आयनिकवृत्त आणि वैषुविकवृत्त (Ecliptic and Celestial Equator) :
पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. परंतु, पृथ्वीवरील निरीक्षकाला सूर्यच आकाशात पश्चिमेकडून पूर्वेकडे एका ठराविक वर्तुळाकार मार्गावर, ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवर, पुढे पुढे सरकत चाललेला दिसतो. सूर्याच्या या वार्षिक भासमान मार्गाला आपण ‘आयनिकवृत्त’ (Ecliptic) असे म्हणतो. या आयनिकवृत्तावरच तारकासमूहातील १२ राशींचे विभाग आणि २७ नक्षत्रांचे चक्र कल्पिलेले आहे.
पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल जर कल्पनेने पृथ्वीबाहेर आकाशात वाढवले, तर ते आकाशाच्या गोलावर जिथे प्रक्षेपित होईल, त्या कल्पित महत्तम वर्तुळाला आपण ‘वैषुविकवृत्त’ (Celestial Equator) म्हणतो. ही दोनही वृत्ते आकाशात दिसत नाहीत. परंतु काही ठराविक ताऱ्यांना किंवा त्यांच्या गटांना कल्पनेने जोडून यांचा माग काढता येतो. रात्रीच्या आकाशात उत्तर ध्रुव तारा (पोलॅरिस; Polaris; Alpha Ursa Minoris) दिसत असेल, तर त्याच्यापासून दक्षिणेकडे ९० अंशात काढलेले पूर्व-पश्चिम वर्तुळ हे वैषुविकवृत्त बनते.
वैषुविकवृत्त आकाश निरीक्षण करताना संदर्भासाठी वापरता येते. मृगातला (Orion Constellation) मिन्टाका (Mintaka; Delta Orionis) हा तारा बरोबर वैषुविकवृत्तावर येतो. तसेच कुंभाच्या (Aquarius Constellation) शिरातले क्र. 62, क्र. 55 आणि त्याच्याच रेषेतला ठळक सदलमेलिक (Sadalmelic; Alpha Aquarii) हे तारेही बरोबर वैषुविकवृत्तावर येतात.
आयनिकवृत्त रात्रीच्या आकाशात ओळखणे तसे सोपे आहे, कारण सगळे ग्रह याच वृत्तावर असतात, तसेच वृषभातील (Taurus Constellation) रोहिणीच्या (Aldebaran; Alpha Tauri) अगदी शेजारून, मिथुनातील (Gemini Constellation) प्लक्ष (Pollax; Beta Geminorum) च्या कमरेतील वसट (Wasat; Delta Geminorum) तारा, ते कर्कातील (Cancer Constellation) ॲसेलस ऑस्ट्रॅलिस (Delta Cancri) हा तारा, ते सिंहातील (Lio Constellation) मघा (Regulus; Alpha Lionis), नंतर कन्येतील (Virgo Constellation) चित्रा (Spica; Alpha Virginis) शेजारून तुळेतील (Libra Constellation) झुबेनेलजेन्युबी (Zubenelgenubi; Alpha Librae), वृश्चिकातील अक्रॅब (Acrab; Beta Scorpii) धनु (Sagittarius Constellation) मधील कौस बोरिॲलिस (Kaus Borealis; Lambda Sagittarii) ताऱ्याच्या एक अंश उत्तरेकडून, मकरेतील (Capricornus Constellation) थिटा कॅप्रिकॉर्नी (Theta Capricornii) तारा, कुंभेतील (Aquarius Constellation) लॅम्डा ॲक्विरी (Lambda Aquarii) ते मीनेतील (Pisces Constellation) झिटा पिस्सियम (Zeta Piscium) तारा असा त्याचा मार्ग चटकन जुळवता येतो.
समीक्षक : माधव राजवाडे