कोणतेही साधन अथवा औषधी न वापरता गर्भधारणा टाळण्याच्या उपायांना नैसर्गिक पद्धती म्हटले जाते. प्राचीन काळापासून या पद्धती वापरल्या जातात. आजही काही जोडपी धार्मिक वा अन्य कारणासाठी या पद्धतींचा अवलंब करतात. वापराबद्दलची गुप्तता आणि कोणताही खर्च नसणे हे त्यांचे फायदे आहेत. परंतु या पद्धती वापरण्यासाठी आत्यंतिक मनोनिग्रह असावा लागतो.

या पद्धती पुढील चार गटांत मोडतात : (१) अवरुद्ध संभोग पद्धत,  (२) तालबद्ध संभोग पद्धत, (३) स्तनपानजन्य गर्भनिरोधन आणि (४) ब्रह्मचर्य.

(१) अवरुद्ध संभोग पद्धत : (Withdrawal method). या पद्धतीनुसार संभोगादरम्यान वीर्यपतनाची जाणीव होताच, पुरुष लिंग योनिमार्गातून बाहेर काढून स्त्रीच्या जनन मार्गाबाहेर स्खलन घडवून आणतो.

ही पद्धत वापरायची तर जोडप्यांमध्ये अतिशय समंजसपणा असावा लागतो. स्वयंनियमन आवश्यक असते. अनेकांना यातून सुरुवातीला कामतृप्ती प्राप्त होत नाही. परंतु काही काळानंतर, सवयीने, संपूर्ण संभोगाइतकेच सौख्य प्राप्त होऊ शकते.

या पद्धतीत अपयशाचे प्रमाण, दर शंभर जोडप्यांमागे वर्षभरात सुमारे वीस अवांच्छित गर्भधारणा, इतके जास्त आहे. हा दर सुरुवातीला आणखी जास्त असतो.  त्यामुळे सतत अवांच्छित गर्भधारणेची भीती असते.

पर्यटन करूनही जनन मार्गातच स्खलन  होणे, हे अपयशाचे एक प्रमुख कारण आहे. स्खलनपूर्व स्रावातही अल्प प्रमाणात पुरुषबीज असते आणि त्यातूनही गर्भधारणा होऊ शकते. बाह्य जननेंद्रियांवरील वीर्यातूनही पुरुष बीज यौनमार्गात जाऊन गर्भधारणा  होऊ शकते.

(२) तालबद्ध संभोग पद्धत : (Rhythm method). मासिक पाळीच्या फलनक्षम दिवसांत संभोग टाळणे हे या पद्धतीमागील तत्त्व आहे.

प्राचीन काळापासून अशा पद्धतीने गर्भधारणा टाळण्याचे मार्ग विविध संस्कृतीत प्रचलित आहेत. रोमन, ग्रीक, आफ्रिकन तसेच भारतीय इतिहासात याचे दाखले मिळतात. परंतु बहुतेकदा यात सुचवलेला फलनक्षम कालावधी चुकीचा आहे.

पाळीच्या चौदाव्या दिवशी; अधिक नेमकेपणाने सांगायचे तर पुढील पाळीच्या चौदा दिवस अलीकडे; स्त्रीबीज निर्मिती होते. स्त्री बीजनिर्मिती नंतर, बीज सुमारे २ ते ३ दिवस फलनक्षम असते. तसेच स्खलन झाल्यानंतर पुढे तीन ते चार दिवसांपर्यंत पुरुषबीज फलन क्षमता बाळगून असते. त्यामुळे स्त्रीबीज निर्मिती आधी ३ ते ४ दिवस आणि नंतर ३ ते ४ दिवस शरीरसंबंध टाळले तर गर्भधारणा  होण्याची शक्यता कमी असते. मासिक पाळीच्या दहाव्या दिवसापासून ते सतराव्या दिवसापर्यंत फलनक्षम काल समजला पाहिजे. स्त्रीचे ऋतुचक्र २८ दिवसाचे आहे असे गृहीत धरून हा कालावधी सुचवला आहे. प्रत्यक्षात यात थोडा फरक पडत असल्याने स्त्रीबीज निर्मिती नेमकी कधी होते आहे, हे ओळखून त्यानुसार शरीरसंबंधांचे वेळापत्रक ठरवावे लागते. वेळापत्रकानुसार शरीरसंबंध अपेक्षित असल्याने या पद्धतीला तालबद्ध पद्धत म्हटले जाते.

