समशेरबहादूर : (? १७३४ — १४ जानेवारी १७६१). मराठेशाहीतील एक पराक्रमी वीर. याची मुख्य कामगिरी उत्तर हिंदुस्थानात १७५६ ते १७६१ पर्यंत आढळते. हा पानिपतच्या लढाईत मराठ्यांच्या सैन्यात एका पथकाचा सेनापती होता. पेशवे बाजीराव पहिले (१७००—१७४०) आणि मस्तानी यांचा हा मुलगा. समशेरबहादूरचे लग्न १८ ऑक्टोबर १७५३ रोजी निमगिरीकरांच्या मेहेरबाईशी झाले. त्यांना अलीबहादूर उर्फ कृष्णसिंग नावाचा मुलगा होता.

समशेरबहादूर पेशव्यांच्या फौजेत सरदार पदावर होता आणि त्याच्या शौर्याबद्दल सैन्यात त्याचा मोठा लौकिक होता. मराठे आणि अब्दाली यांच्यात झालेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईत (१७६१) त्याचा सहभाग होता. अब्दालीच्या विरोधातील या मोहिमेसाठी त्याला बोलावण्यात आले. या रणसंग्रामात विश्वासराव पेशवे पडल्यानंतर सदाशिवभाऊ पेशव्यांनी गिलच्याला खाशानिशी मारण्याचा निश्चय केला. समशेरबहादुरास सोबत घेऊन पुढे होऊन झुंज दिली. यात अब्दुल अली दुराणी, रोहिला माघारी फिरून यमुना तीराने दोन कोस पळाले. नजीबखानाने हौद्यातून उतरून आणि दुंदेखान रोहिला आणि अहमद लंगडा यांनी उजव्या बाजूला असलेल्या शिंदे आणि होळकर यांना सोडून डाव्या बाजूस चढाई करून समशेरबहादुरास तोंड दिले. यावेळी त्याने मर्दुमकीने शत्रूला मार देऊन त्यांच्याकडून तोफा जिंकल्या. अनेकांना जखमी केले आणि स्वतःही जखमी झाला. यावेळी मराठी फौज फुट पडून पळाली. पुढे जखमी समशेरबहादूर भरतपूर येथे आला. तेथील राजा सुरजमल जाट याने त्याची देखभाल केली. पुढे तेथेच त्याचे निधन झाले. तेथे त्याची कबर आहे.

समशेरबहादूरची पत्नी आणि मुलाला पुढे पेशव्यांनी सांभाळले. त्याच्या वंशास बुंदेलखंडात बांद्याची जहागीर देण्यात आली. बांद्याचे नवाब म्हणजेच मस्तानीचा वंश. यांतील अनेकांनी मराठेशाहीत पराक्रम गाजवल्याचे दिसते.

संदर्भ :

  • सरदेसाई, गो. स. मराठी रियासत – मध्य विभाग (१७०७ —१७४०): हिंदुस्थानचा अर्वाचीन इतिहास, मुंबई, १९२०.
  • सरदेसाई, गो. स. मराठी रियासत – मध्य विभाग – ३ (१७५० —१७६१) : पानिपत प्रकरण, पुणे, १९२२.
  • हेरवाडकर, र. वि. भाऊसाहेबांची  बखर,  मुंबई, १९९४.

                                                                                                                                                                                      समीक्षक : विद्याचरण पुरंदरे