पाश्चात्त्य ज्ञानमीमांसेत पारंपरिक आणि आधुनिक विचारपद्धती असा भेद करण्यात आला आहे. भाषा व भाषेच्या अर्थासंबंधी पारंपरिक तत्त्ववेत्त्यांनी जेथे वरवरचा विचार केला आहे. तेथे आधुनिक तत्त्ववेत्त्यांनी त्याच्या मुळात जाऊन विचार केला असल्याचे स्पष्टपणे पाहावयास मिळते. ज्यातून तार्किक भाषा, आदर्श भाषा, भौतिकीय भाषा इत्यादींचा उगम झाला आहे.

पारंपरिक तत्त्ववेत्ते ‘अर्थ’ निश्चित करीत असताना जेथे सामान्यत्वाचा आणि निश्चित गुणांचा आधार घेतात, तेथे आधुनिक तत्त्ववेत्त्यांनी इंद्रिय निरीक्षणाचा अर्थात अनुभवगत तथ्यांचा आधार घेतला आहे. प्रामुख्याने चार्ल्स पर्स (१८३९−१९१४), बर्ट्रांड रसेल (१८७२−१९७०), लूटव्हिख  व्हिट्गेन्श्टाइन (१८८९−१९५१), ए. जे. एअर (१९१०−१९८९), रूडॉल्फ कारनॅप (१८९१−१९७०), कार्ल पॉपर (१९०२−१९९४), विलर्ड क्वाइन (१९०८−२०००), सी. एल. स्टीव्हन्सन (१९०८−१९७९), जॉन  ऑस्टिन (१९११−१९६०), गिल्बर्ट राइल (१९००−१९७६) आणि पीटर स्ट्रॉसन (१९१९−२००६) यांसारख्या आधुनिक तत्त्ववेत्त्यांनी भाषेच्या अर्थासंबंधी अधिक विचार केला आहे. मात्र या सर्वांमध्ये एकमत नसल्या कारणाने तेथे विविध सिद्धांत निर्माण झाले आहेत.

व्यवहाराश्रित अर्थसिद्धांत : या सिद्धांतानुसार ‘व्यवहार’ हाच अर्थनिर्णयाचा आधार असतो. या सिद्धांताचा प्रमुख पुरस्कर्ता चार्ल्स पर्स आहे. पर्सने वापरात आणलेली भाषा ही ‘वैज्ञानिक भाषा’ म्हणून ओळखली जाते. वास्तविक पाहता पर्सच्या मते भाषा ही चिन्हरूपी (Sign) आहे. ज्यात शब्द, विचार, विश्वास, भाव (Concept), प्रस्तावना (Proposition) यांचा समावेश होतो. त्याच्या मते जी भाषा ‘क्रियात्मक’ वा ‘व्यवहारात्मक’ रूपाने परिणामकारक किंवा फलात्मक असते, त्याच भाषेचा काहीतरी अर्थ असतो.

निर्देशात्मक सिद्धांत : या सिद्धांताच्या अनुषंगाने रसेलची भूमिका महत्त्वाची आहे. रसेलच्या मते ‘अर्थ’ (Meaning) या शब्दाच्या अर्थामध्ये एक प्रकारची मानसिकता दडलेली असते. परिणामी ‘अर्थ’ ला वस्तुनिष्ठ वा तार्किक सिद्धांत म्हणून स्थान देता येणार नाही. रसेलच्या तत्त्वचिंतनाचा मूलाधार तार्किक विश्लेषण हा आहे. रसेल आपल्या तार्किक विश्लेषणामध्ये तार्किक रूपांसह (Logical Forms) सामान्य भाषेच्या विश्लेषणालादेखील महत्त्व देतो. त्या अनुषंगाने तो वर्णन सिद्धांत (Theory of Discription), प्रारूप सिद्धांत (Theory of Types) आणि तार्किक संरचना (Logical Construction) या तीन अंगांचा आधार घेतो. तार्किक संरचनेअंतर्गत रसेल दोन प्रक्रिया सूचवितो. पहिली, सामान्य ज्ञानाच्या विश्लेषणावरून सरळ (Simple) अणुतत्त्वांपर्यंत पोहोचण्याची आणि दुसरी, भौतिक पदार्थ किंवा अन्य मनासारखे वर्णन हे अणुवाक्यांनी संरचित असल्याचे दाखविण्याची आहे. या दोन प्रक्रियेच्या अनुषंगाने रसेल ‘तार्किक अणुवाद’ मांडतो.

