स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेमध्ये स्त्री बीजवाहक नलिका (Fallopian tubes) बंद केल्या जातात. त्या दोऱ्याने बांधल्या जातात किंवा काही वेळा रबरीबंद (Rubber band), विद्युत प्रवाह, नलिकांच्या तोंडाशी बसवलेले सूक्ष्म बोळे इत्यादींच्या साहाय्याने बंद केल्या जातात; त्याचबरोबर त्या अंशत: कापल्या जातात. यामुळे स्त्रीबीज शुक्रजंतुपर्यंत पोहोचू शकत नाही, त्यामुळे फलन होत नाही आणि त्या स्त्रीला पुढे मुले होत नाहीत. गर्भनिरोधनाची कायमस्वरूपी पद्धत म्हणून ही पद्धत अतिशय लोकप्रिय आहे.

इतिहास : डॉ. जे. ब्लंडेल यांनी लंडनमध्ये १८२३ मध्ये ही शस्त्रक्रिया प्रथम केल्याची नोंद आढळते. मात्र सुरुवातीला ही शस्त्रक्रिया गर्भनिरोधनासाठी क्वचितच केली जात असे. १९७० नंतर ही शस्त्रक्रिया अधिकाधिक वापरली जाऊ लागली.

शस्त्रक्रिया पद्धती : सर्वसाधारणपणे पोट उघडून, दुर्बिणीद्वारे अथवा योनिमार्गे या तीन पद्धतींनी ही शस्त्रक्रिया करता येते.

शस्त्रक्रिया करण्याची वेळ : स्त्री शारीरिक दृष्ट्या योग्य असेल तर आणि गरोदर नसल्याची खात्री असताना कोणत्याही वेळी ही शस्त्रक्रिया केली जाते. पाळी आल्यानंतर पहिल्या आठ ते दहा दिवसांमध्ये ही शस्त्रक्रिया करता येते. गर्भपात अथवा वैद्यकीय गर्भपातानंतर ही शस्त्रक्रिया लगेच अथवा काही काळात करता येते. प्रसूतीनंतर देखील ही शस्त्रक्रिया केली जाते. प्रसूतीनंतर सहा आठवड्यापर्यंत केल्या जाणाऱ्या अशा शस्त्रक्रियेला प्रसूतीपश्चात स्त्री-गर्भनिरोधक शस्त्रक्रिया असे म्हणतात. प्रसूतीनंतर सहा आठवड्यांनंतर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेला मध्यांतर (Interval) शस्त्रक्रिया असे म्हणतात.

पूर्वतयारी : या शस्त्रक्रियेपूर्वी स्त्रीचे तसेच कुटुंबियांचे योग्य रीत्या समुपदेशन केले जाते. शस्त्रक्रियेतील फायदे, तोटे, धोके, यशापयशाचे प्रमाण तसेच इतर पर्याय यांसंदर्भात चर्चा केली जाते. जरी केलेली शस्त्रक्रिया (पुन्हा शस्त्रक्रिया करून) परिवर्तित करता (Reverse) येत असली, तरी व्यावहारिकदृष्ट्या ही पद्धत एक कायमस्वरूपी पद्धत आहे, हे लक्षात आणून दिले जाते. परंतु तरीही ही शस्त्रक्रिया अपयशी ठरल्याची काही उदाहरणे आहेत. काही वेळा शस्त्रक्रियेतील त्रुटींमुळे नलिका नीट बंद होत नाहीत. कधीकधी कापलेल्या नलिकेची दोन्ही टोके निसर्गत: जुळून येतात आणि पुन्हा नको असताना स्त्री गरोदर राहू शकते, हे लक्षात आणून दिले जाते. प्रत्येक स्त्रीने अशी शस्त्रक्रिया करायलाच हवी असे नाही. पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया, तांबी अथवा गोळ्या या पर्यायी पद्धतींबाबतही चर्चा केली जाते. या शस्त्रक्रियेत गुंतागुंत होण्याची शक्यता अतिशय कमी असली तरी ती शून्य नाही हेही लक्षात आणून दिले जाते.

अखेरीस त्या स्त्रीची लेखी संमती घेऊन शस्त्रक्रियेच्या दृष्टीने तिची तपासणी केली जाते. यामध्ये शारीरिक तपासणी, रक्त आणि लघवीच्या तपासण्या इत्यादी अंतर्भूत आहेत.

