गॅलो, रॉबर्ट चार्ल्स :  ( २३ मार्च १९३७ )

रॉबर्ट सी गॅलो यांचा जन्म वॉटरबरी, कनेक्टीकट येथे झाला. मार्क्स कॉक्स यांच्यामुळे त्यांना पेशींच्या अभ्यासाची गोडी लागली. तसेच प्रेतांची उत्तरीय तपासणी करण्यासाठीदेखील ते डॉक्टरांना मदत करू लागले आणि या दोन घटनांचा त्यांच्या आयुष्यावरील परिणाम म्हणजे त्यांनी वैद्यकीय शिक्षण घ्यायचे ठरवले.

गॅलो यांनी प्रॉव्हिडंस कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन जीवशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. फिलाडेल्फिया येथील जेफरसन वैद्यकीय महाविद्यालयात अभ्यास करताना संशोधनासाठी ते जेफरसन एर्स्लेव्हज् प्रयोगशाळेत (Erslev’s Lab of Jefferson) दाखल झाले. या विद्यार्थीदशेच्या काळातच कोळसा खाणीत कमी प्राणवायू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या शरीरातील पेशींवर होणाऱ्या दुष्परिणामांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचा पहिला पेपर प्रकाशित झाला. गॅलो यांनी वैद्यकशास्त्राची पदवी प्राप्त केल्यानंतर ते शिकागो येथे गेले. शिकागोमध्ये रक्तपेशींचा अभ्यास सुरू होता. येथे त्यांनी  रक्तातील हिमोग्लोबीन या प्रथिनावर संशोधन केले.

ते १९६५ मध्ये राष्ट्रीय आरोग्य संस्था बेथिसडा, मेरीलँड येथे ते कॅन्सरग्रस्त लहान मुलांवर उपचार करत. २० वर्षांपूर्वी त्यांच्या बहिणीचा ज्या कर्करोगाने मृत्यू झाला त्या कर्करोगाच्या रुग्णांवर त्यांनी केमोथेरपी हा रासायनिक उपचार करून त्यांचे प्राण वाचवले. त्यामुळे त्यांची तेथील औषध विभागप्रमुख सैमुर पेरी यांच्याबरोबर काम करण्यासाठी नेमणूक झाली. त्या काळी पेरी हे वेगवेगळ्या प्रकारच्या कर्करोगांमध्ये (रक्ताचा) श्वेतपेशींमध्ये होणाऱ्या बदलांवर अभ्यास करत होते. येथे गॅलो यांनी डीएनए तयार होताना लागणाऱ्या वेगवेगळ्या वितंचकांवर संशोधन सुरू केले. याच दरम्यान राष्ट्रीय कर्करोग धोरण आखण्यात आले. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य संघटनेत ट्युमर सेल बायोलॉजी म्हणजेच गाठपेशी जीवशास्त्राची प्रयोगशाळा सुरू झाली. त्याचे प्रमुख म्हणून रॉबर्ट गॅलो यांची तेथे नेमणूक झाली. या संस्थेत त्यांनी ३० वर्षे काम केले.

त्यांनी सुरू केलेल्या कर्करोगावरील संशोधनातून त्यांनी निष्कर्ष काढला की काही प्रकारच्या विषाणूमुळे कर्करोग होऊ शकतो आणि त्यादृष्टीने त्यांनी आर.एन.ए विषाणू (Retro Viruses) वर संशोधन सुरू केले. कर्करोगपेशींचे इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण सुरू केले. रॉबर्ट गॅलो आणि रॉबर्ट वॉलघर यांनी सदरील पेशीत असलेल्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूचा शोध लावला, परंतु त्यांच्या दुर्दैवाने सदरील संशोधन प्रमाणित करण्यासाठी त्यांनी त्या पेशींचे नमुने ज्या दुसऱ्या संशोधकांकडे तपासणीसाठी पाठवले, त्यात काही घोटाळे झाले तरी त्या अनुभवाने खचून न जाता त्यांनी त्यांचे काम जोमाने सुरू ठेवले.

रॉबर्ट गॅलो यांनी डेव्हिस मॉर्गन या संशोधिकेला श्वेत रक्तपेशी असलेल्या द्रवाची तपासणी करण्यास सांगितले. सदरील प्रयोगाअंती प्रयोगशाळेत लिम्फोसाइट या श्वेतपेशी वाढवण्यात ते यशस्वी झाले. या द्रव्याला त्यांनी TGIF (T-cell growth factor) असे नाव दिले. पुढे १९७८ नंतर ते इंटरल्युकीन – 2 (IL-2) म्हणून ओळखले जाऊ लागले. येथूनच त्यांच्या विषाणूविषयक संशोधनाची जोमाने सुरुवात झाली कारण वरील IL – 2 मुळे रक्तपेशी तसेच कर्करोगयुक्त पेशी प्रयोगशाळेत जिवंत ठेवणे व वाढवून त्यांचा अभ्यास करणे शक्य झाले. त्यानंतर लगेच त्यांनी मानवाच्या T-cell या रक्तपेशीस कर्करोगग्रस्त करणाऱ्या विषाणूंचा शोध लावला. त्याला  HTLV (Human T- cell Leukemia  virus) असे नाव दिले.

या त्यांच्या संशोधनातील यशानंतर त्यांच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा शोध एड्ससाठी कारणीभूत असलेल्या विषाणूचा ठरला. अमेरिकेत त्याकाळी एड्स या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात आला होता. तो लैंगिक संबंध, प्रदूषित रक्त आदी गोष्टींमुळे संक्रमित होत असल्याचे लक्षात आले. सदरील आजार हा आफ्रिका आणि कॅरेबियनमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आला. रॉबर्ट गॅलो यांनी शोधलेल्या HTLV विषाणूची लक्षणे आणि तत्कालीन एड्सची लक्षणे यातील साधर्म्य त्यांनी पटवून दिले आणि एड्स हा विषाणूमुळे होत असेल असे सांगितले. १९८२ मध्ये अमेरिकेतील राष्ट्रीय कर्करोग संस्थेने एड्स टास्क फोर्स ही संस्था स्थापन करून गॅलो यांना त्याचे प्रमुख म्हणून नेमले.

गॅलो यांनी मिक्युलस पॅपोव्हिक यांच्यासोबत एड्सच्या विषाणूचे संशोधन सुरू केले. वेगवेगळ्या रोग्यांच्या रक्ताचे नमुने एकत्र करून त्यांची T-lymphocytesच्या प्रयोगशाळेतील विषाणूची वाढ केली. गॅलो यांनी या विषाणूंचे नाव HTLV-3 असे ठेवले.

मानव विषाणू संस्था, मेरीलँड बाल्टीमोर या संस्थेचे रॉबर्ट गॅलो हे संचालक आणि सह-संस्थापक होते. ते जैवतंत्रज्ञान कंपनी प्रोफेक्टस, ग्लोबल व्हायरस नेटवर्क व जागतिक विषाणू संघटना यांचे सह-संस्थापक होते. त्यांना लास्कर हा मानाचा पुरस्कार दोनदा मिळाला.

 समीक्षक : रंजन गर्गे