रसेलच्या मतानुसार तार्किक अणुरूप हे एक भाषीय संघटन (Languageuses Unit) आहे, ज्याच्या साहाय्यानेच तथ्याची माहिती मिळते. एका अर्थाने या ठिकाणचे हे भाषीय संघटन म्हणजेच विधान (Proposition) होय, जे तथ्याला व्यक्त करीत असते. पण तथ्य म्हणजे ‘अस्तित्ववान’ वस्तू नव्हे, तर त्या वस्तूचा बाधित न होणारा गुण होय. उदा., ‘सूर्य’ हे तथ्य नव्हे, तर ‘सूर्य पूर्वेकडून उगवतो’, हे तथ्य होय. किंवा ‘टेबल’ हे तथ्य नव्हे, तर ‘टेबल चौकोण आहे’, हे तथ्य होय. पण तथ्य ही सत्य किंवा असत्य नसतात, तर तथ्य ही ज्या वाक्यातून व्यक्त होतात तीच वाक्य सत्य किंवा असत्य असतात. पण असे असले तरीही वाक्याची सत्य किंवा असत्यता ही तथ्यावरच आधारित असते, हे विसरता येणार नाही. रसेलने वाक्याचे अणुवाक्य आणि आण्विक वाक्य असे दोन प्रकार केले आहेत.

चित्रसिद्धांत : हा मुळात रसेलचा आहे. परंतु व्हिट्गेन्श्टाइनने आपल्या ट्रॅक्टेटस लॉजिको फिलोसॉफिक्स या ग्रंथातून त्यावर प्रकाश टाकला असल्याचे अभ्यासक सांगतात. किंबहुना त्याने या सिद्धांताचा स्वीकारही केला. भाषेच्या या चित्रसिद्धांतानुसार, ‘‘शब्दाचा अर्थ ती ‘वस्तू’ असते ज्यासाठी तो शब्द प्रयुक्त झालेला असतो’’ या सिद्धांतानुसार वस्तू आणि घटनेची प्रकृती (स्वरूप) काय आहे? याचे चित्रण ज्यात होते, त्यात भाषेचा सार असतो. म्हणजेच या सिद्धांतानुसार वाक्य ही तथ्याची चित्रण करणारी असतात. विशेष म्हणजे वाक्याद्वारे तथ्याचे चित्रण होत असेल, तरच ते वाक्य सत्य ठरतात. अन्यथा ते असत्य ठरतात. वाक्याच्या सत्य-असत्यतेचा संबंध अर्थपूर्णतेशी नसतो. म्हणजे एखादे वाक्य जरी असत्य असले, तरीही ते अर्थपूर्ण असू शकते. व्हिट्गेन्श्टाइनदेखील सुरुवातीला अशाच प्रकारची भूमिका मांडतो. परंतु कालांतराने व्हिट्गेन्श्टाइन या भूमिकेविषयी असमाधान व्यक्त करतो. त्या अनुषंगाने तो या चित्रसिद्धांतासंदर्भात पुनः विचारदेखील करतो. किंबहुना त्यातूनच तो चित्रसिद्धांताचा अस्वीकार आणि ‘प्रयोग सिद्धांत’ची मांडणी करतो.

