गेझनिया : (लॅ. गेझनिया स्प्लेंडेन्स; कुल –  कंपॉझिटी). एक सुंदर फुलझाड. याच्या ४० प्रजाती असून उगमस्थान दक्षिण आफ्रिका आहे. हे जमिनीलगत वाढणारे अतिबुटके बहुवर्षायू फुल आहे. काही भागात ते हंगामी फुलांसारखे वाढते. याची पाने गर्द हिरवी; परंतु चांदीसारखी छटा असणारे असतात. फुलपिकाच्या लागवडीसाठी रोपे तयार करणे आवश्यक असते.

लागवड : उन्हाळ्यात बियाणे ट्रे, कुंड्या किंवा लाकडी खोक्यात पेरावे. चाळलेली माती व शेणखत समप्रमाणात घेऊन अथवा कोकोपिटने खोके भरावी. बियाणे लहान असल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागावर पेरावे व किंचित झाकून फवारा अथवा सूक्ष्म झारीने पाणी द्यावे. युरोपमध्ये रोपे जानेवारी – फेब्रुवारी महिन्यात तयार करून उन्हाळ्यात लागवड करतात. भारतात पावसाळ्यात व वर्षभर लागवड करता येते. रोपे ३० – ४० दिवसांत लागवडीसाठी तयार होतात. एकदा लागवड केल्यावर जमिनीलगत भरपूर प्रमाणात नवीन फुट येऊन प्रत्येक झाडावर फुले येतात. फुले येण्यापूर्वी नवीन फुट रोपांसाठी वापरणे शक्य असते.

गेझनिया वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश व उष्ण हवामान चांगले असते. हिवाळ्यात अथवा थंड प्रदेशात पिकांची वाढ होत नाही; अशा वेळेला लागवड हरितगृहात केली जाते.

गेझनिया सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. पाण्याचा निचरा होणारी सुपीक जमीन योग्य असते. हलक्या जमिनीत पिकाला पाणी वेळोवेळी देणे गरजेचे असते. लागवडीच्या वेळी जमिनीत चांगले कुजलेले शेणखत मिसळून जमिनीची मशागत करावी. लागवड जमिनीत अथवा कुंडीत करतात. झाडे २० – २५ सेमी. वाढतात. लागवडीचे अंतर ३० – ४५ सेमी. ठेवावे. लागवड केल्यापासून तीन महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते. यास अनेक रंगाची फुले येतात. उदा., नारंगी, पिवळा, लाल, गुलाबी व मिश्र रंग इत्यादी. कुंडीत फुले चांगली वाढतात. फुले दिवसा सूर्यप्रकाशात उमलतात व रात्रीच्या वेळी पाकळ्या बंद होतात. यास ट्रेझर फुल (Treasure Flower) असेही म्हणतात. बहुवर्षायू असल्यामुळे बागेत लावण्यासाठी फायद्याचे आहे. झाडांची फारशी काळजी घ्यावी लागत नाही. भुरी वगळता इतर कुठलाही रोग अथवा किडींचा प्रादुर्भाव होत नाही. गेझनियाची ताटवे (Bedding), किनारी (Borders), सीमा व कुंड्या इत्यादी ठिकाणी लागवड केल्यास आकर्षक फुलांनी बाग सुंदर दिसते.

संदर्भ :

  • Randhawa, J.S.; Mukhopadhy, A. Floriculture in India, 1985.
  • Encyclopedia of Garden Plants & Flowers, Readers Digest. Association London,1971.

समीक्षक : प्रमोद रसाळ