उत्तर प्रदेशातील एक प्राचीन स्थळ. हे प्रयागराज (जुने अलाहाबाद) शहरापासून पूर्वेस ७ किमी. अंतरावर, गंगा नदीच्या तीरावर गंगा – यमुना संगमाजवळ आहे. या स्थळाला प्राचीन काळात ‘प्रतिष्ठानपूर’ म्हणून संबोधले जात होते.
वाल्मिकीरामायणानुसार या स्थळाची स्थापना चंद्रवंशीय राजा पुरुरवा याने केली होती आणि पुरुवंशीय राजवंशाच्या काळात हे राजधानीचे क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. या राजवंशातील अयु, नहूष, ययाती, पुरुराजांचे संदर्भ मत्स्य, वायू, विष्णू, ब्रह्म आणि भागवत पुराणांमध्ये मिळतात. कवी कालिदास यांच्या विक्रमोर्वशीय या नाटकात या स्थळाचे उल्लेख आढळतात. इ. बाराव्या शतकाच्या प्रतिहार आणि गहडवाल राजवंशांच्या ताम्रपटांमध्येही ‘प्रतिष्ठानपूर’ म्हणून या स्थळाचे उल्लेख आढळतात.
या स्थळाच्या पांढरीच्या टेकाडाचा आकार साधारणतः उत्तर – दक्षिण ३ किमी., तर पूर्व – पश्चिम १.५ किमी. इतका विस्तीर्ण असून टेकाडाची उंची १६ मी. इतकी होती. या महत्त्वपूर्ण प्राचीन स्थळाची ऐतिहासिक सत्यता पडताळून पाहण्याकरिता, स्तरशास्त्रीय अध्ययन करण्याकरिता आणि या स्थळाच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया तपासण्याकरिता प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्व विभाग, अलाहाबाद विद्यापीठाच्या चमूने सन १९९५, १९९८, १९९९, २००२ आणि २००३ या पाच सत्रांमध्ये समुद्रकूप या टेकाडावर उत्खनन केले.
उत्खननात एकूण सहा सांस्कृतिक क्रम उजेडात आले. यांमध्ये पहिला कालखंड नवाश्मयुगाचा, दुसरा ताम्रपाषाण संस्कृतीचा, तिसरा आद्य लोहयुग, चौथा उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृद्भांड्यांचा, पाचवा शुंग-कुषाण काळाचा आणि सहावा आद्य-मध्ययुगाचा आहे.
नवाश्मयुगीन स्तरात हस्तनिर्मित आणि दोरांचे छाप असलेली, चकाकीयुक्त काळ्या रंगाची, काळ्या – आणि – तांबड्या रंगांची खापरे, दगडी आणि हाडांची हत्यारे मिळाली आहेत. नवाश्मयुगीन लोक साध्या वर्तुळाकार आकाराच्या कुडाच्या झोपड्यांत राहत असत. झूसी येथील उत्खननामुळे मध्य गंगा-खोऱ्याच्या पश्चिम क्षेत्रातील प्रारंभिक शेती (तांदूळ) आणि पशुपालनाचे प्रमाण मिळाले. ताम्रपाषाण संस्कृतीमध्ये काळी लेपयुक्त, काळ्या – आणि – तांबड्या रंगांची, लाल रंगाची विविध लेप असलेली आणि चित्रित खापरे, हाडांची बाणाग्रे, दगडी आणि मातीचे मणी मिळाले असून हे लोक मातीने सारवलेल्या घरात राहत असत. ताम्रपाषाण नंतरच्या आद्य लोहयुगीन (उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृद्भांडी-पूर्व) लोक काळी लेपयुक्त, काळी चकाकीयुक्त, काळ्या – आणि – तांबड्या रंगाची मृद्भांडी वापरत असत. हे लोक कुडाच्या मातीने सारवलेल्या घरात राहत. त्या कालखंडातील धातूची अवजारे, हाडांची अवजारे व दगडी मणी इत्यादी उत्खननात मिळाले.