आ. १. पॉमराय पद्धती आणि त्याची प्रगत पद्धती : (अ) आणि (ब) : स्त्रीबीजवाहक नलिकेचा काही भाग वेटोळ्याच्या आकारात ओढून घेतात. (क) वेटोळ्याचा वरील भाग कापतात. (ड) प्रगत पॉमराय पद्धती : नलिकेच्या टाेकाला (Tubal stump) रेशमी दोऱ्याने टाचून घेतात.

शस्त्रक्रियेचे तंत्र : (अ ) पोट उघडून केली जाणारी शस्त्रक्रिया : स्त्रीबीजवाहक नलिकांपर्यंत सहजपणे पोहोचता येईल अशा जागी पोटावर छेद  घेतला जातो. प्रसूतीपश्चात गर्भपिशवी आणि तिच्या बरोबर असलेल्या दोन्ही बाजूच्या नलिका ओटीपोटापेक्षा बऱ्याच वर असतात. अशा वेळी नाभीच्या खाली काही अंतरावर छेद घेतला जातो. एरवी गर्भपिशवी ही लहान असते. गर्भपिशवी आणि नलिका या ओटीपोटात असतात. त्यामुळे ओटीपोटावर छोटासा छेद घेतला जातो. सर्वसाधारणपणे पॉमराय (Pomeroy) तंत्राने ही शस्त्रक्रिया केली जाते. यात नलिकेचा मधील भाग उचलून घेऊन तिथे वेटोळे बांधतात. तसेच गाठीच्या वरचा वेलांटीसारखा भाग छाटला जातो. नलिका बांधण्यासाठी सहसा विरघळणारे टाके वापरले जातात. कालांतराने जेव्हा हे टाके विरघळतात, तोपर्यंत नलिकेची टोके बुजलेली असतात. टाका विरघळल्यावर  नलिकेची छाटलेली टोके एकमेकापासून लांब सरकतात. अशा पद्धतीमुळे नलिका आपोआप पुन्हा जुळून येण्याची शक्यता कमी होते. काही वेळा नलिकेचा गर्भपिशवीकडील भाग न विरघळणाऱ्या दोऱ्याने आवळला जातो. मार्ग पुन्हा सुरू होण्याची शक्यता आणखी कमी व्हावी म्हणून हे केले जाते.

आ. २. आयर्विन पद्धती : स्त्रीबीजवाहक नलिकेचे कापून दोन तुकडे करतात. गर्भपिशवीकडील टोक गर्भपिशवीवरील आवरणात टाचून घेतात.

या शस्त्रक्रियेची आणखीही काही तंत्रे आहेत. आयर्विनच्या (Irving) तंत्रानुसार नलिका कापून त्याचे गर्भपिशवीकडील टोक हे गर्भपिशवीवरील आवरणात टाचून टाकले जाते.

 

 

आ. ३. उचिडा पद्धती : (अ) गर्भनलिकायोजीमध्ये (Mesosalpinx) एपिनेफ्रिनचे अंत:क्षेपण देतात. (ब) नलिका खेचून बाहेर ओढतात. (क) स्त्रीबीजवाहक नलिकेची गर्भपिशवीकडील बाजू ही पर्युदर आवरणात सरकवून टाचून घेतात.

उचिडा (Uchida) तंत्रानुसार नलिकेची गर्भपिशवीकडील बाजू ही पर्युदर (Peritoneum) आवरणात सरकवून टाचून टाकली  जाते. क्रॉनर (Crawner) यांच्या  तंत्रामध्ये नलिकेचा  स्त्री-बिजांड कोशाजवळील झल्लरीयुक्त (Fimbria) टोकाचा छत्रीसारखा भाग छाटून  टाकला जातो. मॅडलेनर यांच्या तंत्रानुसार नलिकेचा मध्यभाग निव्वळ रेशमी धाग्याने बांधला जातो.

स्त्री नसबंदीच्या सर्व तंत्रांचे फायदे-तोटे लक्षात घेता सध्या पॉमरॉयचे तंत्र सर्वसाधारणपणे मान्यताप्राप्त आहे.

