मराठ्यांच्या इतिहासातील एक प्रसिद्ध घराणे. सतराव्या शतकाच्या मध्यापासून ते उत्तर पेशवाईपर्यंत या घराण्यातील अनेक पिढ्यांनी स्वराज्याच्या कामी योगदान दिले.

या घराण्याचे मूळ पुरुष त्र्यंबक भास्कर. त्यांची छ. शिवाजी महाराजांशी जवळीक होती. १६५९ साली अफजलखान भेटीप्रसंगी छ. शिवाजी महाराजांनी त्र्यंबक भास्कर यांना फौजेची जबाबदारी दिली होती. यानंतर १६६० मध्ये पन्हाळगडावरून निघताना महाराजांनी गडाची जबाबदारी त्र्यंबक भास्करांकडे सांगितली होती. तसेच प्रभावळीची सुभेदारी (१६६१) आणि पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार (१६७०) म्हणून त्यांच्यावर जबाबदारी दिली. पुढे त्र्यंबक भास्कर पुरंदरच्या अगदी जवळ असलेल्या सासवडला स्थायिक झाले असावेत, असे दिसते. बहुधा याच सुमारास छ. शिवाजी महाराजांकडून या घराण्याला सुपे आणि सासवड परगण्याचे देश कुलकर्ण्य आणि कसबे सासवडचे कुलकर्ण्य मिळाले.

त्र्यंबक भास्करांच्या दोन मुलांपैकी थोरला मुलगा तुकदेव यांनी राजकारणातून लवकर अंग काढून घेतल्यामुळे सगळी जबाबदारी धाकट्या अंबाजींकडे आली. अंबाजीपंत आणि त्यांचा पुतण्या मल्हार तुकदेव हे स्वराज्याच्या कामात सहभागी असल्याचे दिसतात. १७०३ मध्ये औरंगजेबाने सिंहगडला वेढा घातला असताना सेनापती धनाजी जाधवांच्या दिमतीला असलेल्या बाळाजी विश्वनाथांनी अंबाजीपंतांकडे दारूगोळ्याची मागणी केली होती. अंबाजीपंतांचे राजकीय वजन जास्त होते, तसेच भोरचे पंतसचिव, पंतअमात्य, पंतप्रतिनिधी, सेनापती वगैरे मुख्य सरदारांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. शाहजादा आझमने सातारा आणि सज्जनगड जिकंण्याचा प्रयत्न केला, तेव्हा परशुराम पंतप्रतिनिधी यांनी आझमकडे पाठविलेले ‘अंबाजी पंडित’ हेच अंबाजीपंत पुरंदरे. पुढे छत्रपती शाहू महाराज १७०७ मध्ये माळव्यातून सुटून महाराष्ट्रात आले, तेव्हा महाराष्ट्रातून सैन्यासह त्यांना जाऊन मिळणारा पहिला सरदार हा मल्हार तुकदेव होता. या घटनेपासून छ. शाहू महाराजांचा या घराण्यावर लोभ जडला आणि हे घराणे सातारा दरबारातही विशेष सन्मानास पात्र झाले.

बाळाजी विश्वनाथ कोकणातून देशावर आल्यावर प्रथमतः त्यांचा संपर्क आला तो अंबाजीपंतांशी. चंद्रसेन जाधवांच्या आणि बाळाजी विश्वनाथांच्या तंट्यापासून अगदी प्रत्येक बाबतींत अंबाजीपंतांनी बाळाजी विश्वनाथांची पाठराखण केली. पुढे १७१३ मध्ये बाळाजी विश्वनाथांना पेशवाई मिळाल्यानंतर अंबाजीपंत पुरंदरे यांना सातारा दरबारात मुतालकी मिळाली. ही मुतालकी पुरंदरे घराण्याकडे शेवटपर्यंत सुरू राहिली. १७१६ मधील दमाजी थोरातांवरच्या हिंगणगावावरील छाप्यात अंबाजीपंत आणि बाळाजी विश्वनाथ दग्याने पकडले गेले. दमाजीने खंडणीसाठी अंबाजीपंतांच्या अंगाचे मांस तोडले, असे उल्लेख या घराण्याच्या यादीत आढळतात. १७१८-१७१९ च्या पेशव्यांच्या दिल्ली स्वारीत अंबाजीपंत सुद्धा सामील झाले होते. याच स्वारीत राजमाता येसूबाईंची सुटका होऊन चौथाई-सरदेशमुखी आणि स्वराज्य अशा तीनही सनदा दिल्ली दरबारातून मराठ्यांना मिळाल्या.

बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपदाचा वाद पुन्हा उकरला गेला, तेव्हा अंबाजीपंतांसह पिलाजी जाधवराव वगैरे मंडळींनी बाजीरावांचा पक्ष उचलून धरल्याने छ. शाहू महाराजांनी विश्वासाने बाजीरावांना पेशवाई दिली. १७२६ च्या मध्यावर अंबाजीपंत पुरंदरे यांनी माळव्यात स्वतंत्र मोहीम केली. यावेळी त्यांच्या सोबतीला पिलाजी जाधवराव वगैरे खाशी मंडळी होती. अंबाजीपंत मोहिमेवर असताना सातारा दरबारातील पेशव्यांच्या मुतालकीचे काम त्यांचा मुलगा महादोबा पाहत असे. बाजीरावांच्या १७३३ च्या जंजिरा मोहिमेत अंबाजीपंत पेशव्यांसोबत दंडाराजपुरीला तळ देऊन होते. १७३३ च्या अखेरीस अंबाजीपंत काशी यात्रेला गेले होते. पुढे २५ ऑगस्ट १७३५ रोजी सासवडला त्यांचा मृत्यू झाला.

अंबाजीपंतांनंतर या घराण्यातील महादजी अंबाजी (बाबा), नीलकंठ महादेव (आबा), मल्हार तुकदेव (दादोबा), धोंडो मल्हार (अप्पा), त्र्यंबक सदाशिव (नाना), महीपत त्र्यंबक (बजाबा) इत्यादी कर्तबगार पुरुषांनी स्वराज्याच्या कामी योगदान दिले. पेशवे स्वतः या घराण्याला आपल्या सख्ख्या भाऊबंदांप्रमाणे जपत असत. नानासाहेबांनी पुण्याच्या नगररचनेसोबत शनिवारवाड्याच्या कोट बांधायचा प्रारंभ केला. बारामतीकर जोशांसारख्या पेशव्यांच्या आप्तांनाही कोटाच्या आत घर बांधायला परवानगी नव्हती, पण याला अपवाद केवळ पुरंदऱ्यांचा होता. १७४८ च्या सुमारास महादजी अंबाजी आणि नानासाहेब पुरंदऱ्यांमध्ये वाद झाल्यावर ‘नानासाहेबांचं राजकारणात लक्ष लागत नव्हतं’, असे उल्लेख सापडतात. १८१८ मध्ये दुसऱ्या बाजीरावांच्या काळात तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात आबा पुरंदरे यांच्या फौजेवर मोठी भिस्त होती. सासवडच्या पुरंदरे वाड्याच्या प्रचंड तटावर अजूनही तोफगोळे आदळल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसतात.

सासवडच्या आसमंतातील अत्रे आणि पुरंदरे या दोन्ही घराण्यांमध्ये सासवडचे देश कुलकर्ण्य आणि कसबे सासवडचे कुलकर्ण्य यांवरून पूर्वीपासून वाद होता. यांसंबंधी छ. राजाराम महाराजांच्या काळापासून निवाडा झाल्याची पत्रे उपलब्ध आहेत. अत्रे आणि पुरंदरे ही दोन्ही घराणी छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून कर्तबगार असल्याने रामचंद्रपंत अमात्य वगैरे अनेक वरच्या लोकांना या वादात लक्ष घालावे लागले. पुढे सप्टेंबर १७२७ मध्ये सिंहगडच्या अमृतेश्वर मंदिरात निवाडा झाला. त्यात गोतसभेने एकमुखाने पुरंदरेंच्या बाजूने निवाडा दिला आणि या वादावर पडदा पडला.

सांप्रत सासवड, मोढवे वगैरे भागांत पुरंदऱ्यांचे वाडे असून सासवडमधील संगमेश्वराच्या मंदिराजवळचा थोरला सरकारवाडा प्रसिद्ध आहे. बाजीरावांनी शनिवारवाडा बांधला, त्याच्या मुख्य दरवाजाची रचना या वाड्यावरून केली असावी.

संदर्भ :

  • कस्तुरे, कौस्तुभ स. पुरंदरे :अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे, मुंबई, २०१६.
  • जोशी, शंकर नारायण, कृष्णाजी विनायक सोहोनी कृत सभासद बखर, पुणे, २०१६.
  • दिवेकर, सदाशिव महादेव, कवींद्र परमानंद कृत शिवभारत, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२७.
  • पारसनीस, दत्तात्रय, बळवंत ऐतिहासिक वंशावळी, मुंबई, १९५७.
  • पुरंदरे, कृष्णाजी वासुदेव, पुरंदरे दफ्तर, खंड १ ते ३, भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे, १९२९-३४.
  • राजवाडे, विश्वनाथ काशिनाथ, पुरंदरे शकावली : मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड-६,  पुणे, १९०५.

                                                                                                                                                                                    समीक्षक : विद्याचरण पुरंदरे