प्रयोग सिद्धांत : व्हिट्गेन्श्टाइनने आपल्या फिलॉसॉफिकल इन्व्हेस्टिगेशन्स या पुस्तकातून ‘प्रयोग सिद्धांता’ची मांडणी केली आहे. प्रयोग याचा अर्थ ‘वापर’ असा आहे. त्यानुसार भाषेचे विविध आयाम आहेत. व्हिट्गेन्श्टाइनच्या मते “आपण एखाद्याला आदेश देतो, त्या आदेशाचे पालन करतो, वस्तूचे विवरण देतो, घटणेच वर्णन करतो, अनुमान करतो, कल्पना करतो, रेखाचित्राच्या माध्यमातून परिणाम दर्शवितो, कथा लिहितो-ऐकतो, अभिनय करतो, कोडे-गणित सोडवितो इत्यादी” या सर्व क्रियांमध्ये भाषेची विविधता निहित आहे. अशा या भाषेच्या विविधतेला व्हिट्गेन्श्टाइन ‘भाषा खेळ’ असे म्हणतो. त्याच्या मतानुसार हा ‘भाषा खेळ’ ‘जीवन आकार’ यावर आधारित असतो. म्हणजेच तो भाषीय समुदायाच्या सर्व क्रिया आणि सवयी अर्थात संस्कृतीवर आधारित असतो. व्हिट्गेन्श्टाइनच्या या भूमिकेलाच भाषेचा ‘प्रयोग सिद्धांत’ असे म्हणतात.

सत्यापन सिद्धांत : हा तार्किक प्रत्यक्षवादाच्या संदर्भाने एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. तार्किक प्रत्यक्षवादावर व्हिट्गेन्श्टाइनचा मोठा प्रभाव होता. त्याच्या मतानुसार ‘तर्कवाक्याचा अर्थ त्याच्या सत्यापन विधीवर अवलंबून असतो’. सत्यापन या शब्दाचा सर्वसामान्य अर्थ ‘अनुभवात ज्याची पडताळणी करता येते ते’ असा होतो. म्हणजेच या सिद्धांतानुसार तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात येणाऱ्या वाक्यांमध्ये व्यक्तिगत कल्पना मान्य करता येत नाही; कारण अशा या व्यक्तिगत कल्पनेची पडताळणी प्रत्यक्ष अनुभवाचा विषय बनत नाही. याच आधारे हा सिद्धांत, ज्या शब्द वा वाक्यांची सत्यता पडताळूण पाहता येत नाही, अशांना तो निरर्थक ठरवितो.

परीक्षणीय आणि पुष्टीकरण सिद्धांत : या सिद्धांताची स्थापना कारनॅप याने केली आहे. या सिद्धांतानुसार अंशव्यापी वाक्यांची (Particular Proposition) सत्यता सिद्ध करणे कठीण असते. ‘हा कागद पिवळा आहे’ हे एक अंशव्यापी वाक्य आहे. या वाक्यातील कागद आणि पिवळेपणाचे ज्ञान आपल्याला होते. पण ते भ्रम नाही, हे कशावरून? या प्रश्नाच्या समाधानार्थ इतर एका व्यक्तींकडून त्या कागदाची आणि त्या पिवळेपणाची पुष्टी करून घावी लागते. पण त्याही व्यक्तीचे ते ज्ञान भ्रम नाही, हे कशावरून? एकंदर आपण एखाद्या विषयाची सत्यता निश्चित करू शकत नाहीत. पण अनेकांकडून परीक्षण करून परीक्षणाची संख्या वाढवू शकतो आणि त्या विषयासंदर्भातील ज्ञानाची पुष्टी देऊ शकतो. अशी कारनॅपची भूमिका असल्याचे दिसून येते.

असत्यापन सिद्धांत : या सिद्धांताची स्थापना कार्ल पॉपर याने केली आहे. पॉपरने सत्यापनाची अशक्यता (Impossibility) लक्षात घेऊन हा सिद्धांत मांडला आहे. त्याच्या मते आपण कोणत्याही तर्कवाक्याची सत्यता सिद्ध करू शकत नाही. पण असत्यता मात्र सिद्ध करू शकतो. उदा., एक पांढरा कावळा पाहून ‘सर्व कावळे काळे आहेत’ या तर्कवाक्याची असत्यता सिद्ध करता येते. अर्थात, असत्यता सिद्ध करणे हे सोपे, तर सत्यता सिद्ध करणे हे कठीण असते.

