाश चांगला असतो. झाड काटक असून सर्व प्रकारचा ताण सहन करण्याची क्षमता असते. मुळे जमिनीच्या वरच्या भागात वाढतात. बागेत लवकर फुले येण्यासाठी या हंगामी फुलझाडाची लागवड योग्य ठरते.

संदर्भ : Readers Digest, Encyclopedia of Garden Plants & Flowers, London,1971.

समीक्षक : प्रमोद रसाळ