फक्त प्रोजेस्टेरॉन असलेली स्त्रियांसाठीची गर्भनिरोधक अंत:क्षेपणे (Injection) बाजारात उपलब्ध आहेत. नुकतीच ही अंत:क्षेपणे राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमात समाविष्ट केली गेली आहेत. यात मेड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ॲसिटेट (डेपो प्रोव्हेरा) किंवा नॉरएथिस्टेरॉन ॲसिटेट (नेट एन) ही द्रव्ये असतात. ही वेळोवेळी अंत:क्षेपणाद्वारे शरीरात टोचली जातात. यामध्ये इस्ट्रोजेन नसल्याने स्तनपान चालू असताना देखील ही सुरक्षितपणे वापरता येतात. दुधाचे प्रमाण आणि प्रत कमी होत असल्याने, इस्ट्रोजेनयुक्त औषधे स्तनपानादरम्यान वापरली जात नाहीत.

औषध टोचल्यानंतर त्या ठिकाणाहून हळूहळू शरीरात सर्वत्र पसरत रहाते. त्यामुळे या अंत:क्षेपणाचा प्रभाव, प्रकारानुसार, दोन ते तीन महिने टिकतो.

परिणामकारकता  : ही अंत:क्षेपणे नियमित घेणे महत्त्वाचे आहे सर्वसाधारणपणे समजा शंभर स्त्रियांनी ही अंत:क्षेपणे वापरण्यास सुरुवात केली, तर वर्षअखेरीस सुमारे तीन स्त्रियांना गर्भधारणा होऊ शकते. म्हणजेच ९७ % स्त्रियांना गर्भधारणा होत नाही. पुढे जर ही अंत:क्षेपणे अतिशय नियमितपणे घेतली, तर अपयशाचे प्रमाण एक टक्का किंवा त्याहूनही कमी असते. अंत:क्षेपणे बंद केल्यानंतर पुन्हा गर्भधारणा राहण्यास काही कालावधी लागू शकतो. हा कालावधी सरासरी चार ते पाच महिन्यांचा असतो.

सहपरिणाम आणि फायदे -तोटे : यामुळे मासिक चक्रामध्ये अनियमितता उद्भवू शकते. थोडा थोडा आणि बराच काळ रक्तस्राव होऊ शकतो. वर्षभर अंत:क्षेपणे वापरत राहिल्यास बऱ्याचदा पाळी लांबत जाते. हे परिणाम नॉरएथिस्टेरॉन ॲसिटेटमध्ये कमी प्रमाणात दिसतात. काही स्त्रियांमध्ये वजन वाढणे, डोकेदुखी, चक्कर, शरीर फुगल्यासारखे वाटणे आणि काम-निरसता अशाही तक्रारी दिसतात.

ही अंत:क्षेपणे विशेषत: डेपो प्रोव्हेरा हे अंत:क्षेपण वापरण्याचे काही फायदेही आहेत. उदा., गर्भाशयाच्या अस्तराच्या कर्करोगाचे प्रमाण कमी होते. गर्भपिशवीवर उद्भवणाऱ्या अर्बुदाचे (Fibroid) प्रमाण कमी होते. कटिभागांतील अवयवांना सूज तसेच रक्तक्षय देखील कमी प्रमाणात होतो. दात्र-कोशिका व्याधी (Sickle cell crisis) आणि अशा आजारांवर सकारात्मक परिणाम होतो. या अंत:क्षेपणापासून कोणताही मोठा धोका उद्भवत नाही.

पहा : अंत:गर्भाशयी साधने;आपत्कालीन गर्भनिरोधन; तांबी.

समीक्षक : यशवंत तोरो