नॅप्था

पेट्रोलियम खनिज तेलातून मिळणाऱ्या विशिष्ट द्रावणात नॅप्थाचा समावेश होतो. या द्रावणात पाच ते दहा कार्बनयुक्त हायड्रोकार्बन रसायने असतात.

गुणधर्म : नॅप्थाचा उत्कलनबिंदू ३० — १७० से. इतका असतो. हे अतिशय बाष्पनशील द्रावण असते व खनिजतेलातून प्रत्यक्ष ऊर्ध्वपातनातून ते प्राप्त होते.

प्रकार : नॅप्थाचे दोन प्रकार असतात – उच्च ॲरोमॅटिक नॅप्था (High aromatic naphtha) आणि नीच ॲरोमॅटिक नॅप्था (Low aromatic naphtha), त्यांना अनुक्रमे साधारण आणि खनिज तेल रसायन (Petrochemical) असे संबोधितात.

नॅप्थामध्ये पॅराफिनिक, नॅप्थेनिक आणि ॲरोमॅटिक प्रकारची हायड्रोकार्बन रसायने समाविष्ट असतात. त्यातील ॲरोमॅटिक रसायनांवर कटाक्षाने नियंत्रण ठेवावे लागते. कारण खत कारखान्यांत त्यांचा विपरित परिणाम होऊ शकतो. ॲरोमटिक रसायने कर्कप्रेरकी असतात आणि त्यांच्या धुरकट वाफा स्वास्थ्याला हानी पोहचवू शकतात. उच्च ॲरोमॅटिक नॅप्था आणि नीच ॲरोमॅटिक नॅप्था यांमधील फरक त्यांतील ॲरोमेटिक हायड्रोकार्बन रसायनांचे प्रमाण दर्शवीत असतो. ते अनुक्रमे २५ आणि १० टक्क्यांपर्यंत ठेवलेले असते.  तसेच पदार्थांचे उत्पादन करताना संयंत्रात धातूचे उत्प्रेरक वापरतात. त्यांना निष्क्रिय करणारे व्हॅनेडियम, शिसे, सोडियम यांसारख्या धातूचे प्रमाण नॅप्थाची निर्मिती करताना अत्यल्प राखावे लागते. खतनिर्मिती करणाऱ्या संयंत्रात निकेल धातू उत्प्रेरकाची भूमिका बजावत असतो. त्या उत्प्रेरकला गंधक गंजवून टाकते व निष्क्रिय करते, म्हणून त्याचेही प्रमाण ०.१५ टक्क्यांइतके रोखावे लागते.

उपयोग : नॅप्थाचा मुख्य उपयोग खतनिर्मिती कारखान्यांत आणि खनिज तेल रसायन उद्योगांत इंधन व कच्चा माल म्हणून होतो. खतनिर्मिती संयंत्रांमध्ये उच्च तापमानाची गरज असते आणि तिथे इंधन म्हणून नॅप्था वापरतात. हे तापमान विशिष्ट संयंत्राच्या रचनेवर अवलंबून असते. वाफेच्या तापमानाद्वारा प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांत ऊर्जा निर्माण करण्यास नॅप्था वापरतात. आधुनिक गॅसटर्बाइनमध्ये सुध्दा इंधन म्हणून त्याचा वापर होतो.

संदर्भ : Product Manual, BPCL, Mumbai (2007).

 समीक्षक : राजीव चिटणीस