अब्दुल करीमखाँ : ( ११ नोव्हेंबर १८७२–२७ ऑक्टोबर १९३७ ). किराणा घराण्याचे सुविख्यात गायक. आज किराणा घराणे हे खाँसाहेबांच्या गानशैलीमधील वैशिष्ट्यांवरूनच ओळखण्यात येते. या घराण्याचे मूळ पुरूष नायक धोंडू. खाँसाहेबांचे घराणे हे तंतकारांचे होते. सुविख्यात बीनकार बंदे अलीखाँ हे खाँसाहेबांचे चुलत-चुलते. अब्दुल करीमखाँचे संगीतशिक्षण त्यांचे वडील कालेखाँ आणि चुलते अब्दुल्लाखाँ यांच्याकडे झाले. खाँसाहेब स्वत: गात; तसेच ते सारंगी, सतार, बीन इ. वाद्येही चांगली वाजवीत आणि शिकवीत असत. या वादनामुळे त्यांच्या गायनावर आणि शैलीवर अतिशय मोहक आणि पोषक परिणाम घडून आला. तथापि गायन हेच त्यांचे खास वैशिष्ट्य होते.
खाँसाहेबांचे मूळ गाव उत्तर भारतातील कुरुक्षेत्राजवळचे ‘किराणा-(ना)’ हे होय. संगीताचे शिक्षण झाल्यावर ते तेथून दक्षिणकडे प्रथम बडोद्यास आले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी दरबार गायक म्हणून त्यांची व त्यांचे बंधू अब्दुल लतीफ यांची नेमणूक केली. १८९८ मध्ये खाँसाहेब मुंबईला आले. त्यांनतर ते मिरजेस स्थायिक झाले. दरम्यान सातत्याने त्यांच्या गायनाचे जलशे विविध ठिकाणी होत असत. १९१३ मध्ये पुणे येथे त्यांनी आर्य संगीत विद्यालयाची स्थापना केलेली होती, या विद्यालयाची एक शाखा मुंबईतही उघडली पण १९२० मध्ये काही कारणास्तव त्यांनी हे विद्यालय बंद केले व पुन्हा मिरजेस गेले.
महाराष्ट्रात त्यांनी जी अत्यंत काळजीपूर्वक आणि रेखीव अशी संगीतसाधना केली, तिचा परिणाम रंगमंदिरांमध्ये त्यांनी सादर व लोकप्रिय केलेल्या अनेकविध जलशांमध्ये दिसून आला. खाजगी स्वरूपाच्या कोठींमधून होणाऱ्या गायनाच्या बैठकींना त्यांनी रंगमंदिरात नेऊन त्यांना एक सार्वजनिक आनंदाचे समावेशक स्वरूप दिले. तत्कालीन सर्वसाधारण श्रोत्यांच्या दृष्टीने हा एक मोठा लाभच म्हटला पाहिजे.
खाँसाहेबांचे गाणे ‘गौहरबानी’चे व आलापप्रधान असून, तंतअंगाचा पराकाष्ठेचा सुरेलपणा व स्वाभाविक गोड आवाज यांमुळे अत्यंत कर्णमधुर होत असे. त्यावर करुणरसाची छाप विशेषत्वाने होती. आपल्या शेकडो सार्वजनिक जलशांच्या द्वारा त्यांनी उत्तर हिंदुस्थानी संगीत आणि विशेषत: ठुमरीप्रकार अत्यंत लोकप्रिय केला. बेळगाव, पुणे, मुंबई इ. ठिकाणी विद्यालये स्थापून त्यांनी शिष्यशाखा तयार केली; संगीत स्वरप्रकाश पुस्तक लिहिले; आयुष्यभर सूक्ष्म स्वरसंशोधनाचा ध्यास घेतला आणि निषादयुक्त तंबोऱ्याचा वापर मैफलीमध्ये रूढ केला. आज या तंबोऱ्याची गोडी गायकांना आणि श्रोत्यांना लागलेली आहे. देवल-क्लेमंट्स यांनी ज्या श्रुतिसिद्धांताची प्रस्थापना करण्याचा यत्न महाराष्ट्रात केला, त्यात खाँसाहेबांनी प्रायोगिक साहाय्य केले. त्यांचा त्या श्रुतिसिद्धांताच्या बाबतीत स्वतंत्र दृष्टिकोन होता. कर्नाटक संगीताचेही त्यांचे ज्ञान सखोल होते. संगीतसंशोधनाबद्दल त्यांना म्हैसूर-दरबारातील गायकवादकांनी १९१९-२० साली ‘संगीतरत्न प्राय:’ ही बहुमानाची पदवी आणि रत्नजडित कंठा अर्पण केला. ज्या काळात गायक मंडळी आपले गायन ध्वनीमुद्रित करण्यास मान्यता देत नसत, त्या काळात त्यांनी त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका काढण्यास मान्यता दिली. त्याच्या ३४ ध्वनिमुद्रिका उपलब्ध आहेत. यामुळेही किराना घराण्याच्या गायकीचा प्रसार महाराष्ट्रात झाला.
अब्दुल करीमखाँहेब बडोद्याला असताना सरदार माने यांच्या आश्रित हिराबाई आणि त्यांची कन्या ताराबाई यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ते त्यांना गाणे शिकवित असत. या शिकवणीच्या काळातच हिराबाईंचा गंभीर आजाराने मृत्यू झाला. काही कालावधीनंतर त्यांनी ताराबाईंशी विवाह केला. विवाहसमयी ताराबाईंनी धर्मांतर केले व त्या ताहिराबीबी झाल्या. ख्यातनाम गायिका हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे आणि प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने ही त्यांचीच अपत्ये. पुढे दोघांत बेबनाव झाल्याने ते विभक्त झाले.
पाँडिचेरीला योगी श्री अरविंदांना त्यांच्या इच्छेनुसार गाणे ऐकविण्यासाठी जात असताना, वाटेत कोकिला या स्थानकावर त्यांचे रात्री बाराच्या सुमारास अचानक निधन झाले. त्यांची कबर मिरजेला आहे.
खाँसाहेबांचा स्वभाव निगर्वी आणि सौम्य होता. खाँसाहेबांची शिष्य-प्रशिष्य-शाखा बरीच मोठी आणि लोकप्रिय झालेली आहे. तीत सवाई गंधर्व, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, शंकरराव कपिलेश्वरी, सुरेशबाबू माने, रोशनआरा बेगम, विश्वनाथबुवा जाधव, बेहेरेबुवा इ. अनेक शिष्यांचा समावेश आहे आणि त्यांच्या प्रशिष्यांमध्ये भीमसेन जोशी, गंगूबाई हनगल, फिरोज दस्तुर, यशवंतराय पुरोहित अशा अनेक कलावंत मंडळींचा समावेश होतो.
समीक्षण : श्रीकांत डिग्रजकर