आ. ४. मॅडलेनर पद्धती : स्त्रीबीजवाहक नलिकेचा मध्यभाग रेशमी धाग्याने बांधला जातो.

(ब ) मिनीलॅप (मिनी लॅप्रोटोमी ) : मिनीलॅप हे मिनी लॅप्रोटोमी या शब्दाचे लघुरूप असून, लॅप्रोटोमी याचा अर्थ पोट (उदरपोकळी) उघडणे (उदर पाटन) असा होतो.

यामध्ये ओटीपोटावर छोटासा छेद घेतला जातो त्याच वेळी गर्भपिशवीमध्ये योग्य त्या आकाराचे उपकरण सरकवून गर्भपिशवी उचलली जाते आणि या छेदातून नलिका दिसतील अशा पद्धतीने गर्भपिशवी हलवली जाते.

 

(क ) दुर्बिणीतून शस्त्रक्रिया (लॅप्रोस्कोपी तंत्र ) : यामध्ये नाभीच्या खाली एक छोटासा छेद घेऊन, त्यातून उदरपोकळीत दुर्बिण सरकवली जाते. आत उजेड पडेल, हवा भरता येईल, आतील चित्रही दिसेल आणि नलिका पकडून त्या भोवती खास रबरीबंद (Fallop ring) बसवता येईल अशी सर्व सोय या दुर्बिणीत असते.

ही शस्त्रक्रिया झटपट आणि स्थानिक भूल देवूनही करता  येते.

(ड ) योनिमार्गे शस्त्रक्रिया : या तंत्रानुसार योनिमार्गातून ग्रीवेचा मागील बाजूला एक छेद घेतला जातो. यातून ओटीपोटातील डग्लस कोष्ठ (Pouch of Duglous) या भागात प्रवेश करता येतो. याठिकाणी नलिका हाताशी येऊ शकतात. योग्य त्या उपकरणांच्या साहाय्याने नलिका बांधता येतात.  तसेच शस्त्रक्रिया आतल्याआत होत असल्याने पोटावर कुठेही जखम, व्रण राहत नाही. मात्र जंतुबाधेची शक्यता आणि लागणारे शल्यकौशल्य लक्षात घेता ही शस्त्रक्रिया तितकीशी लोकप्रिय नाही.

शस्त्रक्रियेतील संभाव्य गुंतागुंत : शस्त्रक्रियेसाठी वापरलेली पद्धती भूल देण्याचा प्रकार (स्थानिक, संपूर्ण अथवा कशेरू स्तंभाला- vertebral column भूल देऊन), शस्त्रक्रियेसाठी निवडलेला अवयव (पोट किंवा योनी), रूग्णाची पूर्वप्रकृती आणि शल्यकेंद्राचे निर्जंतुक वातावरण वगैरे गोष्टींवर गुंतागुंत उद्भवणे अवलंबून आहे. सुमारे एक ते पाच टक्के मध्ये किरकोळ गुंतागुंत उद्भवू शकते.

पोटातील इतर अवयवांना, जसे की आतडे, मूत्राशय वगैरेंना इजा होणे, आतल्या आत रक्तस्राव होणे, गर्भपिशवीला इजा होणे, जखमांमध्ये जंतुबाधा होणे, जखमेतून रक्तस्राव होणे, जखम न भरणे, लघवीला संसर्ग होणे आणि पर्युदर पोकळीमध्ये (Peritoneal cavity) संसर्ग होणे अशा शक्यता असतात.

शस्त्रक्रियेत गुंतागुंत उद्भवण्याची शक्यता अतिशय कमी असून गरोदरपणात गुंतागुंत अनुभवणे अथवा मृत्यू होणे याची शक्यता कितीतरी पटीने अधिक आहे ही बाब लक्षात घेतली पाहिजे.

अपयशाचे प्रमाण : शस्त्रक्रियेसाठी निवडलेल्या तंत्रावर अपयशाचे प्रमाण अवलंबून आहे. नलिका नीट बांधली न जाणे, टाका अथवा रबरीबंद निघून जाणे, दोन्हीकडील टोके नैसर्गिक रीत्या जोडली जाणे वगैरे कारणांनी अपयश आल्याचे दिसते. सर्वसाधारणपणे हजारी एक स्त्रियांमधील शस्त्रक्रिया अपयशी ठरते.

समीक्षक : यशवंत तोरो