झूसी या स्थळाच्या प्रारंभिक ऐतिहासिक काळाची सुरुवात उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृद्भांडी (एनबीपीडब्ल्यू) वापरणाऱ्या कालखंडापासून होते. नावाप्रमाणे ही मृद्भांडी उत्कृष्ट बनावटीची, उच्च चकाकी व विभिन्न छटा असलेली, उत्कृष्ट भाजणीची आणि पातळ पोताची असून यांमध्ये वाडगे, थाळ्या, झाकणी इत्यादी प्रमुख आकार आहेत. याच्याबरोबर साधी तांबड्या रंगाची, काळी – आणि – तांबड्या रंगांची, काळी लेपयुक्त आणि राखडी रंगाची मृद्भांडी प्राप्त झाली. या कालखंडाला खापराच्या बनावटीनुसार, स्थापत्यानुसार आणि पुरावशेषांच्या आधारावर प्रारंभिक, मध्य आणि उत्तर या तीन टप्प्यांमध्ये विभागले आहे. या कालखंडातील प्रारंभिक टप्प्यातील लोक (इ. स. पू. सातवे ते सहावे शतक) कुडाच्या घरात राहत होती. या स्तरातील आहत नाणी, तांब्याची नाणी, भाजक्या मातीच्या मुद्रा आणि मुद्रांक, मातीची पशुशिल्पे इत्यादी पुरावशेष महत्त्वपूर्ण आहेत. घर बांधणीकरिता भाजलेल्या विटांचा उपयोग या कालखंडाच्या मध्य टप्प्यापासून (इ. स. पू. पाचवे शतक) सुरू होतो. सांडपाण्याकरिता वापरलेल्या कुपाचे पुरावेदेखील याच कालखंडातील आहेत.
एकंदरीत या कालखंडातील महत्त्वपूर्ण पुरावशेषांमध्ये दगडी मणी, हाडांची अवजारे, लोखंडी हत्यारे, तांब्याच्या विविध वस्तू, चांदीची आहत नाणी, मातीची शिल्पे इत्यादींचा समावेश आहे. भाजलेल्या गव्हाचे, तांदूळ, मूग, मसूर, उडीद डाळ इत्यादींचे प्रमाण प्राप्त झाले आहे. हे लोक गाय, म्हैस, शेळी, मेंढी, डुक्कर इत्यादी प्राणी पाळीत होते. पाळीव प्राणी आणि माशांचा समावेश अन्नामध्ये होत होता. उत्खननात प्राप्त जाड राखडीच्या थरामुळे या कालखंडात आग लागल्याचे निष्पन्न झाले आहे. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार हा संपूर्ण कालखंड इ. स. पू. सातवे शतक ते इ. स. पू. दुसरे शतक इतका निश्चित केला आहे.
शुंग-कुषाण कालखंडातील स्तरामध्ये लाल रंगाची, लाल चकाकी युक्त, काळी – आणि – तांबड्या रंगांची आणि काळ्या रंगाची खापरे प्राप्त झाली आहेत, ज्यांमध्ये शुंग काळातील वैशिष्ट्यपूर्ण ठप्पा असलेली खापरे विशेष आहेत. मूठ असलेली झाकणे, विविध आकारांचे वाडगे, थाळ्या, कढया, रांजण, कप, सुरया, तवे, तोटीयुक्त वाडगे ही प्रमुख मृद्भांडी असून यांतील काहींवर कोरीव चिन्हे, आणि रेखीव अलंकरणदेखील आहे. या काळातील लोक विटांच्या घरात राहत. त्यांच्या चुली आणि सांडपाण्याचा निचरा करणार्या नाल्यांचे अवशेष उत्खननात मिळाले. वर्तुळाकार आकाराची तांब्यांची नाणी, मातीच्या मुद्रा व मुद्रांक, मणी, बांगड्या, मातीची शिल्पे, धातूची उपकरणे इत्यादी पुरावशेष महत्त्वाचे आहेत. हा कालखंड इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. दुसरे शतक इतका निर्धारित केला आहे.
