प्राथमिक चयापचयिते : सर्व जैविक पेशीमध्ये कर्बोदके, प्रथिने, लिपिडे ही प्राथमिक चयापचयिते असतात. वनस्पतींमध्ये परिसरातून शोषलेले पाणी आणि कार्बन डाय – ऑक्साइड यांपासून प्रकाशसंश्लेषणाद्वारे कर्बोदके तयार करण्याची क्षमता असते. या कर्बोदकांवर प्रक्रिया करून पेशी प्रथिने आणि लिपिडे बनवितात. ही सर्व प्राथमिक चयापचयिते त्या वनस्पतींच्या जगण्यासाठी आणि वाढीसाठी आवश्यक असतात. यांची निर्मिती सर्व वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. वनस्पतीमधून ही चयापचयिते वेगळी करणे सोपे असते.
कर्बोदके ही C, H आणि O या संयुगाची बनतात. कार्बन अणूच्या वेगवेगळ्या संख्येनुसार त्यांचे विविध प्रकार आहेत, त्याचप्रमाणे लहान कर्बोदकांची साखळी बनून त्यापासून नवीन, गुंतागुंतीची रचना असलेली कर्बोदके तयार होतात. फळे, कंदमुळे व उसाच्या दांडीतील साखर हाही कर्बोदकांचाच प्रकार होय. कर्बोदकांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यात साठविलेली ऊर्जा पेशींना त्यांच्या कार्यासाठी पुरविणे. पेशींच्या भित्तीकांमध्ये यांचा वापर होतो.
प्रथिने ही C, H, O आणि N या संयुगांनी बनलेली असतात. ॲमिनो अम्लाच्या विशिष्ट प्रकारच्या साखळीमुळे वेगवेगळी प्रथिने आकारास येतात. काहींची रचना सोपी, तर काहींची क्लिष्ट असते. काही संयुगे धातूंना जोडलेली असतात. प्रथिने अगणित प्रकारची असतात. पेशींचे बाह्य आवरण आणि अंतर्गत अंगकांची आवरणे यांचा मोठा भाग प्रथिनांनी व्यापलेला असतो. प्रथिनांनी बनलेली संप्रेरके आणि विकरे ही सुद्धा प्राथमिक चयापचयिताची उदाहरणे आहेत. त्यांचा वापर त्या त्या वनस्पतींच्या कार्यासाठी होतो.
लिपिडे ही C, H आणि O या संयुगांनी बनतात. यांतील O संयुगाचे प्रमाण हे कर्बोदकातील प्रमाणापेक्षा कमी असते. ही संयुगे मेदाम्ले आणि ग्लिसरॉल यांच्या ठराविक प्रमाणातील मिश्रणाने बनतात. प्रथिनांप्रमाणेच यांचाही सहभाग पेशी आणि अंगिकांच्या आवरणात असतो. यांमध्ये भरपूर उर्जा साठविलेली असते. या ऊर्जेचा वापर वनस्पती आपल्या चयापचयासाठी करू शकतात.
प्राथमिक चयापचयिते पेशीमध्ये मोठ्या प्रमाणावर तयार होतात. पेशीपासून ती वेगळी करणे सोपे असते. उदा., कर्बोदके, शर्करा, तेल, प्रथिने, इ.
दुय्यम चयापचयिते : वनस्पती पेशींमध्ये दुय्यम चयापचयिते लहान प्रमाणावर निर्माण होतात. त्यांचे पेशींपासून वेगळे करणे कठीण असते. पेशींमधील कार्यासाठी ती उपयुक्त नसतात. निरनिराळ्या वनस्पती प्रकारात ती निरनिराळी असतात, परंतु एका कुलातील अनेक वनस्पती प्रजातींमध्ये ती एकसारखी असू शकतात. या प्रकारच्या चयापचयिताची उपयुक्तता वेगवेगळ्या कारणांसाठी असते. उदा., पर्यावरणातील अपायकारक घटकांपासून त्यांची निर्मिती करणाऱ्या वनस्पतींना संरक्षण देणे, वनस्पतीला रोगराईपासून संरक्षण देणे, चरणाऱ्या प्राणी – भक्षकांपासून संरक्षण पुरविणे, परागीकरणासाठी कीटक आदि प्राण्यांना आकर्षित करणे, वनस्पती जातींच्या प्रसारणासाठी प्राण्यांना आकर्षित करणे.
दुय्यम चयापचयिताचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत : १) टर्पिनॉइडे; २) फेनोलिक संयुगे; ३) अल्कलॉइडे; ४) गंधकयुक्त संयुगे. यांच्यापैकी काही प्रकारात हजारो प्रकारची रसायने असतात. उदा.,अल्कलॉइडे – २१,००० (ज्ञात); लेक्टिनस पेप्टाइडे, पॉलिपेप्टाइडे – २,००० पेक्षा जास्त; लिग्निंस, कुमारिंस, इ. – २,००० पेक्षा जास्त, स्निग्ध पदार्थ आणि मेण – १,५०० च्या वर, प्रथिनविरहित ॲमिनो अम्ल – सुमारे ७००; टरपीन्स – २९,००० हून जास्त इत्यादि.
संदर्भ :
• Rahab A. Hussein, Amira A. & El. Anissery. Plants Secondary Metabolites: The Key Drivers of the Pharmacological Actions of Medicinal Plants. Nov. 2018.
समीक्षक : बाळ फोंडके