श्टेकेल, व्हिल्हेल्म वुल्फ : (१८ मार्च १८६८–२७ जून १९४०). ऑस्ट्रियन मानसोपचारतज्ज्ञ. जन्म रूमानियातील चेरनॉव्ह्त्सी ह्या शहरी. व्हिएन्ना येथे त्याने वैद्यकाचे शिक्षण घेतले आणि नंतर तेथेच वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. विख्यात मानसोपचारतज्ज्ञ सिग्मंड फ्रॉइड ह्याच्या इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स  ह्या पुस्तकावर त्याने लिहिलेल्या अनुकूल परीक्षणामुळे फ्रॉइडशी त्याचा परिचय होऊन तो फ्रॉइडचा एक निकटचा सहकारी बनला. पुढे फ्रॉइडबरोबर त्याचे मतभेद झाले. त्यानंतर ‘ॲक्टिव्ह, शॉर्ट-टर्म, अनॅलिटिक सायकोथेरपी’ ही मानसोपचाराची स्वतःची स्वतंत्र पद्धत तो वापरू लागला.

मानसोपचाराच्या प्रकियेत मनोरूग्ण अनेकदा अनेक प्रकारे प्रतिरोध करून मनोविश्लेषणात अडथळे आणतो व ते टाळू पाहतो. अशावेळी मानसोपचारतज्ज्ञाने सक्रिय–आवश्यक तर आक्रमक–होऊन तो प्रतिरोध निष्प्रभ करावा, असे श्टेकेलचे मत होते. आपल्या रुग्णावस्थेमुळे प्राप्त होणारे काही फायदे सोडून द्यावयाला रुग्ण तयार नसतो, म्हणून हे घडत असते, असे श्टेकेलचे म्हणणे होते. रुग्णाच्या स्वप्नांच्या विश्लेषणातून त्याच्या अंतर्मनातील संघर्ष समजून घेता येतात आणि त्यांचा यथार्थ अन्वयार्थही लावता येतो, ही श्टेकेलची भूमिका होती. मात्र यासाठी अन्वयार्थ लावण्यासारखी भेदक अंतर्दृष्टी आणि प्रतिभा हवी व ती सर्वच मानसोपचारतज्ज्ञांत असेल, याची खात्री देता येत नाही. श्टेकेलच्या उपचारपद्धतीमधील ही एक उणीव मानली जाते.

फ्रॉइडने अबोधाला (द अन्‌कॉन्‌शस) जेवढे महत्त्व दिले, तेवढे श्टेकेलने दिले नाही. फ्रॉइडची निरोधनाची (रिप्रेशन) संकल्पनाही त्याने नाकारली. रुग्णाला अप्रशस्त वाटणाऱ्या वासना, कल्पना, विचार आणि स्मृती ह्यांतून निर्माण होणाऱ्या संघर्षाचे नेणिवेच्या पातळीवर निरोधन घडून येते आणि अशा निरोधित गोष्टी रुग्णाच्या जाणिवेच्या कक्षेबाहेर राहतात, असे फ्रॉइडचे प्रतिपादन होते. श्टेकेलच्या मते रुग्णाचे सर्व जरी नाही, तरी बऱ्याचशा संघर्षाचे, फ्रॉइड म्हणतो त्या अर्थाने, निरोधन होत नाही, तर त्या संघर्षाकडे रुग्ण फक्त दुर्लक्ष करीत असतो.

मानसोपचारतज्ज्ञ म्हणून आपली निरीक्षणे, तसेच आपले उपचारतंत्र आपल्या विपुल लेखनातून श्टेकेलने स्पष्ट केले आहे.

फॅसिस्टविरोधी भूमिकेमुळे श्टेकेल १९३८ साली व्हिएन्ना सोडून लंडनला आला. तेथे त्याला अनेक आजारांनी ग्रासले. लंडन येथेच त्याचा मृत्यू झाला.

संदर्भ :

  • Brown, J. A. C. Freud and the Post-Freudians, London, 1963.