स्त्रीबीजनिर्मिती ओळखण्याच्या पद्धती : (अ) दिनदर्शिकेनुसार, (आ) किमान तापमान मापनपद्धती आणि (इ) यौन स्राव तपासणी.

(अ) दिनदर्शिकेनुसार : पाळीच्या अपेक्षित तारखेच्या १४ दिवस अलीकडे स्त्रीबीज निर्मिती होते. तेव्हा या दिवसाच्या मागेपुढे तीन ते चार दिवस संबंध टाळणे अशी ही पद्धत आहे. परंतु पाळी नियमित येऊनही निसर्गत:च बीज उशिरा निर्माण होऊ शकते. मानसिक ताणतणाव, प्रवास, किरकोळ आजार इत्यादींनी सुद्धा बीजनिर्मिती पुढे मागे होऊ शकते. आदर्श पद्धतीप्रमाणे सहा महिन्याच्या काळातील मासिक चक्राच्या नोंदी ठेवून, दोन पाळ्यांतील जास्तीतजास्त व कमीतकमी अंतर लक्षात घेऊन सुरक्षित काळ ठरवला जातो.

(आ) विश्राम तापमान पद्धती : (Basal Body Temperature Technique). यात शरीराची चयापचय क्रिया (Metabolism) शांत स्थितीत असताना म्हणजेच शरीर विश्रामावस्थेत असताना तापमान मोजले जाते. साधारणपणे सकाळी उठल्या-उठल्या तापमान मोजण्यास योग्य कालावधी आहे. अशा रोजच्या नोंदीचा आलेख काढल्यास बीजनिर्मितीच्या सुमारास तापमान अचानक वाढलेले आढळते. यानुसार शरीरसंबंध ठेवले वा टाळले जातात.

(इ) यौन स्राव तपासणी : (Mucus method). बीजनिर्मितीच्या सुमारास ग्रीवेच्या मुखाचा स्राव हा आपले स्वरूप बदलतो. एरवी घट्ट आणि चिकट असणारा हा स्राव स्रीबीज निर्मितीवेळी पाणीदार आणि पातळ होतो.

हे सर्व लक्षात घेता स्त्रीबीजनिर्मिती नेमकी ओळखणे हे जिकिरीचे आणि बेभरवशाचे आहे. बऱ्याचदा स्त्रीबीज निर्मिती झाल्याचे लक्षात येऊ शकते, परंतु लवकरच होणार असल्याचे लक्षात येत नाही. त्यामुळे शरीरसंबंध नेमके केव्हा टाळावेत याचे सुयोग्य मार्गदर्शन मिळत नाही. म्हणूनच या पद्धती क्वचितच वापरल्या जातात.

(३) स्तनपानजन्य गर्भनिरोधनमुलाला अंगावर पाजण्याच्या क्रियेमुळे प्रोलॅक्टिन हे संप्रेरक स्रवत राहते. परिणामी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) आणि ल्युटिनायझिंग हॉर्मोन (LH) यांचे प्रमाण अत्यल्प पातळीवर पोहोचते. यामुळे स्त्रीबीज निर्मितीचे कार्य मंदावते किंवा बंद होते. परिणामी गर्भधारणा होत  नाही.

यशापयशाचे प्रमाण : प्रसूतीनंतर जर पाळी एकदाही आली नसेल, बाळाला केवळ अंगावरचेच पाजणे चालू असेल आणि सहा महिन्यांपेक्षा कमी कालावधी लोटला असेल; तर गर्भधारणा  होण्याची शक्यता अत्यल्प म्हणजे २ % इतकी असते.  याबरोबर उपरोल्लेखित अन्य नैसर्गिक पद्धतींचा वापर केल्यास गर्भधारणा टाळण्याचे प्रमाण आणखी वाढते.

(४) ब्रम्हचर्य : शंभर टक्के यशस्वी अशी ही एकमात्र पद्धत म्हणता  येईल. परंतु ही पद्धती व्यवहार्य नाही. नैसर्गिक भावनांचा कोंडमारा झाल्याने इतर अनेक व्याधी संभवतात.

समीक्षक : यशवंत तोरो