उत्तर प्रदेशातील सिद्धार्थ नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन स्थळ. इ. स. १८९८ मध्ये विल्यम पेपे या इंग्रज जमीनदाराने येथील आपल्या जमिनीत असलेल्या मोठ्या टेकाडाचे उत्खनन केले. त्यावरील झाडे झुडपे दूर केल्यावर येथे भाजक्या विटांचा स्तूप असल्याचे त्याच्या लक्षात आले. या स्तूपाला अठरा फूट खोल छेद दिल्यावर पेपेला एक वालुकाश्माची पेटी सापडली. यात पाच अस्थिकलश ठेवलेले आढळले. पैकी दोन दगडी होते, एक स्फटिकाचा असून त्यावर माशाच्या आकाराची मूठ असलेले झाकण होते आणि एक दगडी पेटी होती. यात अस्थी आणि सोन्याचे लहान दागिने, ओवण्यासाठी छिद्र असलेली फुले आणि मूल्यवान मणी सापडले. यांपैकी एका कलशावर सदतीस अक्षरांचा ब्राह्मी लेख कोरलेला आहे.

पिप्रहवा येथील अवशेष पात्रावरील लेख.

पेपे याने दगडी पेटीमधील सर्व वस्तूंचे अस्थी आणि हाडे व इतर मूल्यवान वस्तू असे वर्गीकरण केले. याबाबतचा अहवाल, नकाशे तसेच वर नमूद कलशावरील ब्राह्मी लेखाची प्रत लंडनस्थित रॉयल एशियाटिक सोसायटीला सादर केली. यावर विन्सेंट स्मिथ यांनी आपले भाष्य प्रसिद्ध केले. मात्र ब्राह्मी लिपीवर प्रभुत्व नसल्याने त्यांनी पूर्ण लेखाचे वाचन केले नाही. पेपे याने प्रसिद्ध केलेल्या प्रतीवरून जॉर्ज ब्यूहलर यांनी या लेखाचे ‘भगवान बुद्धांचा अस्थी कलश, हा शाक्य सुकिती बंधु, त्यांच्या भगिनी, पुत्र आणि पत्नी यांनी स्थापन केला आहे’ असे वाचन केले (इयं सलिल निधने बुधस भगवते सकि (यानं) सुकिति भतिनं स भगिनिकनं स पुत दलनं).

लेखाची भाषा मागधी प्राकृत असून लिपी पिप्राहवाच्या आसपास सापडणार्‍या स्तंभांप्रमाणे अशोककालीन ब्राह्मी आहे. लेखात ‘र’ च्या ऐवजी ‘ल’ चा वापर झाला आहे (सलिल-सरीर). ‘ध’ अक्षराचे पोट उजवीकडे आहे, तर अनुस्वार अक्षराच्या बाजूस आणि उकार मध्यात दिला आहे. ही अशोककालीन लिपी वैशिष्ट्ये कालांतराने कालबाह्य झाली. पुराभिलेख अभ्यासकांमध्ये याच्या वाचनाबाबत एकमत होऊ शकले नाही. सिल्वु लेवी आणि जॉन फ्लिट यांनी प्रस्तुत लेखाचा असा अर्थ लावला की, या अस्थी बुद्धाच्या नसून कोसल देशाचा राजा विदुदाभ याने हत्या केलेल्या शाक्यांच्या आहेत. त्यांनी या लेखाचे वाचन ‘या अस्थी भगवान बुद्धाचे शाक्य बंधू, त्यांच्या भगिनी, पुत्र आणि त्यांच्या पत्नी यांच्या आहेत. तर एमिल सेनार्ट, ऑगस्ट बार्थ, हाइनरिश ल्यूडर्स आणि हॅरी फाल्क यांच्या मते, या अस्थी बुद्धाच्या होत्या. ल्यूडर्स याने प्रस्तुत लेखाचे वाचन ‘शाक्य कुळातील भगवान बुद्धांच्या अस्थींचा निधी ही सुकीर्तीचे बंधू, भगिनी, पुत्र आणि पत्नी यांनी दिलेले दान आहे.’ असे केले. हेच वाचन आता सर्वमान्य आहे.

या मतांतरामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित झाला, तो म्हणजे हा स्तूप कोणी बांधला? दिघनिकायातील महापरिनिब्बाणसूत्रानुसार कुशिनगर येथे बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या अस्थींचे द्रोण नावाच्या ब्राह्मणाने मगधचा राजा अजातशत्रु, वैशालीचे लिच्छवी, कपिलवस्तूचे शाक्य, रामग्रामचे कोलिय, पावाचे व कुशिनगरचे मल्ल, अल्लाकप्पाचे बुला आणि वेठदीपक ब्राह्मण यांच्यात आठ भागात वाटप केले. यानंतर  प्रत्येकाने या अस्थींवर स्तूप बांधून समारंभ साजरा केला.

