सौंदर्यप्रसाधनांमध्ये घट्टपणा आणण्यासाठी व बंधक म्हणून क्लोरेल्ला या प्रजातीच्या शैवलांचा अर्क वापरतात. त्यांमध्ये असणारी नैसर्गिक तत्त्व त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतात व तिला मऊ आणि तजेलदार राखण्यास मदत करतात. त्याबरोबरच त्वचेचा दाह कमी करण्यासाठीही उपयुक्त आहेत. काही संशोधकांच्या मते, ही शैवले समुद्रातील खनिजे शोषून घेतात. त्यामुळे ती खनिजे आणि जीवनसत्त्वे यांनी समृद्ध असून आरोग्य व सौंदर्यासाठी त्यांचे अनेक फायदे होतात. कॅरोटिनॅाइड हे महत्त्वपूर्ण रंगद्रव्य शैवालांपासून प्राप्त होते. बीटा कॅरोटीन व अस्टाझॅन्थिन ही शक्तिशाली प्रतिऑक्सिडीकारके सौदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जातात; जी अतिनील किरणांशी निगडित त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण देतात. त्यातील ओमेगा – ३ हे वृद्धत्वाशी लढण्यास मदत करते. कोबेन हा शैवलांपासून प्राप्त होणारा घटक त्वचेतील रंगद्रव्य मेलेनीनचे उत्पादन नियंत्रित करण्यात सक्रिय भूमिका बजावतो. त्यामुळे त्याचा वापर उजळपणा आणणाऱ्या प्रसाधनांमध्ये वापर केला जातो. काही शैवले शरीरातील ऊतकांमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे शरीराच्या ज्या भागांत चरबी साठली आहे; ती कमी करण्याच्या उपचारांमध्ये हे एक सक्रिय घटक म्हणून वापरले जाते. या शैवलांपासून प्राप्त होणारी हरितलवकेही दुर्गंध हटविण्यास मदत करतात. त्यामुळे काही दंतमंजन व घामाचा गंध दूर करणारी डीओडोरंट यासाठीदेखील त्यांचा उपयोग होताना आढळतो.
थॅलॅसोथेरपी (Thalassotherapy) नावाच्या उपचारपद्धतीमध्ये समुद्राचे पाणी व अन्य समुद्री घटक यांचा वापर केला जातो. या अन्य घटकांमध्ये मुख्यतः समुद्री शैवले, तेथील गाळ वा चिखल, तसेच वाळू यांचा समावेश असतो. या पद्धतीमध्ये जे तणाव कमी करणारे उपचार आहेत, त्यामधे शैवलांचा वापर केला जातो. या उपचारपद्धतीवर संशोधन सुरू आहे.
संदर्भ : Mourelle, M. Lourdes; Gómez, Carmen P. & Legido José L. The Potential Use of Marine Microalgae and Cyanobacteria in Cosmetics and Thalassotherapy, Cosmetics 2017, 4, 46; doi:10.3390/cosmetics4040046.
समीक्षक : डॉ.बाळ फोंडके