आ. बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्र : (१) कोळशाचे नरसाळे, (२) अखंड विस्तव जाळी (क्षेपक), (३) हवा पुरवठा कोठी, (४) राखोडे, (५) उत्सर्जन झडप, (६) धुराड्याकडे जाणारा मार्ग, (७) जलनलिकी, (८) अटकाव, (९) अधितापक, (१०) मुख्य झडप, (११) संरक्षक झडप, (१२) दाबपात्र, (१३) दाब निर्देशक, (१४) जलपातळी निर्देशक, (१५) संभरण झडप.

धूम-नलिका बाष्पित्र कमी दाबाची व कमी प्रमाणात वाफ तयार करतात. विद्युत शक्ति निर्माण करण्याकरिता किंवा तत्सम प्रकारच्या औद्योगिक कारणांकरिता उच्चदाबाची व अधिक प्रमाणात वाफ आवश्यक असते. यासाठी विशालकाय बाष्पित्रे असतात. अशीच गरज भागविणारे बॅबकॉक व विलकॉक्स हे एक सुपरिचित जल-नलिका बाष्पित्र आहे. या बाष्पित्राचे मुख्य तीन भाग असतात. .

(१) बाष्प व जल पिंप

(२) जल नलिका

(३) भट्टी

सोबत दिलेल्या आकृती प्रमाणे बॅबकॉक व विलकॉक्स बाष्पित्राची रचना असते. या बाष्पित्रात एक किंवा त्यापेक्षा जास्त क्षितिजसमांतर बाष्प-जल पिंप  असतात. ह्या पिंपाला समोरील  व पार्श्व भागीय मुख्य नलिका रायझरच्या माध्यमातून जोडलेल्या असतात. या मुख्य नलिकांना पोलादी कलत्या नलिकांची  मालिका जोडलेली असते. अशा प्रकारे अनेक नलिकांचे उभ्या पंक्तींचे हे एक जाळेच असते. ह्या उभ्या पंक्ती एकमेकांशी नागमोडी रचनेत असतात. या रचनेमुळे प्रत्येक जल नलिकेचा जास्तीतजास्त पृष्ठभाग अनावृत्त असल्यामुळे उष्ण धूप वायूपासून उष्म परिवहन कार्यक्षमतेने होऊन नलिकेतील पाणी जलद गरम होते.

अग्निकुपीतील व नलिका मालिकांच्या जाळ्यातील अडथळ्यांमुळे उष्ण धूमवायू वरील बाजूस ढकलला जातो. नंतर तो पुन्हा खाली ढकलला जाऊन नलिकांच्या जाळ्यातून फिरून धुरांड्याकडे वळविला जातो. या रचनेमुळे नलिकांच्या जाळ्यातील सगळ्यात वरील नळीपर्यंत उष्णवायू पोहोचून उष्णतान्तरण कार्यक्षमतेने होते. पिंपाच्या समोरील बाजूने फीडवॉटर प्रवेश करून पार्श्व भागाकडे वाहते. नंतर ते पाणी उभ्या नलिकांतून मुख्य नलिकांकडे उतरते. हे पाणी नंतर जल-नलिकांमधे प्रवेश करून कलत्या नलिकांमधून वरील दिशेस प्रवाहित होऊन समोरील रायझर नलिकेतून बाष्प-जल पिंपात जाते. नळ्यांच्या दोन टोकांमधील पाण्याचे तापमान भिन्न असते. त्यामुळे घनताही भिन्न असते. घनतेतील या फरकामुळे बाहेरील  बलाचा वापर न करता पाणी वर प्रवाहित होते. या थर्मोसायफन परिणामामुळे पाण्याचे सतत व जलद अभिसरण होते.  गाळ, अवसाद इ. नलिकांच्या जाळ्याच्या तळाशी असलेल्या भांड्यात जमा केले जाते व नियमित कालांतराने हा गाळ बाहेर काढला जातो.

या बाष्पित्रावर आवश्यक ते जडवण (Mountings), पूरकसाधने (Accessories) जसे अति-तापक (Supper-heater) लावलेले असतात. उष्णता परिवहन कार्यक्षमतेने होण्याकरिता नलिकांच्या बाहेरील बाजूस जमा होणारी काजळी नियमित कालांतराने खरवडली जाते अथवा उच्च दाबाच्या वाफेद्वारे काढून टाकली जाते.

पहा : बाष्पित्र