अशोकअवदानातील बौद्ध परंपरेनुसार इ. स. पू. तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने रामग्रामचे कोलीय वगळता उर्वरित स्तूपांमधून अस्थी गोळा करून त्यांचे भारतभर वाटप करून नव्याने स्तूपांची स्थापना केली. पेपेने उत्खनन केलेल्या स्तूपाच्या परिसरात अनेक अशोकस्तंभ आढळतात. त्यांवरील अशोकाच्या राजाज्ञा त्याने काही महत्त्वाच्या बौद्ध स्थळांना दिलेल्या भेटी आणि तेथील स्तूपांची पुनर्बांधणी यांची माहिती देतात. निगलिहवा येथील स्तंभलेखाप्रमाणे त्याच्या शासनवर्षाच्या चौदाव्या वर्षी येथील स्तूपाचा अशोकाने दुसर्‍यांदा विस्तार केला आणि विसाव्या वर्षी या स्थळाला जातीने भेट देऊन येथे स्तंभ उभारला. हे ठिकाण कोणागमन या भद्रकल्पातील बुद्धाचे निर्वाणस्थळ होते. याच वर्षी सम्राट अशोकाने लुंबिनी (रूम्मीनदेई) या गौतम बुद्धांच्या जन्मस्थळाला भेट दिली आणि त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक स्तंभ उभारून त्यावर लेख कोरला. याच्याच जवळ असलेल्या गोटीहवा येथेही अशोकस्तंभाचा एक भाग आहे. थेरवाद प्रथेप्रमाणे प्राचीन काळात या स्थळाचे नाव क्षेमवती होते आणि भद्रकल्पातील ककुसंध बुद्धाचे ते जन्मस्थान होते.

वर उल्लेख केल्याप्रमाणे कपिलवस्तूच्या शाक्यांना बुद्धाच्या अस्थींचा भाग मिळाला असून त्यावर स्तूप बांधला गेला होता. मात्र अद्याप कपिलवस्तूची भौगोलिक निश्चिती होऊ शकली नाही. हे ठिकाण नेपाळमधील तिलाउरकोट किंवा येथून १६ किमी. अंतरावर उतर प्रदेशातील पिप्राहवा हे असावे, याबाबत एकमत नाही.

१९७१ मध्ये भारतीय पुरातत्त्व विभागातर्फे के. एम. श्रीवास्तव यांनी पेपेपेक्षाही अधिक खोलवर उत्खनन केले. एकोणीस फुटावर त्यांना दोन भाजक्या विटांचे कक्ष आढळले. दोन्ही कक्षांमध्ये लाल रंगाच्या खापरांमध्ये काही अवशेष आढळले. मात्र त्यांचे स्वरूप समजू शकले नाही. वालुकाश्माच्या अवशेषपात्रांमध्ये मात्र अस्थी सापडल्या. यांचा काळ पेपे याने उत्खनन केलेल्या अवशेष आणि कलशावरील लिपीपेक्षा निश्चित प्राचीन होता.

खुद्द पिप्राहवा येथे अशोकस्तंभ किंवा त्याची राजाज्ञा सापडली नसली, तरी या पुराव्यांवरून असे अनुमान बांधता येते की या स्तूपाची तीनदा बांधणी झाली. पहिल्यांदा इ. स. पू. पाचव्या शतकात कपिलवस्तूच्या शाक्यांनी की, ज्याचे अवशेष श्रीवास्तव यांना सापडले. पेपे याला सापडलेले दगडी पेटी व त्यातील सर्व अस्थीकलश व इतर मूल्यवान वस्तू आणि त्यावर उभारलेला विटांचा स्तूप हे अशोककालीन असावे. पुढे कुषाण काळात पुन्हा एकदा या स्तूपाचा विस्तार केला गेला. अहमद हसन दानी आणि हॅरी फाल्क या अभ्यासकांनी प्रस्तुत लेख आणि स्तूप व त्यांतील वस्तू अशोककालीन असल्याचा दाखला दिला आहे.

संदर्भ :

  • Bühler, G, ‘Preliminary Note on a Recently Discovered Śākya Inscription’, The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland, ,pp. 387-389, April 1898.
  • Falk, Harry, ‘The Ashes of the Buddha’, Bulletin of the Asia Institute, New Series, Vol. 27, pp. 43-75, 2013
  • Fleet, J. F. ‘The Inscription on the Piprahwa Vase’, The Journal of the Royal Asiatic Society of Great Britain and Ireland, pp. 105-130, January 1907.
  • Peppe, W. C. ‘The Piprāhwā Stūpa, containing relics of Buddha, by William Claxton Peppé, Esq, communicated with a note by Vincent A. Smith, ICS, MRAS’, Journal of the Royal Asiatic Society, pp. 573-579,  July 1898,
  • Sircar, D. C. Select Inscriptions Bearing on Indian History and Civilization, Calcutta, 1942.

 समीक्षक : मंजिरी भालेराव