अनिर्धारित सिद्धांत : प्रामुख्याने या सिद्धांताच्या अनुकूल भूमिका क्वाइनने मांडली आहे. क्वाइन हा उग्र अनुभववादी तत्त्वज्ञ आहे. त्याच्या मते भाषेची सत्यता वास्तवावर अवलंबून असते. पण भाषा किंवा पदांचा ‘अर्थ’ त्यापेक्षा स्वतंत्र असतो, शिवाय अर्थ ‘कल्पना (Ideas) किंवा भाववान वस्तू (Mentalentities)’ असते हे मात्र क्वाइन अमान्य करतो.

उक्तिकृती (Performative) : वाक् क्रिया (Speech Act). हे ऑस्टिनच्या विचाराचा निष्कर्षात्मक भाग आहे. प्रामुख्याने या ठिकाणी तो स्थिरार्थक आणि क्रियात्मक कथनातला भेद संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करताना दिसतो. कारण त्याच्या दृष्टिकोनातून एकच कथन स्थिरार्थक आणि क्रियात्मक दोन्हीही असू शकते. उदा., अम्पायर क्रिकेट सामन्यातील पंचाद्वारे उच्चारलेले ‘Over’ हे एक कथन आहे. या कथनातून चेंडू फेकण्याची प्रक्रिया थांबविण्यासंदर्भात निर्देष केल्याचे स्पष्ट होते. म्हणून हे कथन क्रियात्मक ठरते. याशिवाय या कथनातून हेसुद्धा स्पष्ट वा निश्चित होते की, पाच नसून सहा चेंडू फेकण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. म्हणून हे कथन स्थिरार्थक ठरते. पण या दोन्ही कथनातून सत्य-असत्य यांपैकी नेमके एक काहीही स्पष्ट होत नाही. अर्थात, ते सत्य-असत्य यांपैकी काहीही असू शकते.

म्हणून ऑस्टिन आदेश देणे, सावध करणे, सल्ला देणे या क्रियात्मक घटनांसोबत वर्णन करणे, सूचना देणे इत्यादीला सुद्धा क्रियात्मक घटनाच मानतो आणि या सर्व क्रियांमध्ये ‘बोलणे’ ही सामान्य क्रिया असल्याचे माणून तो उक्तिकृती संकल्पनेला सिद्धांताचे स्वरूप प्राप्त करून देतो.

कोटिप्रमाद (कोटिदोष) सिद्धांत : हा राइलच्या विचारातून समोर आलेला सिद्धांत आहे. प्रामुख्याने भाषेतील विसंगती पाहून राइल भाषा विश्लेषणाला महत्त्व देतो. त्याच्या दृष्टिकोनातून कोटिप्रमादामुळे आपण आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्रुटियुक्त भाषेचा वापर करीत असतो. कारण आपण दोन वेगवेगळ्या कोटींना एकत्र करून त्याचा वापर करीत असतो. म्हणजे आपण ‘Mind and Body Exist’ असे विधान करीत असतो. जे की, ‘Mind Exist’, ‘Body Exist’ असे वेगवेगळे असावयास हवे. या शिवाय ‘विद्यापीठ’ म्हणजे अनेक महाविद्यालये, ग्रंथालये, मैदाने, विज्ञान केंद्र, प्रशासकीय इमारत यांचा समूह होय; असे मानण्याऐवजी विद्यापीठ म्हणजे एक संस्था वा कार्यालय होय, असे मानतो. परंतु हे असे मानने म्हणजे कोटिप्रमाद (Category Mistake) होय. राइलच्या मतानुसार कोटिप्रमादाचे व्यवस्थित आकलन न झाल्यानेच भाषेच्या अर्थासंबंधी दोष निर्माण होतो.

संदर्भ : 

  • कुमार, मृत्युंजय, दार्शनिक -त्रैमासिक, अंक-२, मध्य प्रदेश, २००३.
  • जोशी, ग. ना. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, खंड-३, पुणे, १९७५.
  • पांडे, कालीचरण, परामर्श, खंड-२३, पुणे, २००२.
  • मिश्र, नित्यानंद, समकालीन पाश्चात्त्य दर्शन, पुणे, २००७.
  • लाल, बसंत कुमार, समकालीन पाश्चात्त्य दर्शन, पुणे, २००९.

                                                                                                                                                समीक्षक – सुचित्रा नाईक