गुप्त कालखंडातील लोक विशिष्ट लाल चमकदार लेपयुक्त खापरे वापरीत होते. यांमध्ये विविध आकारांचे वाडगे, थाळ्या, सुरया, तवे, मडकी इत्यादी प्रमुख असून काहींवर कोरीव चिन्हे, ठप्पा आणि खोबणीयुक्त अलंकरण दिसून येते. साचेयुक्त भांड्याचे पुरावेदेखील उपलब्ध झाले आहेत. या कालखंडातील पुरावशेषांमध्ये दगडी मणी, भाजक्या मातीची शिल्पे, मणी, मानवी आणि पशुशिल्पे, काचेच्या, दगडी आणि शंखाच्या बांगड्या, पाटे-वरवंटे, तांब्याच्या बांगड्या, लोखंडी उपकरणे इत्यादी प्रमुख आहेत. गुप्त कालखंडामध्ये विटांच्या घरांचे अवशेष सापडले असून एका खोलीत साठवणीचे तीन रांजण मिळाले आहेत.
येथे आद्य-मध्ययुगीन कालखंडातील वसाहतीचे पुरावे आढळले. या काळात साधी लाल रंगाची, चकाकी असलेली विविध रंगांची खापरे ज्यांमध्ये वाडगे, सुरया, हंड्या, तोटीयुक्त आणि झाकण असलेली मडकी इत्यादी प्रामुख्याने प्राप्त झाली आहेत. कोरीव चिन्हे आणि ठप्पा असलेली खापरेदेखील कमी प्रमाणात आढळली आहेत. दगडी आणि मातीचे मणी, मृणमय मृण्मयशिल्पे, दगडी जाते आणि लोखंडी बाणाग्रे इत्यादी प्रमुख पुरावशेष आहेत. उत्खननात भरपूर प्रमाणात मिळालेल्या दगडी छिलक्यांवरून या कालखंडात येथील लोक मंदिर किंवा मूर्ती निर्माणकार्य करत असावेत, असे दिसते.
या स्थळावर नवाश्मयुगापासून ते आद्य-मध्ययुगापर्यंतच्या सांस्कृतिक कालक्रमाबाबत महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध झाली. रेडिओ कार्बन कालमापन तिथीनुसार उत्तरेकडील काळी चकाकीयुक्त मृद्भांड्यांचा कालखंड इ. स. पू. सातवे शतक इतका निर्धारित झाल्याने द्वितीय नागरीकरणाच्या प्रकियेत या स्थळाने महत्त्वाची भूमिका साकारल्याचे निष्पन्न झाले. ऐतिहासिक काळातील अवशेषांच्या आधारावर असे दिसून येते की, सदर स्थळ तत्कालीन प्रयाग-क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून प्रख्यात होते. सद्यस्थितीत येथील पांढरीच्या टेकाडावरील वाढती मानवी वस्ती आणि अतिक्रमणामुळे सदर पुरास्थळ नष्ट होण्याच्या स्थितीत आहे.
संदर्भ :
- Mishra V. D.; Mishra, B. B.; Pandey, J. N. & Pal, J. N. ‘A Preliminary Report on Excavations at Jhusi’, Pragdhara, No.6, pp.63-66, 1995-96.
- Mishra, V. D.; Pal, J. N. & Gupta, M. C. ‘Further Excavations at Jhusi, District Allahabad (Uttar Pradesh): 1998’, Pragdhara, No.9, pp. 43-49, 1998-99.
- Mishra, V.D.; Pal, J. N.; Gupta, M. C. & Joglekar, P. P. Excavations at Jhusi (Pratisthanpur), Special Report No.3, Indian Archaeological Society, New Delhi, 2009.
समीक्षक : प्रमोद जोगळेकर