आश्लेषा नक्षत्र :

आश्लेषा हे नक्षत्र-चक्रातील नववे नक्षत्र आहे. वासुकी म्हणजे हायड्रा (Hydra Constellation) या तारकासमूहात या नक्षत्रातील तारे येतात. कर्क (Cancer Constellation) राशीच्या दक्षिणेला आणि लघुलुब्धकाच्या (Canis Minor Constellation) प्रश्वा (प्रोस्यॉन; Procyon) ताऱ्याच्या बरोबर पूर्वेला हे नक्षत्र आहे. या ठिकाणी एकूण सात ताऱ्यांनी मिळून पश्चिम-पूर्व दिशेत काढलेल्या देवनागरी नऊ (९) च्या सारखा एक आकार दिसतो. हेच वासुकी तारकासमूहातल्या सर्पाचे तोंड किंवा डोके मानतात. वासुकीच्या या तोंडातील सर्वात उत्तरेच्या ताऱ्यापासून घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने पाहिले तर वासुकीमधील (हायड्रामधील) इप्सिलॉन, डेल्टा, सिग्मा, ईटा, ऱ्हो, आणि झिटा, हे तारे मिळून जे ९ चे वरचे वर्तुळ तयार होते, तेच ‘आश्लेषा नक्षत्र’ मानतात. वासुकी हा तारकासमूह आकाशातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात लांबलचक पसरलेला तारकासमूह असून त्यातील सगळेच तारे खूप अंधुक आहेत. त्यातल्या त्यात एकच अल्फार्ड (Alfard; Alpha Hydrae) नावाचा तारा थोडा तेजस्वी आहे (दृश्यप्रत: 2.0). आश्लेषा नक्षत्रातील इप्सिलॉन (Epsilon Hydrae) तारा हा द्वैती तारा असून पृथ्वी पासून सुमारे 129 प्रकाशवर्षे दूर आहे. त्या द्वैती ताऱ्यांमधील मुख्य तारा पिवळ्या रंगाचा असून 3.4  दृश्यप्रतीचा तारा आहे. तर त्याचा सहकारी तारा निळ्या रंगाचा 6.7 दृश्यप्रतीचा तारा आहे. 1 जून 2018 या दिवसापासून या इप्सिलॉन ताऱ्याचे नावच आता ‘आश्लेषा’ असे ठरले आहे. परंतु आश्लेषा नक्षत्राचा योग तारा मात्र भारतीय रूढीनुसार, या वर्तुळालगतचा झिटा ( Zeta Hydrae) हा तारा मानला जातो.

भारतीय पुराणात या नक्षत्राशी संबंधित, खरे तर पूर्ण वासुकी या तारकासमूहासंबंधी नहुष राजाची एक सुंदर कथा आहे. तसेच नगर बांधण्यासाठी पांडवांनी खांडववन जाळताना कृष्णाने वासुकीला तेथून बाहेर काढल्याचीही एक कथा आहे. ग्रीक पुराणात वासुकी म्हणजे हायड्रा (Hydra) संबंधी हर्क्युलिस (Hercules) या पराक्रमी योद्ध्याची एक कथा येते.

समीक्षक : आनंद घैसास