शिवराई : एक तांब्याचे चलनी नाणे. मराठेशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हे नाणे पाडले. याबद्दलची नेमकी माहिती एका समकालीन डच पत्रातून मिळते. सदर पत्रातील एक उतारा खालीलप्रमाणे :

‘रायरीच्या किल्ल्यावरून परतणाऱ्या अनेकांनी सांगितल्यानुसार, शिवाजी त्याच्या राज्याभिषेकाची आवश्यक ती सर्व तयारी करत असून, त्यासोबतच त्याने कुडाळ प्रांतात तांब्याची नाणी पाडलेली आहेत. या नाण्यांवर हिंदवी भाषेत siuraes tsitterpitti (शिवराज छत्रपती) असा मजकूर लिहिलेला असून, त्याचा अर्थ ‘शिवाजी, दौलतीचा अधिपती’ असा होतो.ʼ

सदर पत्र हे वेंगुर्ला येथे दिनांक १८ मे १६७४ रोजी, म्हणजेच राज्याभिषेकाच्या काही आठवडे आधी लिहिले गेले आहे. डच ईस्ट इंडिया कंपनीच्या वेंगुर्ला फॅक्टरीचा मुख्य अधिकारी अब्राहम लेफेबर याने तत्कालीन डच गव्हर्नर जनरल योआन माटसाउकर याला उद्देशून लिहिलेले हे पत्र असून त्यात अनेक गोष्टींचा अहवाल दिलेला आहे. यातून हे सिद्ध होते की, राज्याभिषेकाच्या आधी किमान काही आठवडे तरी शिवाजी महाराजांनी स्वत:ची नाणी पाडली होती. राज्याभिषेक समयी रायगडावर आलेला इंग्रज वकील हेन्री ऑक्झिंडन याने रायगडावरून  पाठवलेल्या (२७ मे १६७४) त्याच्या पत्रात राज्याभिषेकानंतर गडावर टांकसाळ सुरू करण्याचा शिवाजीचा हेतू असल्याचे म्हणतो. पुढे इंग्रजी कागदपत्रांतील एका नोंदीत रायगडावरील टांकसाळीचा उल्लेख सापडतो; परंतु राज्याभिषेकाच्या आधी ती सुरू झाल्याचा नेमका उल्लेख नाही. मोगल दरबारी इतिहासकार खाफीखान हा शिवाजी महाराजांनी शहाजीराजे मरण पावल्यावर (१६६४) राजगडावरून स्वत:च्या नावाची तांबे व सोन्याची नाणी पाडल्याचा उल्लेख करतो. खाफीखान आणि सदर डच पत्राखेरीज राज्याभिषेकाआधी नाणी पाडल्याचा उल्लेख कोणत्याही ऐतिहासिक साधनांत येत नाही. डच पत्रात नाण्यांवरील मजकुराचा अचूक उल्लेखही आहे. अन्य कोणत्याही ज्ञात कागदपत्रांत हा उल्लेख सापडत नाही. या पत्रावरून ‘छत्रपतीʼ हा शब्द शिवराई पैशांवर कोरला जात असे, हे स्पष्ट होते. ‘शिवराज छत्रपतीʼ हे नाव शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकप्रसंगी घेतल्याचा उल्लेख अन्य काही डच पत्रांमध्येही सापडतो.

शिवराई नाणी.

या प्रकारची नाणी ही नेहमी आढळणाऱ्या शिवराई पैशांपेक्षा खूप वेगळी आहेत. साधारणपणे आढळणाऱ्या शिवराई पैशांत शिवकालीन व उत्तरकालीन असे दोन भाग पाडता येतील. उत्तरकालीन नाण्यांवर एका बाजूस ‘श्री राजाʼ नंतर खाली दोन आडव्या रेषा असतात. त्यामुळे त्यांना दुदांडी असेही नाव आहे. शिवकालीन पैसे मात्र दुदांडी नसतात. साधारणपणे शिवकालीन पैशांवर एका बाजूला ‘श्री राजा शिवʼ हे तीन शब्द एकाखाली एक तीन ओळींत व दुसऱ्या बाजूस ‘छत्र पतीʼ हे दोन शब्द एकाखाली एक दोन ओळींत असतात. सदर (छायाचित्रातील) नाण्यांवर मात्र एका बाजूस ‘शिव राजʼ हे दोन शब्द एकाखाली एक आणि ‘छत्र पतीʼ हे दोन शब्द एकाखाली एक दोन ओळींत असतात. सामान्यत: शिवकालीन शिवराईची कडा ही दोन्ही बाजूंस बिंदुयुक्त असते. सदर प्रकारात मात्र कडा ही एकसंध वर्तुळरूप असते. सामान्यत: शिवकालीन शिवराई पैशाचे वजन हे ११-१२ ग्रॅमच्या दरम्यान आढळते, तर सदर नाण्याचे वजन १५-१६ ग्रॅम आढळते. या प्रकारातील नाणी अतिदुर्मीळ असून, सांप्रत अशी तीन ते चार नाणी ज्ञात आहेत. सदर प्रकारातले नाणे सर्वप्रथम गोडबोले यांनी १९९३ साली प्रकाशित केले.

छ. शिवाजी महाराजांची काही विशिष्ट सांस्कृतिक धोरणे या नाण्यांद्वारेही दिसून येतात. तत्कालीन प्रचलित सांस्कृतिक धारणांना छेद देत त्यांनी आपला शिक्का संस्कृत भाषेत व देवनागरी लिपीत बनवला. नाण्यांवर फार्सीऐवजी देवनागरी लिपीचा वापर केला. नाण्यांवरील ‘छत्रपतीʼ हे बिरुदही विशेष उल्लेखनीय आहे. छ. शिवाजी महाराजांच्या पूर्वी या शब्दाचा वापर तुरळक ठिकाणी आढळतो. उदा., महिकावतीची बखर. या शब्दाचे मूळ ऋग्वेदातील ‘क्षत्रपतीʼ पर्यंत जाते. स्वत:ला क्षत्रियांचा पती अर्थात स्वामी म्हणवण्यामागे स्वत:च्या ठायी सर्व हिंदू सरदारांचे आधिपत्य कल्पिलेले असून, कोणत्याही सुलतानाप्रती कोणत्याही प्रकारे सेवकभाव न दाखवून सार्वभौम क्षत्रिय सत्ताधीश अशी स्वत:च्या सामर्थ्याची तात्त्विक मांडणी केलेली आहे. ही सार्वभौम मांडणी तत्कालीन भारताच्या परिप्रेक्ष्यात अभिनव होती. छ. शिवाजी महाराजांच्या वारसदारांनीही स्वत:ला छत्रपती हे बिरुद लावल्याने महाराष्ट्रात ते सुपरिचित झाले.

संदर्भ :

  • Bellarykar, Nikhil, ‘Chhatrapati’ before coronation? Legends on the Earliest Maratha Copper Coinage in Light of Documentary Evidenceʼ, Numismatic Digest, Vol. 42, IIRNS Publications, Mumbai, India, 2018.
  • Godbole, S. D. A new type of Shivrai and a coin die, Newsletter of the Oriental Numismatic Society, 136, London, UK, 1993.
  • छायासौजन्य : डॉ. शैलेंद्र भांडारे, ॲश्मोलिअन म्युझियम, ऑक्सफर्ड विद्यापीठ, युनायटेड किंग्डम.

                                                                                                                                                                                      समीक्षक : संदीप परांजपे