अनुराधा नक्षत्र :

नक्षत्र चक्रातील अनुराधा हे 17 वे नक्षत्र आहे. वृश्चिक राशीत एकूण तीन नक्षत्रांचा समावेश आहे. अनुराधा, ज्येष्ठा आणि मूळ नक्षत्र. वृश्चिक राशीच्या तारकासमूहाचा आकार दिसायला बरोबर विंचवासारखा आहे. या विंचवाच्या वरच्या आकड्यातील आणि मुखातील 5 तारे मिळून अनुराधा नक्षत्र बनते. वृश्चिकातील जब्बाह (Jabbah; Nu Scorpii), अक्रॅब (Acrab; Beta Scorpii), दश्चुब्बा किंवा जुब्बा (Dschubba; Delta Scorpii), पाय स्कॉर्पि (Pi Scorpii) आणि ऱ्हो स्कॉर्पि (Rho Scorpii) या पाच ताऱ्यांचा समावेश अनुराधा नक्षत्रामध्ये होतो. यातला दश्चुब्बा किंवा जुब्बा हा डेल्टा तारा अनुराधातील योग तारा आहे. हा तारा 2.3 प्रतीचा तारा आहे, परंतु जुलै 2000 मध्ये हा तारा अचानक जास्त तेजस्वी दिसायला लागला. त्याची तेजस्विता एका आठवड्याच्या आत 2.3 वरून 1.9 पर्यंत वाढली. तेव्हापासून हा तारा रूपविकारी तारा झाला असून त्याची तेजस्विता 2.32  ते 1.6 या दरम्यान कमी अधिक होत राहते असे दिसून येत आहे. याचा अर्थ असा होतो की जेव्हा हा तारा जास्तीत जास्त तेजस्वी असतो, तेव्हा तो वृश्चिक राशीतला चौथ्या नाही, तर दुसऱ्या क्रमांकाचा तेजस्वी तारा होतो.  दश्चुब्बा किंवा जुब्बा हा एक तारा नसून द्वैती तारा आहे. यात डेल्टा-ए आणि डेल्टा-बी असे दोन तारे असून डेल्टा-ए लाच फक्त दश्चुब्बा किंवा जुब्बा असे नाव आता आयएयूच्या ताऱ्यांना अधिकृत नावे देणाऱ्या समितीने (WGSN) ठरवले आहे. डेल्टा-ए वर्णपटीय वर्गीकरणात B0.3 IV तर डेल्टा-बी या वर्गीकरणात B1-3V या गटात आहेत.

दश्चुब्बा किंवा जुब्बा प्रमाणेच अनुराधामधले इतर सर्वच तारे द्वैती किंवा त्याहून अधिक ताऱ्यांच्या संचात असणारे तारे आहेत.

प्रत्यक्ष आकाशात तूळ राशीच्या समांतर दक्षिणपूर्वेकडे वृश्चिक राशीतला हा अनुराधा नक्षत्राचा भाग येतो. त्याच्या विंचवाच्या तोंडाच्या आकारावरून ही राशी ओळखणे सोपे जाते.

समीक्षक : आनंद घैसास