व्याकरणाचे प्राचीन नाव शब्दानुशासन असे आहे. महर्षी पाणीनी हे संस्कृत वाङ्मयाचे तत्त्ववेत्ते होते. त्यांनी आपल्या व्याकरणशास्त्रात वैदिक आणि लौकिक अशा उभयविध शब्दांना विषय बनविले आहे. महर्षी पतंजली यांनी, आपल्या व्याकरण महाभाष्याच्या प्रारंभीच पस्पशाहिनकात, व्याकरण अध्ययनासारख्या दुरुह (गूढ) व कष्टसाध्य कामी एखादी व्यक्ती तेव्हाच प्रयुक्त होते, जेव्हा तिला प्रयोजने समजावून सांगितली जातील. म्हणून शब्दानुशासनाची प्रयोजने मुख्य व गौण या दोन प्रकारे सांगितली आहेत.
मुख्य प्रयोजने : १. रक्षा : व्याकरणाच्या अध्ययनाने वैदिक व लौकिक भाषेतील अंतर समजू शकेल. अन्यथा लोप, आगम व वर्णविकार पाहून एखाद्या व्यक्तीला वैदिक शब्दांमध्ये अशुद्धी वाटेल, पण व्याकरण शिकलेल्याला असा भ्रम होत नाही. तो जाणतो की, कोणत्या शब्दाचे लौकिक रूप कोणते व वैदिक रूप कोणते. म्हणून तो वैदिक शब्द अशुद्ध न समजता त्यांचे शुद्ध ज्ञान करत वेदांची रक्षा करू शकतो.
२. ऊह : ऊह म्हणजे अनुमान. प्रकृतीप्रमाणे विकृती केली पाहिजे, असे मीमांसकांचे मत आहे. यानुसार प्रकृती यागामध्ये सर्व विधींचे वर्णन येते; पण विकृती यागामध्ये त्यानुसार कल्पना करावी लागते, यास ऊह असे म्हणतात. येथे प्रकृती ऊह, प्रत्यय ऊह, इत्यादींचे ज्ञान व्याकरणाच्या अध्ययनाने संभवनीय आहे.
३. आगम : आगम म्हणजे वेद, श्रुतिवाक्य होय. ब्राह्मणाने कोणत्याही दृष्ट कारणाची अपेक्षा न करता सांग (सर्वांगीण) वेदाध्ययन केले पाहिजे, अशी श्रुती आहे. शिक्षा, कल्प इत्यादी सहा वेदांगांमध्ये व्याकरण प्रधान आहे, ‘मुखं व्याकरणं स्मृतम्’ अशी वेदवचने व्याकरण अध्ययनाच्या नित्य कर्मतेची बेधक आहेत.
४. लघु : लघुभूत उपायाने अनंत शब्दरूपांचे ज्ञान करणे हेही व्याकरण अध्ययनाचे फळ आहे. उत्सर्ग अपवाद नियमांनी व्याकरणाची रचना केली जाते. त्यामुळे अनेक शब्दांचे ज्ञान सहजपणे होते. अधिकाधिक शब्दांच्या ज्ञानाने अध्यापनादिकांमध्ये सफलता व यशःप्राप्ती होते.
५. असंदेह : कोणताही संदेह न होणे. वैदिक शब्दांचे अर्थ करताना स्वरांचे ज्ञान खूप उपयुक्त ठरते. स्वरांचे ज्ञान केवळ व्याकरण अध्ययनानेच होऊ शकते, जसे स्थूलपृषती सारखे शब्द.
गौण प्रयोजने : १. तेसुरा : “असुर ‘हेलयो हेलयो’ असे चुकीचे उच्चारण करीत पराभूत झाले” या वैदिक आख्यानावरून स्पष्ट होते की, अशुद्ध शब्दप्रयोगाने पराजित व्हावे लागते, म्हणून शुद्ध शब्दांचा प्रयोग केला पाहिजे आणि त्यासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
२. दुष्ट: शब्द : जर एखादा शब्द, वर्ण किंवा स्वराच्या दृष्टीने दोषयुक्त प्रयुक्त झाला, तर तो अभीष्ट (इच्छित) अर्थ सांगू शकत नाही आणि तो दोषपूर्ण शब्द वज्रासमान यजमानाचा नाश करतो, जसे इंद्रशत्रु शब्दाच्या सदोष प्रयोगामुळे वृत्रासुराचा नाश झाला. म्हणून व्याकरण शिकले पाहिजे.
३. यदधीतम् : जर केवळ नुसते पठण केले आणि त्याचे अर्थज्ञान झालेच नाही, तर ते व्यर्थ ठरते. म्हणून अर्थ समजून अध्ययन आणि ज्ञान होण्यासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
४. यस्तु प्रयुंङ्क्ते : जो शब्दार्थ संबंध जाणणारा आहे, तो योग्य व्यवहाराच्या वेळी उचित शब्दप्रयोग करतो, त्यामुळे इहलोकी व परलोकीसुद्धा विजयी होतो. म्हणून उचित शब्दप्रयोग शक्तीसाठी व्याकरण शिकले पाहिजे.
५. अविद्वांस : जी अविद्वान व्यक्ती प्रत्याभिवादनावेळी शब्दाचा टि-भाग प्लुत (व्याप्त) करू शकत नाही, त्याच्याबाबत स्त्रियांप्रमाणे व्यवहार केला जातो. प्लुतविधीचे ज्ञान होण्यासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
६. विभक्तिं कुर्वन्ति : प्रयाज मंत्र सविभक्तिक म्हणावे लागतात. व्याकरण अध्ययनाशिवाय प्रयाज मंत्रांना सविभक्तिक करणे शक्य नाही, म्हणून व्याकरण शिकले पाहिजे.
७. यो वा इमाम् : ऋत्विक कर्म करणारा वा करवून घेणारा अर्थात आचार्य आणि यजमान तीच व्यक्ती बनू शकते, जी वेदरूप वाणीला पद, स्वर व अक्षर यांच्या दृष्टीने संस्कारित करू शकते. हे सामर्थ्य व्याकरण अध्ययनाने प्राप्त होऊ शकते.
८. चत्वारि शृंङ्गा : शब्दरूपी वृषभ मनुष्यामध्ये अंतर्यामी आहे, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी व्याकरण शिकत शब्दतत्त्वाचे ज्ञान करून घेणे, हेही एक प्रयोजन आहे. अथवा चार प्रकारची पदे असून त्यातील तीन पदे अज्ञानरूपी गुहेत लपलेली असून केवळ चवथ्या रूपाचाच प्रयोग होतो. अन्य तीन रूपांच्या ज्ञानासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
९. उत त्व: : काही लोक वाणीला पाहूनही पाहत नाहीत आणि ऐकूनही ऐकत नाहीत; कारण त्यांना अर्थज्ञानच होत नाही. म्हणून वाणीच्या संपूर्ण रूपाचे ज्ञान होण्यासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
१०. सक्तुमिव : ज्या प्रमाणे चाळणीने पीठ व अग्राह्य पदार्थ वेगळे होतात. त्या प्रमाणे व्याकरण अध्ययनाने शुद्ध शब्द व अपशब्द वेगळे करता येतात. म्हणून व्याकरण शिकले पाहिजे.
११. सारस्वती : यज्ञप्रसंगी अपशब्दोच्चारण झाले, तर प्रायश्चित स्वरूप सारस्वती इष्टी करावी लागते. म्हणून शुद्ध शब्दज्ञानासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
१२. दशम्यां पुत्रस्य : संततीच्या जन्माच्या दहाव्या रात्रीनंतर त्याचे नामकरण केले जाते, ते नाम तद्धितान्त (शब्दसाधित) असू नये; कृदंत (धातुसाधित) असावे. तद्धित, कृदंत समजण्यासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
१३. सुदेवोसि : वरुणाच्या जिभेवर सदैव सर्व विभक्ती रूपे असतात. कधीही अशुद्धोच्चारण होत नाही. सदैव शुद्धोच्चारणासाठी व्याकरण शिकले पाहिजे.
उपरोक्त अठरा प्रयोजनांच्या मदतीने व्याकरण अध्ययनाची उपयोगिता सुस्पष्ट होते.
संदर्भ :
- जोशी, भा. भि. संपा. व्याकरण महाभाष्य, प्रथम खंड, दिल्ली, १९८७.
समीक्षक : भाग्यलता पाटस्कर